निरज प्रियदर्शी
बिहार विधानसभेत मंगळवारी (23 मार्च) प्रचंड राडा पाहायला मिळाला. या घटनेची चर्चा बिहारसह देशात सर्वत्र सुरू आहे.
विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव याबाबत माहिती देताना सांगतात, "आज बिहार विधानसभेच्या कामकाजादरम्यान एक काळा कायदा मांडण्यात आला. याविरोधात आम्ही सगळे उभे होतो. बिहारच्याच नव्हे तर देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच सभागृहाच्या आता पोलीस दल बोलवण्यात आलं."
"पोलीस अधीक्षक आणि इतर अधिकारी आमदारांना मारहाण करत फरपटत बाहेर आणत होते. अतिमागासवर्गीय समाजाताली महिला आमदार अनीतादेवी यांनाही अशाच प्रकारे केस ओढून साडीला धरत फरफटत बाहेर आणलं गेलं. देशातील नागरिक आजचा दिवस हा काळा दिवस म्हणून लक्षात ठेवतील," असं यादव म्हणाले.
सोशल मीडियावरही याबाबत अनेक व्हीडिओ व्हायरल होत आहेत. यामध्ये सभागृहाच्या आतमध्ये पोलीस आणि प्रशासनातील लोकांकडून आमदारांना लाथाबुक्क्यांनी मारहाण होताना दिसत आहेत.
विधीमंडळाच्या आत झालेल्या या हिंसक झटापटीत दोन महिला आमदारांसह एकूण 12 आमदार जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.
शिवाय, या घटनेत अनेक पोलीस आणि पत्रकारही जखमी झाले. सगळ्यांना उपचारासाठी PMCH रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
नव्या पोलीस विधेयकाचा विरोध
गेल्या काही दिवसांपासून विधीमंडळात बिहारमध्ये सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले आहेत.
दरम्यान, मंगळवारी बिहार विशेष सशस्त्र पोलीस विधेयक, 2021 हे विधेयक प्रचंड गोंधळात मंजूर करण्यात आलं. यावरून वरील घटना घडली.
विरोधी पक्षाच्या मते, या कायद्यामुळे पोलिसांना विनावॉरंट कोणालाही अटक करण्याचे अधिकार मिळतात. त्यामुळे फक्त शंकेवरूनही पोलीस एखाद्या व्यक्तीला अटक करू शकतात. पण, हा कायदा सामान्य पोलिसांसाठी नसून विशेष सशस्त्र पोलीस दलाशी संबंधित असल्याचं सत्ताधाऱ्यांनी म्हटलंय.
बिहारचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव बीबीसीशी बोलताना म्हणाले, "हे विधेयक आणून सरकार पोलिसांना आपले गुंड बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. हिटलरप्रमाणेच नितीशकुमार विचार करत आहेत. पोलिसांनी कोणालाही विनावॉरंट घरात घुसून अटक करावी, असं नितीशकुमार यांना वाटतं. आम्ही या कायद्याचा विरोध करत होतो, तेव्हा पोलिसांना बोलावून आमच्या आमदारांना मारहाण करण्यात आली. आम्ही ज्या कायद्याचा विरोध करत होतो. त्याच कायद्याचा वापर आमच्याविरुद्ध करण्यात येत आहे."
सभागृहाआधी रस्त्यावरही झाला राडा
बिहार विधानसभेच्या आतमध्ये आमदारांसोबत मारहाण होण्यापूर्वी दुपारी पाटण्याच्या रस्त्यांवरही राष्ट्रीय जनता दलाच्या कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची पोलिसांसोबत हिंसक झटापट झाल्याचं पाहायला मिळालं.
नव्या पोलीस विधयेकाशिवाय वाढती महागाई, बेरोजगारी, गुन्हेगारी आणि भ्रष्टाचार यांच्यासारख्या मुद्द्यांवर विरोधी पक्ष नेते तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं.
जे. पी. गोलंबर या ठिकाणापासून मोर्चा काढत विधानसभेला घेराव घालण्याचं नियोजन यादरम्यान करण्यात आलं होतं.
पण पाटणा जिल्हा प्रशासनाने मोर्चाला परवानगी दिली नाही. तरीही हजारो कार्यकर्यांना घेऊन तेजस्वी यादव यांनी मोर्चा सुरू केला.
