Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

IPL 2019 : महेंद्रसिंग धोनी जुन्या रूपात तळपला, पण चेन्नई पराभूत

IPL 2019 : महेंद्रसिंग धोनी जुन्या रूपात तळपला, पण चेन्नई पराभूत
, सोमवार, 22 एप्रिल 2019 (11:15 IST)
IPLमध्ये रविवारी बंगळुरू इथल्या चिन्नास्वामी मैदानावर हजारो क्रिकेटप्रेमींनी काळजाचा ठोका चुकवणारी मॅच पाहता आली.
 
रविवारी झालेल्या दुसऱ्या मॅचमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज शेवटच्या क्षणापर्यंत श्वास रोखून धरायला लावणाऱ्या सामन्यात 1 धावेने हरवले.
 
162 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उरतलेल्या चेन्नईला शेवटच्या ओव्हरमध्ये 26 धावांची गरज होती. धोनीने या ओव्हरमध्ये 5 चेंडूत 24 धावा केल्या. पण शेवटच्या चेंडूवर तो चुकला. जर धावसंख्या बरोबर झाली असती तर सुपर ओव्हरने मॅचचा निर्णय झाला असता.
 
असं जरी झालं नसलं तरी धोनीच्या तुफानी खेळीने जुन्या स्मृतींना उजाळा दिला. कालच्या सामन्यात धोनीचं जे रूप दिसलं ते 10 वर्षांपूर्वी नेहमी दिसत होतं.
 
शेवटच्या ओव्हरमधील थरार
शेवटच्या ओव्हरसाठी विराटने उमेश यादवकडे बॉल सोपवला. एका सामन्यासाठी विश्रांती घेऊन फ्रेश झालेला आणि जगातील सर्वोत्तमा फिनिशर म्हणून लौकिक असलेला धोनी स्ट्राईकवर होता.
webdunia
धोनीने उमेशच्या पहिल्याच बॉलवर चौकार लगावला आणि दुसऱ्या चेंडूवर षटकार खेचला. दोन चेंडूत 10 धावा झाल्यानंतर चेन्नईच्या विजयाच्या आशा पल्लवीत झाल्या. धोनीने तिसऱ्या चेंडूवरही षटकार खेचला. विराट कोहलीच्या चेहऱ्यावरील भाव बदलले होते. चौथ्या चेंडूवर 2 धावा झाल्या. पाचव्या चेंडूवर धोनीने षटकार खेचला. आता शेवटच्या चेंडूवर विजयासाठी चेन्नईला फक्त 2 धावा हव्या होत्या. उमेशने हा चेंडू स्लो टाकत धोनीला चकवले. तरीही धोनीने एक धाव घेण्याचा प्रयत्न केला. विकेट किपर पार्थिव पटेलने चेंडू तटवला आणि स्टंप उडवल्या. शार्दूल ठाकूर धावबाद झाला.
 
आणि विराट कोहलीसह टीमने विजयाचा जल्लोष साजरा केला. धोनी 48 चेंडूत 84 धावांसह नाबाद राहिला. त्याच्याशिवाय अंबाती रायुडूने 29 आणि रवींद्र जडेजाने 11 धावा केल्या. उमेश यादव आणि डेल स्टेनने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.
 
बेंगलोरकडून पार्थिव पटेलने 53, एबी डिविलियर्सने 25, मोईन अलीने 26 आणि आकाशदीप नाथने 161 धावा केल्या.
 
या विजयामुळे बेंगलोर सुपर फोरसाठीच्या रेसमधून बाहेर पडण्यापासून वाचली आहे. बेंगलोरचे 10 सामन्यात 3 विजय असून एकूण गुण 6 आहेत. एक जरी पराभव झाला तर बेंगलोर या स्पर्धेतून बाहेर पडेल.
 
थरारक सामना
क्रिकेट समीक्षक अयाज मेमन म्हणतात, "IPLमध्ये झालेला आतापर्यंतचा हा सर्वाधिक थरारक सामना होता. यापूर्वी असा सामना कधीही झालेला नाही. चेन्नईला विजयासाठी फक्त 162 धावा करायच्या होत्या, पण बेंगलोरच्या बॉलरनी फक्त 28 धावा देत 4 विकेट घेतल्या. त्यानंतर धोनीने स्फोटक बॅटिंग करत चेन्नईला विजयाच्या जवळ नेले. शेवटच्या ओव्हरमध्ये 26 धावांची गरज असतान चेन्नई फक्त 1 धावेने ही मॅच हरली."
 
उमेश यादवची शेवटच्या ओव्हरमध्ये धुलाई झाली असली तरी त्याने आधी 2 विकेट घेतल्याचं ते म्हणाले.
 
रवींद्र जडेजा आणि ब्राओ यांच्या विकेट गेल्यानंतर धोनीने मॅच स्वतःच्या खांद्यावर घेतली. धोनीने केलेला धावांचा हिशोब बरोबर होता, फक्त शेवटचा बॉल त्याला फटकावता आला नाही.
 
या खेळीने धोनीने घड्याळाचे काटे मागे फिरवले हे मात्र खरं.
 
हैदराबादने कोलकत्याला हरवलं
रविवार झालेल्या पहिल्या मॅचमध्ये सनराईज हैदराबाद घरच्या मैदानावर खेळताना कोलकता नाईट रायडर्सला 9 विकेटनी हरवलं.
 
डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेयरस्टो विजयाचे शिल्पकार ठरले.
 
विजयासाठीचं 160 धावांचं लक्ष्य हैदराबादने 15 ओव्हरमध्ये एक विकेट गमावत पूर्ण केलं. वॉर्नरने 67 आणि बेयरस्टोने 80 धावा केल्या. दोघांनी 12.2 ओव्हरमध्ये 131 धावांची भागीदारी करत कोलकत्याच्या विजयाच्या आशा संपवल्या होत्या.
 
कोलकताच्या संघाने 20 ओव्हरमध्ये 159 धावा केल्या. क्रिस लेनने 51, सुनील नारायणने 25 आणि रिंकू सिंहने 30 धावा केल्या.
 
भुवनेश्वर कुमार, खलील अहमद यांनी प्रत्येकी 2 आणि 3 विकेट मिळवल्या.
 
वॉर्नर आणि बेयरस्टो यांनी सातत्याने चांगली बॅटिंग करत हैदराबादच्या विजयात योगदान दिलं आहे. रविवारी वॉर्नरने 38 चेंडूत 67 धावा केल्या. तर बेयरस्टोने फक्त 43 बॉलमध्ये 80 धावा केल्या. वार्नरने सलग 4 मॅचमध्ये अर्धशतक झळकलं आहे. वॉर्नरच्या फटकेबाजीतून एकही बॉलर सुटलेला नाही. बेयरस्टोनेही सातत्याने चांगली बॅटिंग केली आहे.
 
5 विजय आणि 4 पराभवांसह हैदराबादचे 10 गुण झाले असून हा संघ IPLमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. तर कोलकत्याचा संघ 8 गुणांसह 6व्या क्रमांकावर गेला आहे. जर कोलकत्याने कामगिरी उंचावली नाही तर IPL - 12 मधून कोलकता बाहेर पडलेली असेल.

आदेश कुमार गुप्त

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज ठाकरे : ‘लाचार’ शिवसेना आणि ‘बसवलेले’ फडणवीस कधी एकदा एकमेकांचा गळा घोटतील, अशी परिस्थिती आहे