तुषार कुलकर्णी
नांदेडच्या सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वारा परिसरात होला मोहल्ला किंवा हल्लाबोल कार्यक्रमावेळी जमावाने पोलिसांवर हल्ला केल्याची घटना घडली.
कोरोना काळात सर्वत्र जमावबंदी असताना इतके लोक एकत्र कसे आले आणि त्यानंतर पोलिसांवर हल्ला का झाला हा सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे.
नांदेडच्या गुरुद्वारा कमिटीने पोलिसांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला आहे. "होला मोहल्लाचा कार्यक्रम सार्वजनिक स्वरूपात करू नये, अशी सूचना गुरुद्वारा कमिटीने दिलेली असतानाही काही अतिउत्साही तरुणांनी हा प्रकार घडवून आणला," असं गुरुद्वारा कमिटीचे सचिव रवींद्र सिंग बुंगई यांनी म्हटले आहे.
कार्यक्रमावेळी काय झालं?
होला मोहल्ला कार्यक्रमादरम्यान गोंधळ कसा झाला, याबद्दल नांदेडचे पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी सांगितले की "29 मार्च रोजी हल्लाबोल कार्यक्रमावेळी निशाण साहेब (शीख धर्मियांचा झेंडा) गेट नंबर एक जवळ आलं. निशाण साहेब बाहेर काढण्यावरून वाद निर्माण झाला. साधारणतः 300 ते 400 तरुण यावेळी उपस्थित होते."
त्यातल्या काही तरुणांनी गोंधळ केला आणि बॅरिकेड्स तोडले. त्यात 4 पोलीस जखमी झाले. जमावाकडून वाहनांचे नुकसान देखील झाले असल्याची माहिती शेवाळे यांनी दिली.
सोशल मीडियावर काही व्हीडिओ फिरत आहेत त्यामध्ये काही तरुण तोडफोड करताना दिसत आहेत.
29 मार्चच्या घटनेनंतर मारहाण करणाऱ्या, तोडफोड करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस त्यांचा तपास करत आहे अशी माहिती शेवाळे यांनी दिली आहे.
यंत्रणा कुचकामी ठरली का?
नांदेडला शीख धर्मियांची 'दक्षिण काशी' म्हणून ओळखले जाते. देश-विदेशातूनही अनेक लोक या कार्यक्रमासाठी येत असतात. हा कार्यक्रम नेहमी शांतताप्रिय पद्धतीनेच पार पडतो. पण यावेळी जे घडलं ते निंदनीय आहे, असं वक्तव्य नांदेडचे खासदार प्रतापराव चिखलीकर यांनी केलं आहे.
अशा प्रकारचे वर्तन करणाऱ्यांवर वेळीच नियंत्रण आणले पाहिजे ,अशी भूमिका चिखलीकर यांनी मांडली. नांदेड जिल्ह्यासाठी पुरेशी पोलीस यंत्रणा उपलब्ध असताना असा प्रकार का घडला याची शहानिशा व्हायला हवी असं चिखलीकर म्हणाले.
नांदेड गुरुद्वाऱ्याच्या इतिहासात अशी घटना प्रथमच घडली असल्याचं हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी म्हटलं आहे, "शेळीच्या कळपाचे नेतृत्व सिंहाने केले तर ते विजयी होऊ शकतात. पण सिंहांच्या कळपाचे नेतृत्व जर शेळीने केले तर तो कळप पराभूत होऊ शकतो. दुर्दैवाने असे म्हणावे लागेल की पोलीस यंत्रणा कुचकामी ठरली. या घटनेसाठी ग्राउंडवर काम करणारे पोलीस जबाबदार नाहीत तर त्यांचे नेतृत्व करणारे वरिष्ठ अधिकारी जबाबदार आहेत."
हेमंत पाटील यांनी केलेल्या टीकेवर बीबीसीने नांदेड पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला पण ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.
शेतकरी आंदोलनाचा आक्रोश?
कालच्या कार्यक्रमामध्ये जो असंतोष दिसला, त्याला दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाची पार्श्वभूमी आहे, असं हेमंत पाटील म्हणाले आहेत.
"कालच्या कार्यक्रमात मोठ्या संख्येनी हरियाणा आणि पंजाबमधून लोक आले होते. दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत आणि त्यांचा रोष केंद्र सरकारवर आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून शेतकरी सीमेवर बसून आंदोलन करत आहेत पण केंद्र सरकार त्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. त्याच गोष्टीचा असंतोष कालच्या घटनेत दिसला," असे पाटील यांनी म्हटले आहे.
पोलिसांचे मनोधैर्य खचले?
नांदेडच्या घटनेशी शेतकरी आंदोलनाचा संबंध असण्याची शक्यता भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी फेटाळून लावली आहे. तर नुकताच मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी पोलिसांना टार्गेट दिले जातात असा आरोप केला होता याकडे उपाध्ये यांनी लक्ष वेधले.
ते सांगतात, "मुळात पोलिसांचे मनोधैर्य खचले आहे. महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर पोलिसांना बेसुमार टार्गेट दिले जात आहे त्यामुळे ते पूर्ण क्षमतेनी काम करू शकत नसल्याचे नांदेडच्या घटनेतून दिसून आले आहे. पोलिसांचे मनोबल पुन्हा वाढेल अशा उपाय योजना करण्याची गरज आहे."
हा कार्यक्रम नेमका कशा स्वरूपाचा होता याची देखील चर्चा होत आहे. त्यानिमित्ताने होला मोहल्ला म्हणजे काय आणि त्याचे शीख धर्मात काय महत्त्व आहे हे जाणून घेऊत.
होला मोहल्ला म्हणजे काय?
हल्ला बोल कार्यक्रम शस्त्रकलेच्या प्रदर्शनासाठी प्रसिद्ध आहे. या कार्यक्रमाला साडेतीनशे वर्षांची परंपरा आहे.
होला मोहल्लाची सुरुवात शिखांचे दहावे गुरु श्री गुरू गोविंद सिंह यांनी केली होती, अशी माहिती अमृतसर विद्यापीठातील गुरू ग्रंथ साहेब अभ्यास केंद्राचे संचालक डॉ. अमरजीत सिंग यांनी दिली.
ते सांगतात, "लोकांमध्ये साहसी वृत्ती निर्माण व्हावी या हेतूने श्री गुरू गोविंद सिंह यांनी होला मोहल्लाची सुरुवात केली. होळी सणाचं स्वरूप केवळ रंग खेळण्यापुरतंच मर्यादित झालं होतं."
"त्यामुळे गुरू गोविंद सिंह यांनी होळीच्या दुसऱ्या दिवशी शस्त्रकलेच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्याची परंपरा सुरू केली. त्यांनी सुरू केलेल्या खालसा पंथाच्या तत्त्वावरच होला मोहल्ला आधारित होता. खालसा पंथातील लोक वर्षभर शस्त्रविद्या शिकत. त्यांना या दिवशी आपल्या कलेचे प्रदर्शन करण्याची संधी दिली जात असे. या दिवशी विविध स्पर्धा देखील होत. सर्वोत्तम प्रदर्शन करणाऱ्या व्यक्तीला बक्षीसही दिले जात असे.
"खालसा पंथाच्या लोकांमध्ये जी लढाऊवृत्ती निर्माण झाली याचे मूळ आपल्याला श्री गुरू गोविंद सिंह यांनी सुरू केलेल्या होला-मोहल्लाच्या कार्यक्रमात दिसते. होला मोहल्ला कार्यक्रमाचं हे ऐतिहासिक महत्त्व आहे," असं अमरजीत सिंग सांगतात.