स्त्रीवादी आणि सामाजिक कार्यकर्त्या, तसेच बंगाली कवयित्री असलेल्या कामिनी रॉय यांचा आज 155 वा जन्मदिन आहे. कामिनी रॉय यांना गूगलनं डूडलद्वारे सलाम केला आहे.
12 ऑक्टोबर 1864 रोजी तत्कालीन बंगालच्या बेकरगंज जिल्ह्यात कामिनी यांचा जन्म झाला. हे ठिकाण आता बांगलादेशमध्ये आहे.
कवयित्री आणि समाजसेविका म्हणून त्या पुढे भारतासह जगभरात प्रसिद्ध झाल्या. मात्र, त्यांची आणखी एक विशेष ओळख म्हणजे, ब्रिटिशकालीन भारतातल्या त्या पहिल्या महिला पदवीधर होत्या.
कामिनी रॉय यांनी संस्कृत विषयात पदवी (ऑनर्स) मिळवली होती. कोलकाता विद्यापीठाच्या बेथुन कॉलेजमधून 1886 मध्ये पदवीधर झाल्यानंतर त्यांना तिथेच नोकरी मिळाली.
महिला हक्कांसंबंधी त्यांनी लिहिलेल्या कवितांमुळं त्या सर्वदूर परिचित झाल्या.
कामिनी रॉय नेहमी म्हणत की, महिलांनी आपल्या घरात बंदिस्त का राहावं?
बंगाली विधानपरिषदेत महिलांना मतदानाचा हक्क मिळावा म्हणून कामिनी रॉय यांनी 1926 साली संघर्ष केला होता. राजकीय मुद्द्यांवरही त्या सक्रिय होत्या.
कामिनी रॉय या 1922 ते 1923 या काळात फिमेल लेबर इनव्हेस्टिगेशन कमिशनच्या अध्यक्ष सदस्या होत्या. 1930 साली बेंगाल लिटररी कॉन्फरन्सच्या अध्यक्ष आणि 1932 ते 1933 या काळात त्या वांगिया साहित्य परिषदेच्या उपाध्यक्ष होत्या.
अखेरच्या काळात कामिनी रॉय बिहारच्या हजारीबाग जिल्ह्यात वास्तव्यास होत्या. 1933 साली त्यांचं निधन झालं.