- स्वाती पाटील राजगोळकर
मुंबईहून कोल्हापूरला जाणारी महालक्ष्मी एक्सप्रेस शनिवारी (27 जुलै) पहाटे वांगणीजवळ अडकली. उल्हास नदीला पूर आल्याने अंबरनाथ, बदलापूर, वांगणी परिसरात पाणी शिरलं आणि याचा परिणाम रेल्वेसेवेवरही झाला.
महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये जवळपास 700 प्रवासी अडकले होते. तब्बल 12 तासांनंतर NDRF च्या मदतीने प्रवाशांची सुटका करण्यात आली.
कालच्या मुसळधार पावसामुळे महालक्ष्मी एक्स्प्रेसमधील प्रवाशांना त्रास सहन करावा लागला असला, तरी ही एक्स्प्रेस कायमच कोल्हापूरकरांच्या पसंतीची राहिली आहे.
सर्वसामान्य माणसांपासून राजकीय नेते, उद्योगपती, पर्यटक सगळेच मुंबईतून कोल्हापूरला जाण्यासाठी 'महलक्ष्मी'ला पसंती देतात. महालक्ष्मी एक्स्प्रेस कोल्हापूरकरांना इतकी का आवडते, याचा आढावा बीबीसी मराठीच्या प्रतिनिधी स्वाती पाटील राजगोळकर यांनी घेतला आहे...
छत्रपती शाहू महाराज टर्मिनस ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अशी प्रवास करणारी महालक्ष्मी एक्सप्रेस गेली कित्येक वर्ष केवळ ट्रॅकवर नाही तर प्रवाशांच्या मनातही धावतेय.
महालक्ष्मी एक्सप्रेस कोल्हापूरहून रोज रात्री साडेआठ वाजता मुंबईसाठी रवाना होते. तर सकाळी 7 वाजता मुंबईत पोहचते. हीच ट्रेन पुन्हा संध्याकाळी 8 वाजून 20 मिनिटांनी निघून सकाळी 7 वाजून 20 मिनिटांनी कोल्हापूरला पोहचते. सकाळी साडेअकरा वाजता ही ट्रेन हरिप्रिया या नावाने तिरुपतीसाठी रवाना होते. त्यामुळं आंध्र प्रदेशला जाणारी आणि येणारी लोकही या गाडीला पसंती देतात.
महालक्ष्मी एक्सप्रेस ही कोल्हापूरकरांसाठी जिव्हाळ्याची गाडी आहे. कोल्हापूरचे व्यावसायिक आनंद माने गेली 40 वर्ष याच गाडीने प्रवास करतात. चेंबर ऑफ कॉमर्सचे संचालक असलेले माने यांना व्यावसायानिमित्त वारंवार मुंबईच्या फेऱ्या कराव्या लागतात. अशावेळी महालक्ष्मीमुळं दिवसभरात काम करुन पुन्हा रात्री परत येता येतं. त्यामुळं हॉटेलचा खर्च वाचतो. वेळ वाचतो. येता जाता पुरेशी झोप झाल्याने कामाचा उत्साह कायम राहतो. असं माने सांगतात.
कोल्हापूरच्या आसपासच्या भागातून जवळपास 300 ट्रॅव्हल बसेस दररोज मुंबईला जातात. पण गेल्या 40 वर्षात ही ट्रेन कधी रिकामी राहिली असं झालं नाही. इतकी प्रवाशांची या ट्रेनला पसंती आहे.
आज जेव्हा महालक्ष्मी एक्सप्रेस पुराच्या पाण्यात अडकली हे समजलं तेव्हा आधी विश्वास बसला नाही. कारण इतक्या वर्षांत कधीच असं घडलं नाही. ट्रेनच्या ट्रॅकवर कधी पाणी साठल्याने असा प्रसंग घडल्याची ही पहिलीच वेळ असल्याने या मागे निसर्ग नाही तर मानवनिर्मित कारण असल्याचं वाटतं. त्याचा शोध घेतला पाहिजे अशी मागणी यावेळी माने यांनी केली.
