Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

काश्मीर : प्रेमपत्र, मोडलेली लग्न आणि संपर्काच्या नव्या क्लुप्त्या

काश्मीर : प्रेमपत्र, मोडलेली लग्न आणि संपर्काच्या नव्या क्लुप्त्या
, गुरूवार, 12 सप्टेंबर 2019 (11:05 IST)
सौतिक बिस्वास
छान वळणदार अक्षरांमध्ये दिल्लीतल्या एका महिलेने गेल्या महिन्यात तिच्या काश्मीरमधल्या मित्रमैत्रिणींना पत्र लिहिलं.
 
जुलैमध्ये सुटीवर असतानाच ती त्यांना भेटून आली होती. आणि आता ते सगळे कसे आहेत हे जाणून घेण्यासाठी ती अस्वस्थ आहे.
 
"किती भयानक काळ आहे आहे हा," काळ्या रेघांवर नीट हस्ताक्षरांत ती लिहिते.
 
"पहाट होण्याआधी काळामिट्ट अंधार असतो आणि अजून पहाट झालेली नाही."
 
पत्राच्या शेवटी नाव लिहिण्यापूर्वी ती लिहिते "अतिशय व्यथित असणारी"
 
तिच्या या दुःखाचं कारण उघड आहे.
 
'ब्लॅक होल'
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्यानंतर काश्मिर खोऱ्यामध्ये 5 ऑगस्टपासून सारंकाही बंद आहे. सुमारे 1 कोटी लोक काश्मीर खोऱ्यात राहतात.
 
लँडलाईन फोन्स, मोबाईल्स आणि इंटरनेट अशा दळणवळणाच्या सर्व साधनांवरही बंदी आल्याने सगळाच संपर्क तुटला आणि स्थानिकांच्या अडचणीत वाढ झाली.
 
या सगळ्या संपर्क यंत्रणा अजूनही बंद आहेत.
 
दिल्लीमध्ये आलेल्या काश्मिरमधल्या एका मुक्त पत्रकाराची फेसबुक पोस्ट पाहिल्यानंतर या महिलेने आपला निरोप पोहोचवण्यासाठी पत्र लिहिलं.
 
इंटरनेट वापरण्यासाठी आणि काही वृत्तसंस्थांसोबत बातम्यांविषयी चर्चा करण्यासाठी 27 वर्षांचे विकार सायेद दिल्लीमध्ये आले होते.
 
सहज सुचलं म्हणून त्यांनी फेसबुकवर मेसेज पोस्ट केला. काश्मीरमधल्या त्यांच्या जिल्ह्यातल्या लोकांनी त्यांच्या कुटुंबासाठीचे संदेश पत्त्यासह आपल्याला इनबॉक्समध्ये पाठवावेत असं त्यांनी लिहिलं. 'प्रत्येक पत्त्यावर हे निरोप पोहोचवण्याचा मी माझ्यापरीने पूर्ण प्रयत्न करीन' असंही त्यांनी लिहिलं.
webdunia
सायेद दोन दिवसांनी श्रीनगरला परतले तेव्हा त्यांच्या मार्फत जगभरातल्या 17 लोकांनी पाठवलेले संदेश होते. दक्षिण काश्मिरमधल्या तीन जिल्ह्यांमध्ये राहणाऱ्या कुटुंब आणि मित्रमंडळींकरता हे निरोप होते. मुस्लीम बहुल काश्मीर खोऱ्यांतल्या सर्वांत तणावग्रस्त भागांमध्ये हे जिल्हे येतात.
 
अनेकांनी डिजिटल संदेश पाठवले होते. इतरांनी कागदावर लिहून काढून त्याचे फोटो काढून पाठवले.
 
