-विनीत खरे
मुंबईचे रहिवासी 34 वर्षीय उद्योजक आणि फोटोग्राफर उज्ज्वल पुरी 9 मार्च रोजी सकाळी हरिद्वारमध्ये दाखल झाले.
त्यावेळी त्यांच्याकडे मास्क, सॅनिटायझरसह व्हिटॅमिनच्या गोळ्याही होत्या.
डेहराडूनच्या विमानात बसण्यापूर्वी त्यांना वाटलं की हरिद्वारमध्ये अत्यंत कडेकोट सुरक्षा बंदोबस्त असेल. आपल्याला प्रवेश मिळण्यात अडचणी येतील, असंही त्यांना वाटलं.
उज्ज्वल यांनी आपला कोव्हिड निगेटिव्ह टेस्ट रिपोर्ट सरकारी वेबसाईटवर रजिस्टर करण्याचा प्रयत्न केला. पण वेबसाईट चालत नव्हती.
ते हरिद्वारमध्ये पोहोचले, पण विमानतळावर किंवा बाहेर पडल्यानंतर कुठेही त्यांची तपासणी झाली नाही.
'हर की पौडी'मध्ये त्यांनी काही फोटो काढले. तिथं बहुतांश भाविकांच्या तोंडावर मास्क नव्हते. ज्यांच्या तोंडावर मास्क होता त्यापैकी बहुतांश लोकांचा मास्क नाकाच्या खाली किंवा हनुवटीवर तरी सरकवलेला होता.
उज्ज्वल यांनी रात्री एका घाटावर फोटो काढला. तिथंही घाटाच्या पायऱ्यांवर विनामास्क लोकांचीच गर्दी होती.
काही महिलांनी भावपूर्ण मुद्रेने हात जोडले आहेत. काही जण कपडे बदलत आहेत. कुणी टॉवेलने केस कोरडे करत आहे. कुणी मोबाईल पाहण्यात गुंग आहे. कुणाच्या काखेत बाळ आहे, तर कुणी दुसऱ्यांसोबत गप्पा मारताना दिसत आहे.
ते सांगतात, "तिथं सोशल डिस्टन्सिंग नावालाही नव्हतं. संध्याकाळच्या आरतीच्या वेळी लोक एकमेकांना खेटून उभे होते."
उज्ज्वल तीन दिवस कुंभमेळ्यात राहिले. त्यादरम्यान तीन दिवसांत फक्त एकदा बाबा लोकांसोबत सेल्फी काढण्यासाठी मी मास्क काढला होता.
उज्ज्वल म्हणतात, "मी सगळं काही देवाच्या भरवशावर सोडून दिलं होतं."
तीन दिवसांनी उज्ज्वल घरी परतले. पण ते त्यावेळी घाबरलेले होते.
ते म्हणाले, "मी परतल्यानंतर सर्वप्रथम कोरोना चाचणी करून घेतली. घरात प्रवेश करताच मी स्वतःला एका खोलीत कैद करून घेतलं. माझ्या घरात माझे आई-वडील आहेत. त्यामुळे मी खबरदारी बाळगली होती."
सरकारी आकडेवारीनुसार, भारतात कोरोनामुळे आतापर्यंत 1 लाख 33 हजार जणांचा मृत्यू झाला आहे.
अनेक राज्यांमध्ये रुग्णालयात बेड, ऑक्सिजन, औषधं यांची प्रचंड टंचाई आहे. लोक रुग्णालयात जागा मिळवण्यासाठी धावपळ करताना दिसत आहेत. स्मशानभूमीतही अंत्यविधीसाठी रांगा आहेत. अशा स्थितीत कुंभमेळ्यातील लाखोंची गर्दी सुपरस्प्रेडर इव्हेंट म्हणून संबोधली जात आहे.
कोरोना काळातही भाजपशासित उत्तराखंडमध्ये आयोजित कुंभमेळा म्हणजे सत्ताधारी पक्षाचं हिंदुत्वाचं राजकारण असल्याचं म्हटलं जात आहे.
कोरोना काळात कुंभमेळा टाळायला हवा होता, असं मसुरी येथे राहणारे इतिहास अभ्यासक गोपाल भारद्वाज यांना वाटतं.
ते म्हणाले,"कुंभमेळ्यात स्नानासाठी न जाणारे लोकांच्या वाट्याला पापाचे भागिदार बनतात का? हे माणसाच्या मनःशांतीसाठी आहे. जर घरातच कुणी आजारी पडणार असेल, तर काय शांतता मिळेल?"
गोपाल भारद्वाज सांगतात, "पूर्वी कुंभमेळा दोन आठवड्यांचाच होत असे. पण गेल्या 35-40 वर्षांत बाजारीकरणामुळे याचा कालावधी वाढत गेला."
