झुबैर अहमद
केरळमध्ये सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या पोस्टर्सची गर्दी रस्त्यारस्त्यांवर पाहायला मिळते.
भाजपच्या उमेदवारांसमवेत त्यांचे मोठमोठाले कटआऊट, भिंतीवर रंगवण्यात आलेली चित्रं लक्ष वेधून घेतात.
भाजपची यंदाच्या निवडणुकीतील जोरदार तयारी पाहिल्यास ते संपूर्ण शक्तीनिशी रणांगणात उतरले आहेत. त्यांची यंदाच्या निवडणुकीतील कामगिरी कशी राहते, याकडे सर्वांचंच लक्ष आहे.
केरळ सध्या भगव्या रंगात न्हाऊन निघाल्याप्रमाणे दिसतोय. सत्ताधारी लेफ्ट डमोक्रेटिक फ्रंट (LDF) आणि काँग्रेसप्रणित युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंटचे (UDF) झेंडे आणि पोस्टर भाजपच्या तुलनेत कमी दिसतात.
पण, या सगळ्या लढाईत डावे पक्ष थोडे मजबूत दिसून येतात. त्यांच्या काही जागा कमी होऊ शकतात. पण खरी लढाई ही LDF आणि UDFयांच्यातच आहे.
भाजप केरळमध्ये अस्तित्व निर्माण करण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे. दिल्लीहून पक्षाचे अनेक मोठे नेते प्रचारसभा घेताना दिसतात. स्थानिक नेत्यांना ते प्रोत्साहन देताना दिसतात.
पण राज्यात निवडणूक जिंकणं आणि सरकार बनवणं सध्यातरी शक्य नाही, याची स्थानिक नेत्यांना कल्पना आहे.
नेमम मतदारसंघाचा निकाल आणि भवितव्य
काँग्रेस नेते शशि थरूर यांनी 2019 ची लोकसभा निवडणूक तिरूवनंतपुरममधून जिंकली होती. पण या लोकसभा मतदारसंघातील नेमम विधानसभा मतदारसंघात त्यांना आपल्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा 12 हजार मतं कमी मिळाली होती.
सुमारे दोन लाख मतदारसंख्येचा नेमम मदरासंघ केरळमध्ये भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाऊ लागला आहे.
2016 मध्ये इथून भाजपचे ज्येष्ठ नेते ओ. राजगोपाल येथून विजयी झाले होते. आतापर्यंत केरळमधून विधानसभेत निवडून गेलेले ते एकमेव नेते आहेत. त्यामुळे त्यांचं नाव पक्षाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवलं जाईल, हे नक्की.
ओ. राजगोपाल यांना हे यश मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे वाट पाहावी लागली होती. अखेर, जनतेने सहानुभूती दाखवून आपल्याला निवडलं, असं ते हसून सांगतात.
ते म्हणाले, "मी इतक्या वेळा निवडणूक लढलो की लोकांच्या परिचयाचा झालो होतो. लोकांनी माझ्याबाबत सहानुभूती दाखवली. हा बिचारा इतक्या वेळा निवडणूक लढवतो. यावेळी त्याला संधी देऊन बघू, असं म्हणत लोकांनी मला निवडून दिलं."
पुढे ते गंभीरपणे म्हणतात, "नरेंद्र मोदी पंतप्रधान बनल्यानंतर भाजप इथं वाढत चालला आहे."
ओ. राजगोपाल आता 93 वर्षांचे आहेत. यंदाच्या निवडणुकीत ते उभे राहणार नाहीत. पण पक्षाच्या मार्गदर्शक मंडळींमध्ये सहभागी होण्यासही ते तयार नाहीत.
ते पूर्णपणे निरोगी आहेत. सध्या ते फक्त आपले सहकारी आणि नेमम येथून पक्षाचे उमेदवार असलेले कुम्मगन राजशेखरन यांच्यासाठी प्रचार करत आहेत.
नेमममध्ये एका प्रचारसभेत दुपारच्या उन्हात ते कुम्मनम राजशेखरन यांच्यासोबत व्यासपीठावर बराच वेळ उपस्थित होते.
