दीर्घ प्रतीक्षेनंतर आजपासून (18 जून) इंग्लंडमध्ये जागतिक कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जात आहे. भारत आणि न्यूझीलंड या दोन संघादरम्यान साऊदॅम्पटन येथील रोझबाऊल मैदानावर हा सामना खेळवण्यात येत आहे. 18 ते 22 जूनदरम्यान हा सामना खेळवला जाईल.
कसोटी सामना एरवी पाच दिवसांचा असतो. पण स्पर्धेच्या अंतिम सामन्यात एखादा अडथळा निर्माण झाल्यास निकाल हाती यावा, यासाठी एक दिवस राखीवसुद्धा ठेवण्यात आलेला आहे. भारत आणि न्यूझीलंड दोन्ही संघही तुल्यबळ आहेत. त्यामुळे या लढतीत चुरशीची लढाई होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. दर्जेदार क्रिकेटचा मनमुराद आनंद लुटण्याच्या अपेक्षेने या लढतीची अपेक्षा करणाऱ्या क्रिकेटप्रेमींच्या आनंदावर पावसामुळे विरजण पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
पाऊस ठरणार व्हिलन?
साधारणपणे इंग्लंडमध्ये जून महिन्यात उन्हाळा असतो. पण या काळात इथं जोरदार पावसाचीही शक्यता असते. साऊदॅम्पटनमधील हवामान अस्थिर राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. पुढील आठवडाभर येथे ढगाळ वातावरण राहील, तसंच कमी-अधिक काळ विश्रांती घेत जोरदार पाऊस पडेल अशी शक्यता स्थानिक हवामान विभागाने वर्तवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुढील पाचही दिवस 70 ते 90 टक्के पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
नाणेफेकीला उशीर
भारतीय प्रमाणवेळेनुसार आज दुपारी साडेतीन वाजता खेळ सुरू होणार होता. पण पावसामुळेच नाणेफेक होऊ शकलेली नाही. असाच व्यत्यय सामन्यादरम्यान अनेकवेळा येऊ शकतो. अशा स्थितीत एक चुरशीच्या लढाई पाहण्यासाठी आतुर असलेल्या क्रिकेटप्रेमींचा हिरमोड झाला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर ICC ने या सामन्यासाठी राखीव ठेवलेला सहावा दिवस दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा असू शकतो.
सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस
एकीकडे साऊम्पटनमध्ये पाऊस सुरू असताना दुसरीकडे सोशल मीडियावरही उत्स्फूर्त प्रतिक्रियांचा पाऊस होत असल्याचं दिसून येतं. अनेकजण साऊथम्पटनमधील पावसाची स्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. तर क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी पावसाने काही काळ विश्रांती घ्यावी, अशी प्रार्थना क्रिकेटप्रेमींकडून करण्यात येत आहे.
क्रिकेटपटू दिनेश कार्तिकने साऊथम्पटनमधील हवामानाबाबत सर्वांना माहिती दिली. भारतातून गूगलवर इंग्लंडच्या हवामानाची माहिती घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या सर्वांसाठी - इथं अजूनही जोरदार वाऱ्यांसह पाऊस सुरू आहे. वरूणराजाला कदाचित पहिल्या दिवसाचा खेळ होऊ द्यायचा नाही, असं कार्तिक म्हणाला. रॉयल चॅलेंजर बंगळुरू संघानेही आपल्या ट्विटर अकाऊंटवरून पाऊस थांबण्यासाठी प्रार्थना केली.