ते सांगतात, "कुंभमेळ्यातील प्रमुख स्नान बैसाखीचं असतं. पण नंतर मकर-संक्रांतीला याच्याशी जोडण्यात आलं. महाशिवरात्रही मध्ये आली. शिवरात्र एक वेगळा आणि महत्त्वाचा सण आहे. पण हे सगळे सण एकमेकांशी जोडून याचा कालावधी साडेतीन महिन्यांपर्यंत वाढवण्यात आला."
गोपाल यांच्या मते, कुंभचा अर्थ होतो धार्मिक आचरण. पूर्वी याला शास्त्रीय अर्थ होता. आपला धर्म कसा वाचवावा याबाबत त्यामध्ये चर्चा केली जायची. हिंदू धर्म संरक्षणासाठी मोठ-मोठे आखाडे बनवण्यात आलेले आहेत.
यामध्ये हिंदू धर्मात एखादी वाईट प्रवृत्ती आली तर त्याला दूर कसं ठेवावं, याविषयी चर्चा होत असते. पण हे हळूहळू कमी होत गेलं. आताच्या काळात इतका वेळ कुणाला आहे? इतक्या विद्वान व्यक्ती आहेत का? सध्या प्रत्येक गोष्टीचं बाजारीकरण करण्यावरच जास्त भर दिला जात आहे."
लोकांमध्ये भीतीचं वातावरण
कोरोना काळात होत असलेल्या कुंभमेळ्यात हरिद्वारमध्ये धर्मशाळा चालवणारे मिथिलेश सिन्हा यांच्या मते स्थानिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे.
ते सांगतात, "इथं येणारे भाविक एक ते दोन दिवसांत निघून जातात. पण ते स्थानिकांना कोणता प्रसाद देऊन जातील, याबाबत काहीच सांगता येत नाही. भक्तीबद्दल चर्चा करण्याची वेळ येते तेव्हा लोकांना समजावणं अत्यंत अवघड आहे."
कोरोना व्हायरसला आस्तिक आणि नास्तिक यांच्यातील फरक माहीत नाही.कुंभमेळ्यात सुरुवातीपासून एकूण किती कोव्हिड पॉझिटिव्ह रुग्ण सापडले याची स्पष्ट माहिती मिळू शकलेली नाही. पण एका अधिकाऱ्यांनी प्रतिदिन दोनशेच्या आसपास रुग्ण सापडत असल्याबाबत सांगितलं.
कुंभमेळ्यात कोव्हिड नोडल ऑफिसर डॉ. अविनाश खन्ना यांनी दिलेल्या माहितीनुसार याठिकाणी 50 कोरोना चाचणी केंद्र आहेत.
कुंभमेळ्यादरम्यान धर्मशाळेत वास्तव्यासाठी येणाऱ्या लोकांची RTPCR चाचणी तर परतणाऱ्या लोकांची अँटीजन चाचणी करण्यात येत आहे, अशी माहिती डॉ. खन्ना यांनी दिली.
पण घरी परतलेल्या कोव्हिड पॉझिटिव्ह लोकांपासून हा व्हायरस किती पसरत जाईल, याबद्दल सर्वात जास्त चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
न्यायालयातील याचिका
याच भीतीचा उल्लेख स्थानिक रहिवासी सच्चिदानंद डबराल यांनी नैनीताल हायकोर्टात दाखल केलेल्या आपल्या जनहित याचिकेत केला आहे.
गेल्या वर्षी त्यांनी ही याचिका दाखल केली होती. कुंभमेळ्यात लाखो नागरिक येतील त्यावेळी कोव्हिड साथ नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा प्रशासन कसं काम करू शकेल, हा प्रश्न त्यांनी याचिकेत विचारला होता.
सच्चिदानंद यांची एक फार्मा कंपनी आहे. तसंच ते एक औषधाचे दुकान चालवतात.
त्यांच्या मते, नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये हरिद्वारमधील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आली होती.
त्यावेळी त्रिवेंद्र सिंह रावत मुख्यमंत्री होते. त्यांनी त्यावेळी कुंभमेळ्याला येणाऱ्या नागरिकांचा निगेटिव्ह RTPCR चाचणी अहवाल अनिवार्य असल्याचं म्हटलं होतं.
पण 10 मार्चला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे नवे मुख्यमंत्री तीरथसिंह रावत यांनी कुंभमेळ्यावर येणाऱ्या नागरिकांवर कोणतीच बंधनं घातली नाहीत.
11 मार्च रोजी महाशिवरात्रीच्या दिवशी 36 ते 37 लाख जण हरिद्वार घाटावर दाखल झाले. तेव्हापासून हरिद्वारची परिस्थिती बिघडण्यास सुरुवात झाल्याचं सच्चिदानंद यांनी सांगितलं.
इथं रोज 50 हजार चाचण्या करण्यात याव्यात असं कोर्टाने म्हटलं आहे. पण येथील चाचण्यांची संख्या 9 ते 10 हजारांच्या पलिकडे कधीच गेली नाही, असं ते म्हणाले.