तिथं त्यांनी भाषण देत कुम्मनम यांना मतदान करण्याचं आवाहन केलं. या सभेत सर्वसामान्य लोकांसोबतच कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह यावेळी पाहायला मिळाला.
भाजप समर्थकांचं म्हणणं काय?
राजू एक वाहनचालक म्हणून काम करतात. ते भाजप समर्थक आहेत. भाजप या निवडणुकीत तिसरी शक्ती म्हणून पुढे यावा, असं राजू यांना वाटतं. त्यामुळेच आपण भाजपला पाठिंबा देत असल्याचं त्यांनी सांगितलं.
ते सांगतात, "माझं पूर्ण कुटुंब LDF ला डोळे झाकून मत देतं. केरळमध्ये भाजप आणि NDA लोकांना आवडत नाही. पण LDF आणि UDF या दोघांनाही मी कंटाळलो आहे. कधी LDF सत्तेत येते तर कधी UDF. पण तिसऱ्या पक्षाला कधीच संधी मिळत नाही. या दोघांच्या राजकारणाला मी कंटाळलो आहे. त्यामुळे मी घरच्यांच्या विरोधात जाऊन भाजपला पाठिंबा देणं सुरू केलं.
नेमम विधानसभा मतदारसंघात बहुतांश भाग शहरी आहे. तसंच हा परिसर पूर्णपणे सुशिक्षित मानला जातो. केरळमध्ये हिंदू धर्मीयांची संख्या 55 टक्के आहे. पण नेमममध्ये हीच संख्या 66 टक्के इतकी आहे. इथले लोक राजशेखरन यांना चांगलंच ओळखतात.
राजशेखरन हे मिझोरम राज्याचे राज्यपाल होते. त्यांनी लोकसभा निवडणूकही लढवली होती. ते प्रचंड लोकप्रिय आणि अनुभवी असल्याचं ओ. राजगोपाल यांनी सांगितलं.
स्थानिक भाजप नेत्यांच्या मते नेमम येथून कुम्मनम राजशेखरन यांचा विजय आणि पक्षाने ही जागा पुन्हा मिळवणं भविष्याच्या दृष्टीकोनातून अत्यंत महत्त्वाचं आहे. राजशेखरन यांच्या प्रचारासाठी पाठवण्यात आलेले राधाकृष्णन RSS कडून पाठवण्यात आलेले आहेत.
नेमम भाजपसाठी प्रतिष्ठेचा विषय बनल्याचं त्यांनी सांगितलं. शिवाय या ठिकाणाहून पक्षाचं केरळमधलं भविष्य ठरणार आहे. पक्षाचा केरळमध्ये किती विस्तार होऊ शकतो, याचा अंदाज येथून येऊ शकेल.
त्यामुळेच विरोधी पक्ष याठिकाणी कमळ उमलू न देण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. काँग्रेसचं याठिकाणी विशेष लक्ष असल्याची माहिती नेममच्या बाजूच्याच कोवलम मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे उमेदवार आणि आमदार एम. विन्सेंट यांनी दिली.
ते सांगतात, "काँग्रेसने याठिकाणी तगडा उमेदवार दिला आहे. आम्ही येथून मुरलीधरन यांना तिकीट दिलं. ते विजय मिळवतील याचा आम्हाला विश्वास आहे."
के. मुरलीधरन राज्याचे माजी मुख्यमंत्री के. करूणाकरन यांचे चिरंजीव. केरळ काँग्रेसमध्ये त्यांना आदराचं स्थान आहे. तसंच सत्ताधारी LDF ने याठिकाणी व्ही. शिवंकुट्टी यांना मैदानात उतरवलं आहे.
राजगोपाल यांच्याकडून पराभूत होण्यापूर्वी 2011 ला त्यांनी येथून विजय मिळवला होता.
भाजपची प्रत्यक्ष स्थिती
पश्चिम बंगालप्रमाणेच केरळमध्येही भाजपने जिंकण्यासाठी सर्वकाही पणाला लावलं आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यात अनेक सभा घेतल्या. पुढेही अनेक ठिकाणी ते सभा घेणार आहेत.