ही दिल्लीस्थित महिला त्यांच्यापैकीच एक. ती काश्मिरी नाही. काश्मीरमध्ये कोणाशीही संपर्क होत नसल्याने आलेलं दडपण तिच्या पत्रातून स्पष्ट होतं. 'काश्मीरमधले फोन नंबर पुन्हा पुन्हा दाबून बोटं सुन्न झाली आहेत', 'मी रात्री घाबरून उठते आणि मेसेज चेक करते. काही नंबर डायल करून पाहते, काश्मीरमध्ये घालवलेल्या सुटीचे फोटो पुन्हा पुन्हा पाहते' असं तिने तिच्या पत्रात लिहिलंय.
 
काश्मीरमध्ये पोचल्यानंतर सायेदनं फिरत्या दूताचं काम केलं. शटर्स बंद करून बसलेल्या नगरांमध्ये आणि गावांमध्ये निरोप पोहोचण्यासाठी ते श्रीनगरच्या बाहेर पडले. रेंज नसलेल्या त्यांच्या मोबाईमध्ये अनेक मौल्यवान संदेश होते.
 
"मी लोकांची घरं शोधून काढली, त्यांचं दार ठोठावलं आणि त्यांना माझ्या फोनवरचा संदेश दाखवला. बहुतेक सगळ्या चांगल्या बातम्या होत्या."
 
काही भावनिक क्षणही होते. चंदीगडमध्ये राहणाऱ्या एका कॉलेज तरुणाने आपण परीक्षेत दुसरा क्रमांक आल्याचा निरोप त्याच्या आई-वडिलांना पाठवला होता. "त्याच्या आईने मला मिठी मारून रडायला सुरुवात केली," सायेद सांगतात.
webdunia
"तू ही माझ्या मुलासारखा आहेस," त्या महिलेने सायेद यांना सांगितलं.
 
संपर्कासाठीची सगळी साधनं बंद झाल्याने जुन्या सवयींना उजाळा मिळतोय. काश्मीरमध्ये आता लोक पुन्हा पत्रं लिहायली लागली आहेत.
 
प्रेमाची अशीही पत्र
26 वर्षांच्या इरफान अहमदचं श्रीनगरमध्ये त्याच्याच गल्लीत राहणाऱ्या विद्यापीठात शिकणाऱ्या मुलीवर प्रेम आहे. एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी आणि कधी भेटायचं हे ठरवण्यासाठी त्यांनी आता पत्र लिहून कागदाचे बोळे करून एकमेकांच्या घरात फेकायला सुरुवात केलीय. चुरगळलेल्या या कागदांमध्ये प्रेम, हुरहूर आणि काळजी असते.
 
"सगळं बंद झाल्याने आम्हाला फोनवर बोलता येत नाही, भेटता येत नाही. म्हणून आम्ही पत्रं लिहायला सुरुवात केली," ऑफिस रिसेप्शनिस्ट म्हणून काम करणारे अहमद सांगतात.
 
"आम्ही एकमेकांची आठवण येत असल्याचं सांगतो, हे सगळं किती क्रूर आहे त्याबद्दल बोलतो. मग मी उत्तर लिहिलतो. कागद चुरगळतो आणि तिच्या बेडरूममध्ये फेकतो. आम्ही असं बरेचदा करतो."
 
लोकांनी लँडलाईनचा वापर करणं खरंतर सोडू दिलं होतं, पण आता या परिस्थितीमुळे लोक पुन्हा एकदा लँडलाईन फोन वापरायला लागले आहेत.
 
भारतामध्ये 10 कोटींपेक्षा जास्त मोबाईल फोन युजर्स आहेत तर 560 दशलक्ष इंटरनेट युजर्स आहेत. जगातल्या सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या डिजिटल मार्केट्सपैकी एक भारत आहे. त्या तुलनेत लँडलाईन फोन्सची संख्या फक्त 23 दशलक्ष आहे.
 
पण आता काश्मिरमध्ये लोक नवीन लँडलाईन कनेक्शनसाठी अर्ज करत आहेत किंवा मग वापरात नसलेला फोन दुरुस्त करायचा प्रयत्न करतायत.
 
