Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Makar Sankranti: नागपूरच्या 'अट्टल' पतंगबाजांच्या 7 गोष्टी

Makar Sankranti: नागपूरच्या 'अट्टल' पतंगबाजांच्या 7 गोष्टी
, मंगळवार, 14 जानेवारी 2020 (13:47 IST)
रोहन नामजोशी
मकरसंक्रांतीला सूर्य मकरराशीत जातो. मात्र नागपुरात संक्रांतीला सूर्य उगवताच तमाम नागपूकरांची पावलं गच्चीकडे वळतात.
 
खरंतर जानेवारी महिन्याच्या सुरुवातीपासूनच संध्याकाळी 4 वाजले की नागपूरच्या विविध परिसरातून 'ओेsssकाट' आणि 'ओेsssपार'च्या आरोळ्या ऐकू येतात. जशीजशी संक्रांत जवळ येते तसा या आरोळ्यांनी नागपूरचा आसमंत निनादून जातो.
 
...आणि संक्रांतीच्या दिवशी तर उत्साह बघण्यासारखा असतो. पतंग शौकिनांसाठी हा सण एखाद्यापेक्षा उत्सवापेक्षा कमी नसतो. चला तर मग नागपुरातल्या संक्रांतीशी निगडित सात महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या.
 
1. मांजा घोटणं
मांजा घोटणं म्हणजे पतंग उडवण्याच्या दोऱ्यावर काचेचा थर चढवणं, त्या दोऱ्याला धार लावणं. पतंगबाजांसाठी मांजा घोटणं एक मोठा सोहळा आणि प्रतिष्ठेचा प्रश्न असतो आणि त्यासाठी नागपूरचे मोठे रस्ते आणि तिथले विजेचे खांब नेहमीच कामास येतात.
webdunia
आधी बाजारातून सीरस नावाच्या पदार्थ वितळवून त्याला काचेच्या चुऱ्यात गरम करतात. त्याला आवडीचा रंग दिला जातो. आणि मग थंड झाल्यावर या पातळ मिश्रणात पांढरा मांज्याचं बंडल बुडवतात. आणि मग दोन खांबांमध्ये हा मांजा ताणून त्याला वाळवतात संध्याकाळी सुरू होणारा हा कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत चालतो. कधी कधी एक आठवड्यापूर्वीपासूनच मांजा घोटण्याची लगबग सुरू होते. संक्रांतीची सकाळ उगवली का दोन तीन चक्र्यांना हा मांजा गुंडाळून इथले वीर पतंगयुद्धावर निघतात.
 
मांजातही जितके जास्त थर, तितका तो मजबूत आणि धारदार समजला जातो. हल्ली बाजारात 'तीन तार', 'नऊ तार' असे अनेक प्रकार मांज्यात येतात, पण घोटलेल्या मांज्याची एक वेगळी शान असते. घोटलेल्या मांज्याने पतंग कापली की पतंगबाजांचा उर अभिमानाने भरून येतो.
 
2. चिनी नायलॉन आणि बरेली
 
पण खरं सांगायचं तर एखादी पतंग कटली आणि घोटलेला मांजा वाया गेला तर त्या दु:खाला पारावार नसतो. त्यातही ढीलवर पतंग कटली तर काही विचारूच नका. गच्चीवरच शोकसभा भरते.
 
बदलत्या काळानुसार आता मांजाच्या उद्योगातही चीनने हात घातला आहे. काही वर्षांपूर्वी आलेल्या चीनी नायलॉन मांजानं देशी मांजाच्या पतंगी जास्त वेळ टिकत नव्हत्या. म्हणून लोकांचीही त्याला पसंती होती.
webdunia
पण या न तुटणाऱ्या मांजानं गेल्या काही वर्षांत अपघातही वाढत गेले. म्हणून नायलॉनच्या मांज्यावर आता बंदी घालण्यात आली आहे. तरीसुद्धा सहा तार नऊ तार या मांज्याचं महत्त्व अजूनही कमी झालेलं नाही. तरीही पारंपरिक पतंगवीरांची पसंती ही घोटलेल्या मांजालाच असते. बरेली मांजा म्हणजे एक प्रकारचा अपमान समजला जातो. तरी लोक या मांजालाही सरावले आहेत.
 
3. पतंगाची निवड
पतंगांची निवड करणं सगळ्यांत महत्त्वाची प्रक्रिया आणि कौशल्य आहे. पतंगांचे अनेक प्रकार असतात अगदी लहान पतंगांपासून ते अजस्त्र ढोलपर्यंत विविध प्रकार असतात. अस्सल पतंगबाजाला ही नावं अगदी लहानपणापासून तोंडपाठ असतात. पुण्यात मानाचे गणपती जसे घडाघडा पाठ असतात तसं नागपूरच्या पोरांना पतंगांची नावं तोंडपाठ असतात.
 
त्यात चांददार, गोलेदार, चील, खडा सब्बल आणि टोकदारसारख्या डिझायनर कागदी पतंगी, आणि लवकर न फाटणारी प्लास्टिकची झिल्ली, हे सर्वाधिक लोकप्रिय प्रकार आहेत. संक्रांतीच्या आदल्या दिवशी बाजारात चोखंदळ पतंगबहाद्दरांची गर्दी होते.
 
