Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

एन रतनबाला देवी : भारताची सर्वोत्तम फुटबॉलपटू बनण्याचा ध्यास

एन रतनबाला देवी : भारताची सर्वोत्तम फुटबॉलपटू बनण्याचा ध्यास
, सोमवार, 25 जानेवारी 2021 (21:31 IST)
ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनची (AIFF) गेल्यावर्षीची (2020) प्लेअर ऑफ द इअर एन. रतनबाला देवी हिला भारतीय संघाचा 'प्राण' म्हटलं जातं.
 
मिड-फिल्डवरच्या उत्तम कामगिरीमुळे तिला असं म्हटलं जातं.
 
पूर्वोत्तरच्या मणिपूरमधल्या बिष्णूपूर जिल्ह्यातल्या नांबोल खथाँगमध्ये जन्मलेल्या रतनबाला देवीने भारताची 'सर्वोत्तम फुटबॉलपटू' बनण्याचं स्वप्न उराशी बाळगलं आणि या स्वप्नपूर्तीच्या दिशेने तिने एक मोठा पल्लादेखील पार केला आहे.
 
लहान असताना शेजारच्या मुलांसोबत ती फुटबॉल खेळायची. करमणूक म्हणून सुरू केलेला हा खेळ पुढे तिची पॅशन बनला आणि ती जास्तीत जास्त वेळ मैदानात घालवू लागली.
 
अडथळ्यांची शर्यत

रतनबाला देवीचे वडील एका खाजगी कंपनीत ड्रायव्हर होते. पाच जणांच्या कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर होती. अशा परिस्थितीत आर्थिक चणचण असूनही तिच्या वडिलांनी तिला कायम प्रोत्साहन दिलं आणि म्हणूनच ते तिच्यासाठी 'हिरो' आहेत. भारताकडून खेळण्याचं तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिच्या एका काकांनीही तिला भक्कम साथ दिली.
 
कुटुंबाकडून मिळालेल्या पाठिंब्याच्या जोरावरच रतनबालाने इम्फालमधल्या स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाच्या (SAI - साई) केंद्रात प्रशिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, साईची टीम स्पर्धांमध्ये भागच घ्यायची नाही. त्यामुळे खेळण्यास फारसा वाव मिळत नसल्याने तिची निराशा झाली.
 
अखेर तिने स्थानिक KRYHPSA फुटबॉल क्लब जॉईन केला. तिथे ओझा जाओबा यांच्या मार्गदर्शनाखाली तिने व्यावसायिक फुटबॉलचं प्रशिक्षण घेतलं. या क्लबमध्ये उत्तम प्रशिक्षण दिलं जायचं आणि त्यांच्या संघाने अनेक स्पर्धांमध्ये पारितोषिकंही जिंकल्याचं रतनबाला सांगते. या क्लबमध्येच तिच्या फुटबॉल कौशल्यात आणि तंत्रात बरीच सुधारणा झाली.
 
स्वप्नाला फुटले पंख

स्थानिक स्पर्धांमधल्या रतनबालाच्या दिमाखदारी कामगिरीमुळे तिची मणिपूरच्या स्टेट टीममध्ये निवड झाली आणि ती राष्ट्रीय पातळीवर फुटबॉल खेळू लागली. AIFF च्या वेगवेगळ्या वयोगटातल्या स्पर्धांमध्येही ती खेळली.
 
2015 साली तिची भारताच्या महिला ज्युनियर टीममध्ये वर्णी लागली. या टीमकडून खेळताना आपल्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर तिने अनेक स्पर्धांमध्ये 'सर्वोत्तम खेळाडू'चा मान पटकावला.
 
रतनबालाचं स्वप्न पूर्ण झालं ते 2017 साली. या वर्षी तिला भारताच्या राष्ट्रीय संघात स्थान मिळालं. संघात तिची मिड-फिल्डवर वर्णी लागली आणि विरोधी संघाकडून होणारी आक्रमक खेळी परतवून लावण्याची जबाबदारी तिच्यावर आली. ही जबाबदारी तिने लीलया पार पाडली. इतकंच नाही तर तिच्या चाली इतक्या वेगवान असत की त्यामुळे विरोधी संघाला धडकी भरायची.
 
2019 साली नेपाळमध्ये झालेली पाचवी SAFF चॅम्पियनशीप स्पर्धा जिंकणाऱ्या भारतीय महिला फुटबॉल संघात रतनबालाही होती. त्याचवर्षी तेरावी साउथ एशिएन गेम्स स्पर्धा पार पडली. त्या स्पर्धेतही भारतीय संघाने सुवर्णपदक पटकावलं होतं. रतनबाला त्याही संघात होती. त्याचवर्षी स्पेनमध्ये झालेल्या कोटिफ वुमेन्स टुर्नामेंट स्पर्धेत रतनबालाने भारतासाठी दोन गोल केले होते.
 
स्थानिक स्पर्धांमधूनही आपल्या चमकदार कामगिरीने तिने अनेकांना आश्चर्यचकित केलं आहे. 2019 सालच्या हिरो इंडियन वुमन लिग (IWL) स्पर्धेत तिला उदयोन्मुख खेळाडूचा मान मिळाला. याच स्पर्धेच्या 2020 सालच्या आवृतीत रतनबालाने 'बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट' पुरस्कार पटकावला. रतनबालाच्या नेतृत्त्वाखाली तिच्या KRYHPSA संघाने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती.
 
खेळाने दिली ओळख
2020 साली AIFF च्या 'इमर्जिंग प्लेअर ऑफ द इअर' पुरस्काराने तिला खरी ओळख मिळवून दिली. AIFF च्या अधिकृत वेबसाईटवर रतनबालाच्या परिचयात तिचा भारतीय फुटबॉल संघाचं 'फुफ्फुस' (lungs) असा उल्लेख करण्यात आला आहे.
 
आपण आपलं स्वप्न प्रत्यक्षात जगत असल्याचं आणि कामगिरी सुधारण्यासाठी दररोज प्रयत्न करत असल्याचं रतनबाला सांगते. एक दिवस आंतरराष्ट्रीय क्लबकडून खेळण्याची तिची इच्छा आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

प्रजासत्ताक दिनाची शेतकऱ्यांची ट्रॅक्टर रॅली नेमकी कशी असेल?