- निकोला केली
सुदृढ आणि निरोगी आरोग्यासाठी आवश्यक असलेला व्यायाम घातक ठरू शकतो का? यासंबंधी असलेल्या अॅप्समुळे परिस्थिती अधिकच चिघळू शकते का?
वॅलेरी स्टीफन आरोग्यदक्ष. व्यायामाचं महत्त्व त्यांना मनापासून पटलेली महिला. रोजचा मॉर्निंग वॉक ठरलेला.
त्या सांगतात, "मी जेव्हा धावते तेव्हा मी काहीतरी साध्य करत आहे, असं वाटतं. हळूहळू माझ्या धावण्याचा वेग वाढला, शारीरिक ताकदही वाढली. हे माझ्यासाठी यशाच्या छोट्या-छोट्या पायऱ्या चढण्यासारखं होतं."
वॅलेरी यांनी जवळपास 10 वर्षांपूर्वी फिटनेससाठी केवळ जॉगिंग सुरू केलं. कालांतराने त्यांनी 5 किलोमीटर पळण्याच्या शर्यतीत भाग घेतला. मग 10 किलोमीटर शर्यतीत भाग घेतला. त्यानंतर मॅरेथॉन. मात्र, हळूहळू केवळ जॉगिंग करण्यासाठी त्या सकाळी खूप लवकर उठू लागल्या आणि इतर कुठल्याही गोष्टीपेक्षा जास्त महत्त्व धावण्याला देऊ लागल्या.
त्या सांगतात, "मला जाणवू लागलं, की मी हळूहळू व्यायामाच्या अधीन होत आहे आणि लवकरच याचं रुपांतर व्यसनात झालं." "माझं कुटुंब, माझं काम, माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीवर याचा परिणाम झाला. हळूहळू व्यायामामुळे माझं नुकसान होऊ लागलं." व्यायामाचं व्यसन जसजसं वाढतं गेलं वॅलेरी आपल्या जीवाभावाच्या लोकांपासून दुरावू लागल्या.
त्या म्हणतात, "माझ्या नात्यावर याचा विपरित परिणाम होऊ लागला. काहींना मी काय करतीये हे कळतच नाही किंवा मी व्यायाम का करते, हे ते बघतच नाहीत. त्यांना वाटायचं मला वेड लागलं आहे." भेटल्यानंतर आपण स्क्वॅश खेळू किंवा पोहायला जाऊ, याच अटीवर वॅलेरी मित्र-मैत्रिणींनाही भेटायच्या. दिवसभरासाठी व्यायामाचं टार्गेट पूर्ण झाल्यावरच त्या आराम करायच्या.
"मित्र-मैत्रिणींना वाटायचं मला त्यांना भेटायची इच्छा नाही. पण, मला त्यांना भेटायची इच्छा असायची. फक्त मी माझा व्यायाम योग्य प्रकारे केला नाही तर मला फार अपराधी वाटायचं. हे माझ्यासाठी दोन दगडांवर पाय ठेवण्यासारखं होतं." व्यायामाच्या अतिरेकाचा त्यांच्या इतर महत्त्वाच्या नात्यांवरही परिणाम झाला होता. त्या सांगतात, "मी कधीच आराम करायचे नाही. मी सतत पळायला जायचे. घरी वेळ घालवावा, असं मला कधीच वाटायचं नाही."
"मला दाखवायचं होतं, की मी 'सुपरह्युमन' आहे आणि सगळं माझ्या नियंत्रणात आहे. पण, भावनिकदृष्ट्या हे सगळं माझ्यासाठी किती अवघड होतं, हे मला जाणवू द्यायचं नव्हतं." अनेक वर्षं स्वतःचं शरीर आणि मन दोघांनाही अतिरेकी ताण दिल्याने वॅलेरी यांना नैराश्याने ग्रासलं. त्यांना यातून बाहेर पडण्यासाठी वेळ हवा होता. त्यासाठी त्यांनी ऑफिसमधून चार महिन्यांची रजा घेतली.
व्यायामाचा अतिरेक हे 'वर्तनासंबंधीचं व्यसन' या श्रेणीत मोडतं, असं मानसोपचार तज्ज्ञ सांगतात. यात व्यक्ती अगदी वेडीपिशी होते. एखादीच गोष्ट त्याच्यासाठी अनिवार्य होऊन जाते किंवा मग ती व्यक्ती स्वतःच्या खाजगी आयुष्यात अगदी निष्क्रिय होऊन जाते. खाजगी आयुष्याकडे दुर्लक्ष करते.
जवळपास 3% लोक या व्यसनाला बळी पडतात आणि धावणाऱ्या लोकांमध्ये याचं प्रमाण 10% असल्याचं सांगितलं जातं. नॉर्थ लंडनमधल्या प्रायोरी हॉस्पिटलमध्ये सल्लागार मानसोपचार तज्ज्ञ असलेले डॉ. चेत्ना कँग सांगतात, वॅलेरीप्रमाणे खाजगी ताणापासून मुक्तता हवी असणाऱ्या हौशी धावपटूना हे व्यसन जडण्याची भीती अधिक असते.
ते म्हणतात, "बरेचदा लोक आमच्याकडे नात्यातील दुरावा, चिंता, नैराश्य या कारणांसाठी येतात. मात्र, तुम्ही जेव्हा खोलात जाता तेव्हा लक्षात येतं, की यामागचं मुख्य कारण व्यायाम आहे." ते पुढे सांगतात, "हे खूप कॉमन नसलं तरी याचं प्रमाण वाढत आहे."