काश्मिरमध्ये सलग दुसऱ्या महिन्यात बंदसारखी स्थिती आहे. आणि आता अनेक लँडलाईन फोन पुन्हा वापरात आले आहेत. पण फोन 'सुरू' असले तरी त्यावरून संपर्क होत नसल्याचं लोकांचं म्हणणं आहे.
 
प्लास्टिकचं एक टेबल, काही खुर्च्या आणि सुरू असणारा चायनीज बनावटीचा फोन असे तात्पुरते फोन बूथ सुरक्षा यंत्रणांनी रस्त्यावर उभारले आहेत.
webdunia
अशाच एका फोनबूथवर आलेल्या मंझूर अहमद यांची अडचण ही या बंदीचा लोकांवर आणि त्यांच्या आयुष्यावर कसा परिणाम झालाय हे सांगणारी आहे.
 
मोफत कॉलची सुविधा
55 वर्षांच्या मंझूर अहमद यांचा शालींचा व्यवसाय आहे. त्यांचे पैसे देणं लागत असणाऱ्या काश्मीर बाहेरच्या त्यांच्या ग्राहकांशी संपर्क करण्याच्या ते प्रयत्नात आहेत.
 
"त्यांनी मला चेक्स पाठवले. मी बँकेत गेलो (काही बँका सुरू आहेत) पण त्यांनी सांगितलं की कनेक्टिविटी नसल्याने त्यांना पेमेंट प्रोसेस करता येणार नाही. म्हणून मी आता शहरभर फिरून फोन शोधतोय. म्हणजे फोन करून मला ग्राहकांना पैसे ट्रान्सफर करायला सांगता येईल," ते म्हणतात.
 
एका खोलीतल्या ऑफिसमध्ये ट्रॅव्हल एजन्सी चालवणाऱ्या यास्मिन मसरत या आता लोकांच्या मदतीसाठी सरसावल्या आहेत. श्रीनगरच्या काही भागांमध्ये फोनलाईन्स सुरू झाल्या आहेत.
 
यास्मिन यांच्या ऑफिसमधला फोनही सुरू झालाय. ऑगस्टच्या मध्यात त्यांनी शूरपणे त्यांचं ऑफिस उघडलं आणि तिथल्या एकमेव लँडलाईनवरून लोकांना त्या मोफत कॉल करू देतात.
webdunia
फोन करायला येणाऱ्यांसाठी त्यांच्या ऑफिसच्या भिंतींवर सूचना आहेत "फोनवरचं संभाषण थोडक्यात आणि कामापुरतं ठेवा. आम्हाला या कॉलचे पैसे पडतात."
 
बघता बघता ही बातमी लोकांपर्यंत पोहोचली आणि त्यांच्या ऑफिसमध्ये लोकांची गर्दी झाली. 500 पेक्षा जास्त लोक फोन करायला आले आणि त्यानंतर जवळपास रोज 1000 मोफत कॉल्स करण्यात येत आहेत.
 
यामध्ये काही कॅन्सर पेशंट्स होते ज्यांना डॉक्टरशी किंवा इतर शहरांतल्या दुकानांशी प्रिस्क्रिप्शन आणि औषधांबद्दल बोलायचं होतं.
webdunia
एक दिवस काळजीत पडलेली 8 वर्षांची एक मुलगी तिच्या आजीसोबत आली. मुंबईमधल्या हॉस्पिटलमध्ये कॅन्सरचे उपचार घेणाऱ्या तिच्या आईशी तिला बोलायचं होतं. 20 दिवस त्यांचा संपर्क झाला नव्हता. "तू बरी हो आणि लवकर परत ये," तिने आईला पुन्हापुन्हा सांगितलं.
 
"खोलीतले सगळेच भावुक झाले होते. सगळ्यांच्याच डोळ्यांत पाणी होतं," यास्मिन मसरत सांगतात.
 
एकदा एका माणसाने येऊन त्याच्या मुलाला आजीचं काही दिवसांपूर्वी निधन झाल्याची बातमी दिली.
 
