Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Maharashtra CM: उद्धव ठाकरे यांच्या सरकारसमोर कोणती प्रमुख आव्हानं?

Maharashtra CM: उद्धव ठाकरे यांच्या सरकारसमोर कोणती प्रमुख आव्हानं?
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आता राज्याचे मुख्यमंत्री होतील. 'रिमोट कंट्रोल' स्वतःकडे ठेवून सरकार चालविणाऱ्या ठाकरे घराण्यातील उद्धव ठाकरे हे पहिलेच मुख्यमंत्री असतील.
 
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर उद्धव ठाकरे हे शिवसेना कशी सांभाळणार हा प्रश्न उपस्थित होत होता. पण उद्धव यांनी 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपपासून वेगळं लढूनही शिवसेनेला स्वबळावर 63 जागा जिंकून दिल्या होत्या. भाजपसोबत सत्तेत राहताना उद्धव यांनी बाळासाहेब ठाकरेंनंतरही शिवसेना सांभाळली आणि वाढवलीही.
 
आता शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीनं मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव यांची निवड केल्यानंतर हे पद ते सांभाळू शकतात का, अशी चर्चा सुरू झाली. भिन्न विचारधारांच्या तीन पक्षांचं सरकार सांभाळताना उद्धव ठाकरे यांच्यासमोर नेमकी कोणती प्रमुख आव्हानं आहेत, याचा आढावा घेण्याचा प्रयत्न बीबीसी मराठीनं केला.
 
प्रशासकीय अनुभवाची कमतरता
"उद्धव ठाकरेंसमोरची आव्हानं दोन प्रकारची आहेत. एक म्हणजे राजकीय आणि दुसरं म्हणजे प्रशासकीय. आजपर्यंत ठाकरे घराण्यातल्या कोणत्याही व्यक्तीने थेट कोणतीही निवडणूक लढवली नव्हती. कोणतंही घटनात्मक पद स्वीकारलं नव्हतं. यावेळी पहिल्यांदाच आदित्य ठाकरेंनी विधानसभेची निवडणूक लढवली आणि आता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होत आहेत. शिवसेना ही ठाकरे कुटुंबाच्या इशाऱ्यावर चालत असली किंवा उद्धव हे शिवसेनेचे कुटुंबप्रमुख असले, तरी सरकार चालविण्याचा त्यांना थेट अनुभव नाहीये," असं मत पत्रकार आणि लेखक धवल कुलकर्णी यांनी व्यक्त केलं.
 
मुख्यमंत्र्यांची प्रशासनावर पकड असणं आवश्यक असतं हा मुद्दा अधोरेखित करत धवल कुलकर्णी यांनी म्हटलं, "काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा भाजप असेल, त्यांचे स्वतःचे 'committed bureaucrats ' किंवा त्यांच्या गटाचे समजले जाणारे प्रशासकीय अधिकारी आहेत. तसे शिवसेनेबाबत नाहीये. त्यामुळे त्यांना स्वतःचं नेटवर्क नोकरशाहीमध्ये निर्माण करावं लागेल. शेवटी हे तीन पक्षांचं खिचडी सरकार आहे. म्हणूनच उद्धव ठाकरेंना राजकीय आणि प्रशासकीय दोन्ही आघाड्यांवर स्वतःला सिद्ध करत हे सरकार चालवावं लागेल."
webdunia
ज्येष्ठ पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांना मात्र उद्धव ठाकरे सरकार चालवण्याचे आव्हान यशस्वीपणे पार पडतील असं वाटतं.
 
सूर्यवंशी यांनी म्हटलं, "बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर उद्धव ठाकरे शिवसेना कशी सांभाळतील हा प्रश्न उपस्थित होत होता. कारण बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंच्या व्यक्तिमत्त्वात जमीन-अस्मानचा फरक आहे. बाळासाहेब ठाकरे हे कट्टर हिंदुत्त्ववादी, आक्रमक आणि मनं जिंकणारे वक्ते होते. याउलट उद्धव ठाकरे हे संयमी, संघटना सांभाळणारे आहेत.
 