कोल्हापूरमध्ये राहणारे जयेश ओस्वाल हे गेली 25 वर्षं कोल्हापूरहून मुंबईला जाण्यासाठी महालक्ष्मी एक्सप्रेसने प्रवास करतात यामागे कारण सांगताना गाडीची वेळ सोयीस्कर असल्याचं त्यांनी सांगितलं. गेली बरीच वर्षं ही गाडी ठरलेल्या वेळेतच पोहचते, हे या गाडीचं वैशिष्ट्य असल्याचं त्यांनी सांगितलं.
गाडी सुटण्याची आणि पोहचण्याची वेळ सोयीस्कर असल्यानं आराम करणं आणि दिवसभर काम करुन पुन्हा आरामदायी प्रवास होत असल्याने आपण याच गाडीने प्रवास करत असल्याचं ओस्वाल यांनी सांगितलं.
ओस्वाल हे मूळचे राजस्थानचे असल्याने राजस्थानला जाण्यासाठी त्यांना मुंबईला जावं लागतं. कोल्हापूरमधून आठवड्यातून एकदा अहमदाबादसाठी गाडी जाते. ती सोयीची नसल्यानं दररोज जाणारी महालक्ष्मी गाडी सोयीची असल्याचं त्यांनी सांगतिलं. आधी महालक्ष्मीने मुंबई आणि तिथून राजस्थानला जाणं जास्त सोपं असल्याने ते सहकुटंब याच गाडीने प्रवास करतात.
महालक्ष्मी एक्सप्रेस स्वच्छ असण्यासोबतच गाडीत वेळेवर सर्व सोयीसुविधा उपलब्ध होत असल्याचं दिपक बियाणी या प्रवाशाने सांगितलं.
महालक्ष्मी एक्सप्रेस ही गेल्या 40 वर्षांपासूनची माझी आवडती गाडी आहे, असं मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.
चंद्रकांत पाटील यांनी शालेय आणि महाविद्यालयीन जीवन मुंबई इथं पूर्ण केलं असल्याने पहिल्यापासूनच कोल्हापूरला येण्यासाठी त्यांनी महालक्ष्मी एक्सप्रेसने ये-जा केले आहे. पण आमदार आणि मंत्री झाल्यानंतर तर महालक्ष्मी एक्सप्रेस हे आपलं घरच झाल्याचं मंत्री पाटील यांनी म्हटलंय.
महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर पाटील यांना संघटनेचं काम करण्यासाठी वारंवार फिरावं लागायचं त्यावेळी घरच्यांना भेटायला येण्यासाठी त्यांनी महालक्ष्मी एक्सप्रेसला पसंती दिलीय. मुसळधार पावसामुळं नदीला पूर आला त्यामुळं महालक्ष्मी बाबत आजची झालेली घटना अनपेक्षित होती पण अंबाबाईच्या कृपेने सर्व प्रवासी सुखरूप असल्याचं पाटील यांनी सांगितलं. दिवसभर काम उरकून रात्रभर प्रवासादरम्यान आराम करता येत असल्यानं महालक्ष्मी एक्सप्रेस बेस्ट ट्रेन असल्याचं पाटील यांनी सांगितलं.
विशेष म्हणजे, या घटनेच्या दोनच दिवस आधी चंद्रकांत पाटील मुंबईहून कोल्हापूरला महालक्ष्मी एक्स्प्रेसने गेले होते.
तर माजी खासदार राजू शेट्टी यांनी तर मुंबईला येण्यासाठी बऱ्याचदा याच गाडीने प्रवास केला आहे. सांगली इथं रात्री 10 वाजता जेवण करुन या गाडीने प्रवास करत आराम करता येतो. तसंच दुसऱ्या दिवशी कामं आटोपून पुन्हा रात्री परत येता येऊ शकतं असं शेट्टी म्हणाले. मात्र ही गाडी सुपरफास्ट करण्याची गरज असल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं.
अशी ही वर्षानुवर्षे अनेकांच्या जिव्हाळ्याची झालेली गाडी आज पुराच्या पाण्यात एका ठिकाणी ठप्प झालेली पाहून अनेकांनी हळहळ व्यक्त केली. पुन्हा अशी वेळ येउ नये या साठी यामागच्या कारणाचा शोध घेण्याची मागणी ही यावेळी प्रवाशांनी केली.