आणि जर लँडलाईनमार्फतही निरोप पोहोचवता येत नसेल तेव्हा भारतात इतरत्र राहणारे काश्मिरी किंवा परदेशस्थ काश्मिरी स्थानिक न्यूज नेटवर्क्सच्या माध्यमातून कुटुंबापर्यंत निरोप पोहचवत आहेत.
 
दिल्लीस्थित सॅटेलाईट आणि केबल न्यूज नेटवर्क असणाऱ्या गुलिस्तान न्यूजकडे असे अनेक संदेश आणि व्हीडिओ आले आहेत. बातम्यांमध्ये आणि बातम्यांदरम्यान हे संदेश पुन्हापुन्हा दाखवण्यात येतात. यामध्ये स्थानिक काश्मिरींनी पाठवलेले संदेशही असतात.
 
काश्मीरमधला हा खरंतर लग्नसराईचा मोसम. पण आतापर्यंत लग्न रद्द झाल्याचे शेकडो संदेश आपण दाखवल्याचं या नेटवर्कचं म्हणणं आहे. इंग्रजी आणि उर्दू बातम्यांमध्ये स्क्रोलद्वारे किंवा व्हीडिओ मेसेजद्वारे हे निरोप जाहीर करण्यात आले.
 
गेल्या आठवड्यातल्या एका सकाळी 26 वर्षांचा शोएब मीर या नेटवर्कच्या श्रीनगरच्या कार्यालयात एक वेगळीच मागणी करण्यासाठी आला होता. बेपत्ता वडिलांना शोधण्यासाठी त्याला नेटवर्कची मदत हवी होती.
webdunia
श्रीनगरपासून 12 किलोमीटरवर असणाऱ्या बेमिनामधील हे 75 वर्षांचे गृहस्थ सकाळी फेरी मारायला बाहेर पडले ते परतलेच नाहीत. त्यांचा दूरवर शोध घेतल्यानंतर आपण पोलिसांत तक्रार दाखल केल्याचं मीर यांनी सांगितलं.
 
"रस्त्यांवर लोकं नाहीत. सारंकाही बंद आहे. आणि पोलीस या बंदाच्या व्यवस्थेत गर्क आहेत. कदाचित मी व्हीडिओद्वारे संदेश देत वडिलांचा फोटो दाखवला तर त्यांना शोधून काढायला मदत होईल," मीर सांगतात.
 
चॅनलने आतापर्यंत लोकांची मदत केली असली तरी त्यांनाही अडचणी येत आहेत. शटडाऊनचा स्थानिक मीडियावर मोठा परिणाम झाला आहे. बातम्या गोळा करणं कठीण झालंय.
 
श्रीनगरमधून न्यूज नेटवर्कचं कुरियर रोज दिल्लीला पाठवण्यात येतं. यामध्ये 16GBचे पाच पेन ड्राईव्ह असतात. यामध्ये बातम्या आणि फुटेज असतं. मग याचं एडिटिंग होतं आणि दिल्ली कार्यालयातून प्रक्षेपण केलं जातं.
 
स्थानिक वृत्तपत्रांच्या पानांची संख्या नेहमीच्या 16 ते 20 वरून घसरून 6 ते 8वर आली आहे. श्रीनगरमध्ये उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या मीडिया सेंटरमधल्या इंटरनेट कनेक्शन असणाऱ्या 10 डेस्कटॉपभोवती 200 पत्रकारांची गर्दी असते. इथूनच त्यांना ई-मेल वाचता येतात, बातम्या, फोटो आणि व्हीडिओ पाठवता येतात. वृत्तसंस्थांच्या बातम्या पेन ड्राईव्हवर डाऊनलोड करून वर्तमानपत्रांच्या ऑफिसमध्ये नेण्यात येतात आणि मग पानं भरण्यासाठी त्या वापरल्या जातात.
 