बाळासाहेबांनंतर त्यांनी पक्ष नुसता सांभाळलाच नाही, तर तो वाढवला, सत्तेत आले आणि आता तर ते मुख्यमंत्रीही होत आहेत. त्यामुळे एखाद्या नेत्याकडे जे गुण लागतात, ते उद्धव ठाकरेंकडे आहेत. त्यामुळे ते यशस्वी सरकार चालवतील. आणि त्यांचा स्वभाव चांगला असल्यामुळे कोणताही वाद निर्माण झाला, तर तो ते निश्चितपणे मिटवतील अशी खात्री."
 
उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदाची आव्हानं कशी पेलणार यावर आताच भाष्य करणं योग्य ठरणार नाही, असं मत ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांनी व्यक्त केलं.
 
"उद्धव ठाकरेंनी कोणत्याही संसदीय परंपरेत काम केलं नाही, आमदार म्हणून काम केलेलं नाही. पण त्यांच्याकडे असा कोणताही अनुभव नसला तरी शिवसेनेसारखी संघटना सांभाळण्याचा त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे. अर्थात, ते कसं काम करतात याचं मूल्यमापन हे त्यांनी मुख्यमंत्री म्हणून काम केल्यावरच स्पष्ट होईल," असं विजय चोरमारे यांनी म्हटलं.
 
सरकारचा 'रिमोट कंट्रोल' शरद पवारांकडे?
मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे स्वतंत्रपणे काम करू शकतील की सरकार स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावणारे शरद पवार हे सरकार स्थापनेनंतरही रिमोट कंट्रोल म्हणून काम पाहतील, या प्रश्नाचं उत्तर देताना धवल कुलकर्णींनी म्हटलं, "या सरकारचा रिमोट हा सिल्व्हर ओककडे असेल. कारण गेल्या काही दिवसातील घडामोडी जर आपण पाहिल्या तर आपल्याला शरद पवारांमधील मुत्सद्दी दिसला.
 
उद्धव ठाकरेंचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी सुचवणं असेल किंवा अजित पवारांचं बंड शमवणं असेल, या सगळ्यामध्ये आपल्याला शरद पवार पुढे येताना दिसले. त्यामुळे या सरकारचे खरे मास्टर माइंड हे शरद पवारच असतील. 1995 साली जेव्हा युतीचं सरकार आलं, तेव्हा मुख्यमंत्री जरी मनोहर जोशी किंवा नारायण राणे असले तरी खरा रिमोट कंट्रोल हा 'मातोश्री'कडेच होता. आता मुख्यमंत्री हा 'मातोश्री'चा असला तरी कुठेतरी या सरकारचं होकायंत्र शरद पवारच असतील."
 
बीबीसीच्या भारतीय भाषांचे डिजिटल एडिटर मिलिंद खांडेकरांन यांनीही शरद पवार रिमोट कंट्रोल असतील, असं मत व्यक्त केलं. "या सरकारचा रिमोट कंट्रोल हा शरद पवारांकडे असेल. हे तीनही पक्ष एकत्र आले आहेत, तेच मुळी शरद पवारांमुळे. शिवसेनेसोबत सरकार बनविण्यासाठी शरद पवारांनीच सोनिया गांधींची मनधरणी केली आणि त्यांनीच शिवसेनेला 'हीच ती वेळ' म्हणत भाजपपासून वेगळं होण्यासाठी भाग पाडलं. त्यामुळे या सरकारचे स्थैर्य ही शरद पवारांच्या मर्जीवर अवलंबून आहे," असं मिलिंद खांडेकर यांनी म्हटलं.
 
विजय चोरमारेंनीही अशीच प्रतिक्रिया देताना म्हटलं, "रिमोट कंट्रोल शरद पवारांकडे असेल हे नक्की आहे. कारण हे सरकार बनविण्यात शरद पवारांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. काँग्रेस आणि शिवसेनेसारख्या दोन टोकाच्या पक्षांना एकत्र आणणं असो की राजकीय दगाबाजीचा जो प्रयत्न झाला, तो उलथून टाकणं असो सगळ्या गोष्टी शरद पवार यांनी घडवून आणल्या आहेत. त्यामुळे अर्थातच सरकारचा रिमोट कंट्रोल हा 'सिल्व्हर ओक'कडे असेल."
 