भाजपचे राष्ट्रीय नेते केरळमध्ये भाजपच्या विजयाचा दावा करत आहेत. पण पक्षाचे स्थानिक नेते येथील प्रत्यक्ष परिस्थिती चांगलेच जाणून आहेत.
ओ. राजगोपाल सांगतात, "मला वाटतं आम्ही दोन आकडी संख्या पार करू. भाजपला 10 पेक्षा जास्त जागा मिळू शकतात. ही पक्षासाठी उत्साहजनक बाब असेल."
तर दुसरीकडे, भाजपने नेममची जागा वाचवली तरी त्यांच्यासाठी ती मोठी गोष्ट असेल, असं विरोधकांनी म्हटलं. तज्ज्ञांच्या मते, भाजपच्या जागा वाढल्या नाहीत तरी मतांचं प्रमाण वाढू शकतं.
डॉ. जे. सुभाष केरळ युनिव्हर्सिटीचे माजी कुलगुरू आहेत. त्यांच्या मते, "यंदाच्या निवडणुकीत भाजपला जास्त जागा मिळणार नाहीत. पण मागची विधानसभा तसंच दोन वर्षांपूर्वीच्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत पक्षाचं मतदान वाढू शकतं.
केरमध्ये 140 जागांसाठी 6 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तज्ज्ञांच्या मते, भाजपने आव्हान निर्माण करण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे. पण तरीही LDF आणि UDF या दोन परंपरागत प्रतिस्पर्धींमध्येच लढाई होईल. या दोन्ही आघाड्याच केरळमध्ये आलटून पालटून निवडणुका जिंकतात.
पण गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 15 टक्के मतं मिळवली होती, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्या निवडणुकीत भाजपला नऊ ठिकाणी 30 टक्क्यांपेक्षा जास्त मतं मिळाली होती. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही भाजपने चांगली कामगिरी केली.
नेममचे भाजप उमेदवार कुम्मनम राजशेखरन सांगतात, "नुकतेच आम्ही 18 पंचायत निवडणुकांमध्ये विजय मिळवला. दोन नगरपालिकांमध्ये आम्ही सत्तेत आहोत. आमचं मतांचं प्रमाण 15 टक्क्यांवरून 18 टक्क्यांवर गेलं आहे. या निवडणुकीत आम्ही यापेक्षा चांगली कामगिरी करू."
भाजपने ख्रिश्चन समाजाला आकर्षित करण्यासाठी पंतप्रधान आणि गृहमंत्री यांची मदत घेतली. RSSचे अनेक नेते अनेकवेळा ख्रिश्चन धार्मिक नेत्यांना भेटले. पण पक्ष राज्यात कशी कामगिरी करतो हे ईव्हीएममध्येच दिसून येईल.
केरळमध्ये भाजपचं भवितव्य काँग्रेसवर अवलंबून आहे का?
एशिया नेट न्यूज नेटवर्कचे मुख्य संपादक एम. जी. राधाकृष्णन सांगतात, "आगामी निवडणूक डाव्यांपेक्षाही कितीतरी पटीने काँग्रेससाठी जास्त महत्त्वाची आहे. या निवडणुकीत काँग्रेस म्हणजेच UDF चा पराभव झाल्यास इथं पक्षाला मोठं नुकसान होईल. इतर राज्यांप्रमाणेच नेते पक्ष सोडून जाण्याची स्थिती निर्माण होऊ शकते.
डॉ. जे. प्रभाष यांचंही मत असंच आहे. ते सांगतात, भाजप किंवा NDA भविष्यात केरळच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. काँग्रेस यंदाच्या निवडणुकीत कशी कामगिरी करते, यावर हे अवलंबून आहे. काँग्रेस सत्तेपासून दूर राहण्याचे परिणाम सहन करू शकणार नाही. नेते पक्ष सोडून जाऊ शकतात.
अशा स्थितीत भाजपचं लक्ष्य या निवडणुकीत मतांचं प्रमाण वाढवण्यावरच असू शकतं. काँग्रेसचा पराभव व्हावा, असंच त्यांचं मत असेल.
जाणकारांच्या मते, यंदाच्या निवडणुकीतही LDF राज्यात सत्तेत येईल. पण त्यांच्या जागा गेल्या वेळीच्या तुलनेच काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.