"ही संयमाची परीक्षा आहे. काल मला काही फोटोज पाठवायला सात तास लागले," एका छायाचित्रकाराने सांगितलं.
 
इंटरनेट शटडाऊन काश्मीरसाठी नवीन नाही. Internetshutdown.in या ट्रॅकरनुसार या भागामध्ये इंटरनेट बंद होण्याची या वर्षातली ही 51वी घटना आहे. 2011पासून आतापर्यंत 170पेक्षा जास्त वेळा शटडाऊन झालं. यामध्ये 2016मधल्या सहा महिन्यांच्या कालावधीचाही समावेश आहे जेव्हा बहुतेक काळासाठी इंटरनेट बंद होतं.
 
काश्मीर टाईम्सच्या एक्झिक्युटिव्ह एडिटर अनुराधा भसिन यांनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे. माहितीचा प्रसार थांबवणं आणि पत्रकारांच्या हालचालींवर निर्बंध आणण्याला त्यांनी आव्हान दिलंय.
 
"हे मानवी हक्कांचं उल्लंघन असल्याचं" त्यांनी म्हटलंय. शटडाऊनमुळे मीडियाला घडामोडीचं वार्तांकन करता येत नसून इतर भारतीयांसाठी उपलब्ध असणारी माहिती काश्मिरींना मिळत नसल्याचंही त्यांनी म्हटलंय.
 
गेल्या तीन दशकांपासूनच्या दहशतवादाने पोखरून निघालेल्या या भागामध्ये हिंसाचार घडू नये म्हणून हा शटडाऊन गरजेचा असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. दहशतवाद्यांना चिथवून हिंसेसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप भारताने पाकिस्तानवर केलाय. पाकिस्तानने हा आरोप फेटाळून लावलाय.
 
"अतिरेक्यांचा त्यांच्या म्होरक्यांशी असलेल्या संपर्क तोडायचा पण दुसरीकडे इतरांसाठी इंटरनेट सुरू ठेवायचं. असं कसं करता येणार? मला जाणून घ्यायला आवडेल," भारताचे परराष्ट्र सचिव एस. जयशंकर नुकतेच म्हणाले होते.
 
पण अशा प्रकारच्या शटडाऊनमुळे उलट अजून हिंसा होऊ शकते, असं संशोधनात आढळून आलं आहे.
 
स्टॅनफर्ड विद्यापीठाच्या जॅन रिडझॅक यांनी नेटवर्क शटडाऊनमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांचा अभ्यास केला आहे. ते म्हणतात, "एकत्र येऊन होणाऱ्या हिंसाचाऱ्या घटनांचा याच्याशी अधिक प्रकर्षाने संबंध आहे."
 
माहिती मिळत नसल्याने "लोकांना काहीतरी पावलं उचलण्यासाठी एकत्र यावं लागतं. अहिंसक मार्गांनी निदर्शनं करण्यासाठी चांगली संपर्क यंत्रणा आणि नियोजन लागतं. म्हणून मग अहिंसक प्रतिक्रियांची जागा हिंसक प्रतिक्रिया घेतात."
 
काश्मीरचं भवितव्य अजूनही अनिश्चित आहे. संपर्क यंत्रणांवरची बंदी कधी उठवली जाणार किंवा शिथिल होणार हे अजूनही स्पष्ट नाही. पण तरीही काही आशेचे कण आहेत.
 
गेल्या आठवड्यात एका सकाळी श्रीनगरमधल्या न्यूज नेटवर्कच्या ऑफिसमधली फोनलाईन आश्चर्यकारकरित्या काम करू लागली. त्याबद्दल लहानसा जल्लोषही करण्यात आला. "कदाचित आता गोष्टी सुधारतील, आम्ही आशेवरच जगतोय," चीफ रिपोर्टर सय्यद रौफ सांगतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अनंत चतुर्दशी: गणपती विसर्जनासाठी लातूरमध्ये पाणी नाही, मूर्ती दान करून गणपती बाप्पाला निरोप द्या पालिकेचं आवाहन