सुधीर सूर्यवंशी यांचं मत मात्र थोडंसं वेगळं आहे. "शरद पवार रिमोट कंट्रोल असतील असं म्हणता येणार नाही, पण धोरणात्मक बाबींकडे त्यांचं जास्त लक्ष असेल. पण उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री होत असल्यानं एक गोष्ट महत्त्वाची घडली, ती म्हणजे या सरकारमध्ये दोन सत्ताकेंद्रं राहिली नाहीत. शिवसेनेकडून दुसरं कोणतं नाव मुख्यमंत्रिपदासाठी समोर आलं असतं, तर त्या व्यक्तिला मातोश्री आणि सिल्व्हर ओक असं दोन्ही ठिकाणी जावं लागलं असतं.
 
आता वर्षा आणि मातोश्री एकच असतील. त्यामुळे केवळ सिल्व्हर ओक हेच एक वेगळं केंद्र बाकी आहे. पण शरद पवार हे कोणतंही नियंत्रण न ठेवता, एक कॉमन मिनिमम अजेंडा ठरवून देतील, ज्याच्या आधारे सरकार चालेल," असं सुधीर सूर्यवंशी यांनी म्हटलं.
 
प्रबळ विरोधी पक्ष
पाच वर्षे मुख्यमंत्री राहिलेले देवेंद्र फडणवीस आता विरोधी पक्षनेते असतील. संख्याबळाचा विचार करता भाजप हा सभागृहातला सर्वांत मोठा पक्ष आहे. एकेकाळी शिवसेनेचा सहकारी असलेला भाजप हा विरोधी पक्ष म्हणून उद्धव ठाकरेंसमोरचं सर्वात मोठं आव्हान असेल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
 
याबद्दल बोलताना धवल कुलकर्णींनी म्हटलं, "1999 साली देवेंद्र फडणवीस ही आमदार म्हणून निवडून आले. खऱ्या अर्थाने त्यांची कारकीर्द विरोधी पक्षातच बहरली. विरोधी पक्षात असतानाच त्यांनी आक्रमक नेता म्हणून स्वतःची प्रतिमा निर्माण केली होती. शिवाय आता भाजप हा विधिमंडळातला सगळ्यात मोठा पक्ष आहे.
 
शिवसेना आज सत्ताधारी पक्ष म्हणून बसणार असला, तरी त्यांच्या आमदारांची संख्या जवळपास निम्मी आहे. त्यामुळे सगळ्यात मोठा पक्ष असल्यामुळे भाजप शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात कुरघोड्या करायला बघेल."
 
भाजपकडून तातडीनं सरकारविरोधी कारवाया होणार नाहीत असं म्हणत सुधीर सूर्यवंशींनी सांगितलं, "फडणवीसांना काही वेळ शांत बसावं लागेल. घाईघाईनं अजित पवारांशी हातमिळवणी करून पहाटे शपथ घेतल्यामुळे फडणवीसांची तसंच दिल्लीतील नेतृत्वाची नामुष्की झाली. जे काही करायचं ते खूप संयमानं करावं लागेल.
 
शरद पवार या सरकारमागे आहेत, हे त्यांना लक्षात घ्यावं लागेल. निवडणुकीत त्यांना शरद पवारांमुळे नुकसान सहन करावं लागलं. त्यानंतर सरकार स्थापनेतही त्यांच्यावर माघार घेण्याची वेळ आली. त्यामुळे आता ते चुकीची हॅटट्रिक होऊ देणार नाहीत."
 
"सुरुवातीच्या काळात प्रबळ विरोधी पक्ष म्हणून काम करण्याचा भाजपचा प्रयत्न असेल. विधिमंडळात तसंच वेगवेगळ्या प्रश्नांवर रस्त्यावर आंदोलन करून सरकारला अडचणीत आणण्याचा भाजप निश्चितच प्रयत्न करेल. पण सुरुवातीच्या काळात सरकार पाडण्याचा प्रयत्न केला जाणार नाही. पण वर्षभरानंतर केंद्राच्या आणि राज्याच्या पातळीवरूनही हे सरकार पाडण्यासाठी प्रयत्न केले जातील," अशी भूमिका विजय चोरमारे यांनी म्हटलं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महात्मा ज्योतिबा फुले यांचा संक्षिप्त परिचय