Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महालक्ष्मी एक्सप्रेस- सर्व प्रवाशांची सुटका

महालक्ष्मी एक्सप्रेस- सर्व प्रवाशांची सुटका
बदलापूर आणि वांगणीदरम्यान अडकून पडलेल्या महालक्ष्मी एक्सप्रेसमधील 600 हून अधिक प्रवाशांना ट्रेनमधून बाहेर काढण्यात आलं आहे. वांगणी येथे महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये प्रवासी अडकल्याच्या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ मदत कार्यावर देखरेख ठेवण्याचे आदेश दिले होते. संपूर्ण यंत्रणा तत्परतेने मदतकार्य करीत असून प्रवाशांना सर्वतोपरी मदत केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
 
या मदतकार्यासंदर्भात मुख्यमंत्री आज सकाळपासून संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेच्या संपर्कात आहेत. ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे गेल्या बारा तासांपासून बदलापूर आणि वांगणीदरम्यान महालक्ष्मी एक्सप्रेस अडकून पडली आहे. प्रवाशांच्या सुटकेसाठी NDRF च्या बोटी तसंच नौदलाची मदत घेण्यात आली आहे.
 
एनडीआरएफचे 4 चमू घटनास्थळी दाखल झाल्या असून, 8 बोटींच्या सहाय्याने प्रवाशांना बाहेर काढले गेले. नौदलाचे 7 चमू, भारतीय हवाईदलाचे दोन हेलिकॉप्टर्स, लष्कराच्या दोन तुकड्या स्थानिक प्रशासनासह तैनात करण्यात आल्या आहेत. परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे.
 
केंद्रीय मंत्री नित्यानंद राय यांनी मुख्यमंत्र्यांना दूरध्वनी करून केंद्र सरकारतर्फे आवश्यक ती सर्व मदत पुरविली जाईल, असे सांगितले आहे. 
आतापर्यंत सहाशेहून अधिक लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. त्यात नऊ गरोदर महिलांचा सुद्धा समावेश आहे. 37 डॉक्टरांसह रूग्णवाहिकाही तैनात करण्यात आल्या आहेत. त्यात स्त्रीरोगतज्ञांचाही समावेश आहे. 
 
सह्याद्री मंगल कार्यालय येथे सर्वांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली असून तेथेच भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.  पुढच्या प्रवासासाठी 14 बसेस आणि 3 टेम्पोची व्यवस्था करण्यात आली आहे. महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये अडकलेल्या प्रवाशांनी कुठल्याही स्थितीत घाबरू नये. एनडीआरएफ, लष्कर, नौदल, हवाईदल, स्थानिक प्रशासन, रेल्वे प्रशासन, पोलिस अशा सर्व संस्था आपल्या मदतीसाठी आहेत, अशी माहिती देऊन मुख्यमंत्र्यांनी सर्व प्रवाशांना आश्वस्त केले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चित्रा वाघ यांची राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिट्टी