डाकबंगला चौकात पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. पण कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत बॅरिकेडींग तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर याठिकाणी गोंधळाचं वातावरण निर्माण झालं.
पोलिसांनी पाण्याचे फवारे मारत आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला. पण तरीही लोक मागे फिरले नाहीत.
त्यानंतर दोन्ही बाजूंनी दगडफेक झाली. पोलिसांकडून लाठीमार करण्यात आला. थोड्याच वेळात डाकबंगला चौकाला रणांगणाचं स्वरुप आलं. लोकांच्या चपला फाटलेले कपडे, झेंडे यांचा ढीग याठिकाणी जमा झाला होता.
या घटनेत दहा-पंधरा नेते आणि कार्यकर्ते जखमी झाले. तर काही पोलीस आणि पत्रकारही यामध्ये जखमी झाले.
मोर्चाचं नेतृत्व करणारे तेजस्वी यादव आणि तेजप्रताप यादव दगडफेकीदरम्यान मध्येच अडकले होते.
विनापरवाना मोर्चा काढल्याप्रकरणी तसंच हिंसाचार पसरवल्याप्रकरणी पोलिसांनी तेजस्वी आणि तेजप्रताप यादव यांना काही वेळ ताब्यात घेऊन नंतर सोडून दिलं.
सभागृहात काय घडलं?
बिहारच्या विरोधी पक्षाने नव्या पोलीस विधेयकाला विरोध दर्शवण्यासाठी एक विशेष रणनिती अवलंबली.
एका बाजूला तेजस्वी यादव आणि त्यांचे समर्थक रस्त्यावर आंदोलन करत होते. तर दुसरीकडे सभागृहाच्या आतमध्ये विरोधी पक्षाने गदारोळ घातला.
यामुळे सभागृहाचं कामकाज वारंवार स्थगित करण्यात आलं. मोकळ्या जागेत घुसून निषेध नोंदवत काही आमदार विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीपर्यंत येऊन पोहोचले. त्यांनी अध्यक्षांच्या हातून विधेयकाची प्रत हिसकावून फाडून टाकली.
या गोंधळानंतरही सत्ताधारी पक्ष कायदा मंजूर करण्याच्या भूमिकेवर ठाम होता. प्रस्ताव मंजूर करण्यासाठी सभागृहाचं अधिवेशन सुरू करण्याचा प्रयत्न अनेकवेळा झाला. पण विरोधी पक्षाच्या आमदारांनी अध्यक्षांना कामकाजात भाग घेण्यापासून रोखलं. त्यांनी त्यांच्या चेंबरसमोरच धरणे आंदोलन सुरू केलं.
थोड्या वेळाने सभागृहाच्या आतमध्येही पोलिसांना बोलावण्यात आलं. पाटण्याचे पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी दोघेही याठिकाणी पोहोचले.
पोलीस आणि प्रशासनाचे लोक सभागृहात दाखल होताच आमदारांचं आंदोलन आणखी तीव्र झालं.
दरम्यान, आमदारांसोबत झटापटही झाली. विधानसभेच्या मार्शलनी त्यांना फरफटत बाहेर काढलं.
पुरुष आमदारांसोबत अशी वागणूक पाहून विरोधी पक्षातील महिला आमदारसुद्धा खाली उतरून निषेध नोंदवू लागल्या. त्यांना महिला पोलिसांनी बाहेर काढलं.
पुरुष आमदारांमध्ये राजदचे सुधाकर सिंह, सतीश साद यांच्यासह CPIM चे के. सत्येंद्र कुमार आणि महिला आमदार प्रतिमा कुमारी आणि अनीतादेवी हे गंभीर जखमी झाले आहेत.
आमदारांना मारहाण झाल्यानंतर काही वेळाने कामकाज पुन्हा सुरू झालं. पण विरोधी पक्षाने यावेळी कामकाजावर बहिष्कार टाकत बाहेर जाण्याचा निर्णय घेतला.
अखेर, विरोधी पक्षाच्या अनुपस्थितीतच नवीन पोलीस विधेयक सभागृहात मंजूर करून घेण्यात आलं.