पण कुंभमेळ्याचे कोव्हिड नोडल ऑफिसर डॉ. अविनाश खन्ना हा आरोप फेटाळून लावतात. कोर्टाच्या आदेशानुसार प्रतिदिन 50 हजारांपेक्षाही जास्त चाचण्या करण्यात येत आहेत, असं त्यांनी सांगितलं.
सच्चिदानंद यांच्या याचिकेनंतर न्यायालयाने बनवलेल्या समितीने मार्च महिन्यात घाटांचा दौरा केला होता. त्यानंतर त्यांनी आपला अहवाल कोर्टाला दिला होता.
या समितीत सहभागी असलेले सच्चिदानंद यांचे वकील शिव भट्ट सांगतात, "समितीच्या पाहणीत घाटांची परिस्थिती अतिशय बिकट असल्याचं आढळून आलं. घाटांची पाहणी केल्यानंतर आम्ही ऋषिकेशच्या एका रुग्णालयात गेलो होतो. तिथं संपूर्ण गढवालसाठीचं कोव्हिड सेंटर आहे. पण तिथं प्राथमिक सुविधाही नाहीत.
तिथं अल्ट्रासाऊंडची सुविधा नाही. स्वच्छतागृह आणि वॉर्ड यांची स्थिती अतिशय वाईट आहे. याठिकाणी बेड पॅन, कचऱ्याचा डबाही नाहीत. येथील लिफ्ट नादुरुस्त अवस्थेत आहे."
अधिकारी त्यादिवशी दोन कोटींची गर्दी योग्यरित्या हाताळल्याचा दावा करत होते. पण शाही स्नानाच्या दिवशी प्रशासनाला तीस लाखांची गर्दीही नियंत्रणात आणता येत नव्हती, असं भट्ट म्हणाले.
प्रशासनाच्या कामाचं कौतुक
पण कुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी मुंबईहून आलेल्या 25 वर्षीय संदीप शिंदे यांनी हरिद्वारच्या पोलीस आणि प्रशासनाच्या कामाचं कौतुक केलं.
संदीप व्यवसायाने एक पेंटर आहेत. ते हरिद्वारच्या एका आश्रमात मोठ्या हॉलमध्ये थांबले आहेत. याठिकाणी त्यांच्यासारखे आणखी 10 भाविक जमिनीवर गादी टाकून झोपतात.
संदीप एकटेच कुंभमेळ्यात आले. बारा वर्षांतून एकदा होणाऱ्या या सोहळ्याचा अनुभव घेण्यासाठी आपण आल्याचं त्यांनी सांगितलं.
मी इथं येणं, शाही स्नानाचा अनुभव घेणं आदी गोष्टी अतिशय आनंददायक होत्या. संदीप स्वतः मास्क वापरतात. आश्रमात परतल्यानंतर गरम पाण्याने हात-पाय-तोंड धुतात.
ते म्हणाले, "इथं मला कोरोनाची चर्चा कुठेच ऐकायला मिळाली नाही. याठिकाणी कोरोनाबद्दल कुणीच काही बोलत नाहीत."
पण अनेक बाबतीत कुंभमेळ्याला 'सुपरस्प्रेडर इव्हेंट' संबोधलं जात आहे.
कुंभमेळा संपल्यानंतर उत्तराखंडमध्ये अत्यंत विदारक चित्र तयार होणार आहे, असं डेहराडून येथील एका ज्येष्ठ पत्रकारांना वाटतं.
सरकारी आकडेवारीनुसार, उत्तराखंडमध्ये आतापर्यंत कोरोनामुळे 1800 जणांचा मृत्यू झाला आहे.
पंच रामानंदीय खाकी आखाड्याचे राघवेंद्र दास यांनी लोक भयभीत असल्याचं मान्य केलं. पण ते पुढे म्हणतात, "आस्था आणि धर्म यांचा विषय येतो तेव्हा लोक मृत्यूची भीती बाळगत नाहीत.
निवडणुकीतून कोरोना पसरत नाही का, ती का सुपरस्प्रेडर मानू नये? कोरोना फक्त धार्मिक ठिकाणी पसरतो का? भारतीय संस्कृतीला नावे ठेवणारी सरकारं दारुची दुकाने उघडत आहेत. तिथून कोरोना पसरत नाही का, असं प्रश्न पंच रामानंदीय यांनी केले.
त्यांच्या शेजारी बसलेले ओंकार दास यांनी हरिद्वारमध्ये लोकांच्या आजारी पडण्यामागचं खरं कारण इथंल वातावरण असल्याचं म्हटलं.
हरिद्वारमध्ये दिवसा उष्णता असते, तर रात्री थंडी असते, शिवाय इथं 100 टक्के कोरोना असलेला एकही पॉझिटिव्ह रुग्ण याठिकाणी आढळून आलेला नाही, असं त्यांनी सांगितलं.