एखाद्या कसलेल्या जोहरीप्रमाणे एक तज्ज्ञ व्यक्ती या पतंगी निवडतो. पतंगांचा आकार, दर्जा, झाप खाण्याची शक्यता तपासून घासघीस केल्यानंतर काही निवडक पतंगांचा गठ्ठा घरी नेतो. मग सगळ्या पतंगांना सुत्तर बांधण्याचा आणखी एक मोठा सोहळा पार पडतो. संतुलन हा सुत्तर बांधण्याचा गाभा आहे हे इथे विसरून चालणार नाही. सुत्तर बांधणारा व्यक्ती हा इथे अत्यंत महत्त्वाचा असतो. त्याच्याशी वाद घालायचा नाही हा एक अलिखित नियम असतो.
 
4. गच्ची: एक युद्धभूमी
webdunia
प्रत्यक्ष दिवस हा तर अत्यंत गजबजलेला असतो. डोळ्यांवर चष्मा, डोक्यावर टोपी आणि बोटांना चिकटपट्ट्या लावून सगळे पतंगवीर अगदी सकाळपासूनच घराच्या गच्चीवर असतात. ज्यांच्या घरांना गच्ची नाही, ते थेट जवळचं मैदान गाठतात. पण गच्चीची मजा मैदानाला नाहीच.
 
आधी वाऱ्याचा अंदाज घेऊन पहिली पतंग आकाश झेप घेते. पक्ष्यांबरोबर आकाशात पतंगांची गर्दी झाली की मग 'पेचा' लागतो आणि पतंगयुद्धाला खरा रंग येतो. खऱ्या पतंगबाजाचं कौशल्य या क्षणाला पणाला लागलेलं असतं. साथीला डीजेचा दणदणाट, गाण्यांचा धडाका आणि चक्री पकडणारा साथीदार असतो. हा साथीदार म्हणजे पडद्यामागच्या कलाकारासारखा असतो. त्याची एक चुकही महागात पडू शकते.
 
दरम्यान पतंग फाटला तर चिकटवायला आदल्या दिवशीचा भात असतो. हे सगळं होत असताना घराघरातून तीळगुळाचा सुगंध दरवळत असतोच. घरांच्या गच्चींवरून शीतयुद्ध झडत असतात.
 
मधूनच एखादी कटलेली पतंग वाऱ्यावर तरंगत गच्चीवर येते. ही पतंग पकडण्याचा आनंद अवर्णनीय असतो एक तर फुकट पतंग आणि मांजा मिळतो. मांजा चांगला असेल तर तोच मांजा चक्रीवर लपेटला जातो. त्या भेट मिळालेल्या मांजाने पुढच्या पतंग कापला तर त्या अदृश्य व्यक्तीचे आभार मानले जातात.
 
5. स्पेशल तिरंगा पतंग
जेव्हा पेचा लागतो तेव्हा पतंग उडवणाऱ्याला आणखी कशाचीही पर्वा नसते. एका दिवसात किती पतंग कापल्या, आपल्या किती पतंग कापल्या गेल्या, याचा हिशोब होतो.
 
दिवसाअखेरीस मांजा धरून, ओढून बोटं कापलेली असतात. त्या कापलेल्या बोटांना मलम लावलं जातं. जितक्या जास्त पट्ट्या तितका तो पतंगवीर तज्ज्ञ समजला जातो.
 
तसं तर नागपूरच्या आकाशात महिन्याभर आधीपासूनच पतंग दिसू लागते. संक्रांतीनंतर हा उत्सव अखेर 26 जानेवारीला संपतो. यादिवशी उडवण्यासाठी विशेष तिरंगा पतंग मिळतात.
 
6. संक्रांतीवरही संक्रांत
नागपुरात संक्रांतीला पतंगबाजी कितीही उत्साहात असली तरी त्यानं काहींना त्रासही होतो. गच्च्यांवरून अनेकांचा तोल जाऊन मृत्यू होतो आणि मांज्याने तर दुचाकीचालकांचा अनेकदा चक्क गळा कापला जातो. म्हणूनच नागपुरातले मुख्य उड्डाणपूल या सणाला बंद ठेवले जातात.
 
मांज्याने अनेक पक्षीसुद्धा जखमी होतात, काहींचा मृत्यूही होतो. त्यांच्यासाठी पक्षीमित्र विशेष कँप आयोजित करतात. मांज्याच्या वापराविषयी अनेक संस्थातर्फे याबाबत जनजागृतीही केली जाते.
 
7. 'पतंगबाजीमुळे चष्मा लागला'
पण नागपुरातली अनेक मंडळी आता कामासाठी बाहेरगावी असल्याने, तसंच गेल्या काही वर्षांमध्ये आलेल्या नवनव्या निर्बंधांमुळे आता पतंगबाजीचं प्रमाण कमी झाल्याचं दिसत आहे.
 
मूळ नागपूरच्या महाल भागातले अनिरुद्ध येनसकर आता पुण्यात एका IT कंपनीत नोकरी करतात. ते सांगतात, "आता मी नागपूरची संक्रांत खूप मिस करतो. इथे काही कंपन्यांमध्ये काईट फ्लाईंग फेस्टिवल आयोजित केला जातो. पण त्या गच्चीच्या 'ओsssकाट'ची मजा त्यात नाही."
 
"आजही माझ्या घरी एक चक्री आणि एक पतंग आहेच," अत्यंत उत्साहात सांगत होते. पतंगबाजीने काही दुष्परिणाम झाले का? ते हसत सांगतात, "हो ना! मला चष्माच त्यामुळे लागला."
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महाराणी एलिझाबेथ यांची मेगन आणि हॅरी यांच्या निर्णयाला मान्यता