1 मे हा दिवस जपानसाठी अतिशय खास आहे. आजच्या दिवशी जपानमध्ये नवीन कालखंड सुरू झाला आहे. कारण आज सम्राट नारुहितो यांचा राज्याभिषेक झाला.
नारुहितो यांच्या राज्यारोहणाबरोबरच जपानमध्ये 'रेएवा' कालखंडाला सुरूवात झाली आहे. जपानी भाषेतल्या या शब्दाचा अर्थ होतो- सुसंवाद, एकोपा.
जपानचे राजे अकिहितो 30 एप्रिलला सिंहासनावरून पायउतार झाले. अकिहितो यांची तीस वर्षांची कारकीर्द ही 'हेसेई' म्हणजेच 'शांततेचा काळ' म्हणूनच ओळखली जाते.
जपानला शांततेच्या कालखंडातून आता सुसंवाद आणि एकोप्याच्या दिशेनं नेणारे नारुहितो हे राजघराण्याच्या पारंपरिक प्रतिमेपासून वेगळे आहेत. राजघराण्याचा वारस म्हणून असलेल्या जबाबदाऱ्या पार पाडतानाच त्यांनी आपल्या कौटुंबिक आयुष्याचाही समतोल साधला आहे. अतिशय कठीण काळात आपल्या पत्नीच्या पाठिशी उभं राहताना त्यांनी राजघराण्यातील संकेतांनाही बगल दिली होती.
कुटुंबवत्सल पती आणि वडील
प्रिन्स नारुहितो हे वयाच्या 30 व्या वर्षापर्यंत त्यांच्या कुटुंबासोबतच राहत होते. भावी राजानं त्याच्या प्रजेमध्ये रहायला हवं, या राजघराणाच्या परंपरेपासून त्यांनी पहिल्यांदा फारकत घेतली.
आपल्या वैयक्तिक गोष्टींऐवजी राजानं लोकांच्या भावभावनांना, गरजांना प्राधान्य द्यायला हवं या उद्देशानं ही परंपरा आखली गेली होती. पण नारुहितोंच्या जन्माच्या वेळेस जपानी समाजव्यवस्थेत बदल होत होते. समाजाबरोबरच कुटुंबालाही प्राधान्य दिलं जाऊ लागलं. याचाच परिणाम नारुहितोंच्या जडणघडणीवर झाला असावा.
कुटुंबाला महत्त्व देण्याचा नारुहितोंचा स्वभाव ठळकपणे अधोरेखित झाला जेव्हा त्यांची पत्नी तणावग्रस्त होती आणि त्यातून उद्भवलेल्या आजारांना तोंड देत होती.
नारुहितो यांच्या पत्नी प्रिन्सेस मसाको या माजी राजनयिक अधिकारी होत्या. राजघराण्यातील आयुष्य आणि मुलाला जन्म देण्याचा दबाव यांमुळे त्यांना तणावाने ग्रासलं असल्याचं निदान 2004 साली करण्यात आलं.
प्रिन्स नारुहितो यांनी यावेळी आपल्या एकुलत्या एका मुलीच्या, प्रिन्सेस ओकोला सांभाळण्याची जबाबदारी स्वीकारली. प्रिन्सेस मसाको या त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडत नसल्याची टीका व्हायला लागल्यानंतर नारुहितोंनी खंबीरपणे आपल्या पत्नीची बाजू घेतली.
नारुहितो यांची मुलगी प्रिन्सेस ओकोवरुनही अनेक विवाद झाले आहेत. जपानी राजघराण्याच्या नियमानुसार केवळ मुलगाच राजगादीचा वारस ठरतो. नारुहितोंना मुलगीच असल्यामुळे राजघराण्याचा पुढचा वारसदार कोण, असा प्रश्नही विचारला जायचा.
या चर्चांचं प्रमाण इतकं वाढलं होतं, की 2004 साली जपानचे तत्कालिन पंतप्रधान ज्युनिचिरो कोईझोमी यांनी राजघराण्याचे नियम बदलण्याचा प्रस्ताव ठेवला होता. जेणेकरून प्रिन्सेस ओको ही राजघराण्याची वारस ठरू शकली असती. अर्थात, 2006 साली ओकोच्या चुलत भावाचा, प्रिन्स हिसाहितोचा जन्म झाला आणि अखेरीस या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला.
अभ्यासू व्यक्तिमत्त्व
59 वर्षांचे प्रिन्स नारुहितो हे इतर बाबतीतही त्यांच्या पूर्वसुरींपेक्षा खूप वेगळे आहेत. नारुहितो यांचे वडील राजे अकिहितो अगदी जन्मापासूनच अभिषिक्त प्रिन्स होते. त्यामुळे त्यांच्यावर अनेक बंधनं होती. नारुहितो यांना मात्र त्यांच्या आवडीचं शिक्षण घेण्याची संधी आणि स्वातंत्र्य मिळालं.
नारुहितो यांनी टोकियोमधील गाकुश्वाईन विद्यापीठातून इतिहास या विषयामध्ये पदवी घेतली. त्यानंतर नारुहितो उच्च शिक्षणासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठात गेले.
1983 ते 1985 या काळात ते ऑक्सफर्डमध्ये होते. त्यांनी या काळात थेम्स नदीमधील वाहतूक व्यवस्था या विषयावर अभ्यास केला. जलवाहतूक हा पुढील काळातही नारुहितो यांच्या अभ्यासाचा विषय राहिला.
ऑक्सफर्डमधील दोन वर्षांचा नारुहितो यांच्या आयुष्यावर खूप प्रभाव पडला. 1993 मध्ये त्यांनी 'द थेम्स अँड आय' या नावानं लिहिलेल्या आपल्या आठवणींमध्ये ऑक्सफर्डमधली वर्षं हा 'आयुष्यातला सर्वांत आनंदाचा कालखंड' असल्याचं म्हटलं आहे.
1991मध्ये अभिषिक्त राजपुत्र म्हणून त्यांच्यावरील जबाबदाऱ्या वाढल्या होत्या. मात्र तरीही शैक्षणिक विषय आणि जागतिक स्तरावर पाण्याशी संबंधित विषयांमधला त्यांचा रस जराही कमी झाला नव्हता.
प्रिन्स नारुहितो हे 2007 ते 2015 या काळात संयुक्त राष्ट्रांच्या पाणी आणि स्वच्छता या विषयावरील सल्लागार समितीचे मानद अध्यक्ष होते.
नारुहितोंकडून मोठ्या अपेक्षा
जपानच्या जडणघडणीमध्ये नारुहितोंची भूमिका ही नेमकी काय असेल, याबद्दल सामान्यांच्या मनात अतिशय उत्सुकता आहे.
जपानमध्ये राजा हा केवळ नामधारी आहे. वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्तानं लोकांना संबोधित करणं आणि मान्यवर परदेशी पाहुण्यांच्या भेटीगाठी घेणे एवढ्यापुरतीच राजाची भूमिका मर्यादित आहे.
जग बदलत आहे. या बदलत्या जगात नारुहितो त्यांचं पद आणि जबाबदाऱ्यांचा मेळ कसा घालणार आहेत हा प्रश्न आहे, असं निक्केई या वर्तमानपत्रानं आपल्या अग्रलेखात म्हटलं आहे.
राजघराण्याच्या कायद्यानुसार नारुहितोंची मुलगी भविष्यात त्यांची राजकीय वारसदार होऊ शकणार नाही. सगळ्यांचं लक्ष आता नारुहितोंवर आहे. ते हा कायदा बदलण्यासाठी प्रयत्न करणार का, हा प्रश्न आहे.
सध्या तरी त्यांनी कोणतेही टोकाचे बदल घडविण्याचे संकेत दिलेले नाहीत. उच्चशिक्षित अशा या राजपुत्रानं सध्या आपण आपल्या पूर्वसुरींच्या कामातून शिकणार आहोत आणि त्यांचं काम पुढं घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार आहोत, असं स्पष्ट केलं आहे.