Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तिवरे धरण फुटलं, 'पाण्यानं देव आणि माणूस यांच्यात फरक केला नाही'

तिवरे धरण फुटलं, 'पाण्यानं देव आणि माणूस यांच्यात फरक केला नाही'
- स्वाती पाटील-राजगोळकर
नेहमी पर्यटकांना खुणावणारं तिवरे धरण आज उद्धस्त झालं होतं. कोकणात गेले काही दिवस सतत पाऊस सुरू आहे. मंगळवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे पाण्याच्या तीव्र प्रवाहाने या धरणाच्या भिंतीला मोठा तडा गेला आणि क्षणार्धात होत्याच नव्हतं झालं. तब्बल 14 कुटुंब पाण्याच्या प्रवाहाने उध्वस्त केली.
 
तिवरे धरणाच्या पायथ्याशी गेल्यानंतर खरंतर निसर्गाचं वेगळं रूप पाहायला मिळतं चहूबाजूंनी हिरवाईनं नटलेला परिसर आणि मध्ये तिवरे धरणाच्या पायथ्याशी वाहणारी वशिष्ठी नदी. एरव्ही पाण्याचा खळाळत जाणारा आवाज हवाहवासा वाटतो, पण या दुर्घटनेनंतर हा आवाज जिवाच्या आकांताने ओरडणाऱ्या आवाजात नाहीसा झाला होता.
 
या वाहणाऱ्या पाण्याच्या किनाऱ्यावर तिवरे भेंडवाडी हे छोटसं गाव वसलं होतं. संध्याकाळी सगळ्यांच्या घरी जेवणाची गडबड होती आणि अचानक मोठा आवाज झाला सुरुवातीला काय घडलं हे कुणाला काही कळलं नाही. पण अचानक पाण्याचा इतका मोठा लोंढा आला की 14 घरं हा पाण्याचा लोंढा आपल्यासोबत घेऊन गेला.
 
ज्या ठिकाणी ही घरं उभी होती त्या ठिकाणी आता मोकळा माळ पाहायला मिळतोय. कुणी विचारही करू शकत नाही की या ठिकाणी काही वेळापूर्वी घरं होती. पाण्याच्या प्रवाहाने काही छोटी झाडं उन्मळून पडली होती आणि मुळं वर आली होती.
 
पण तरीही भयंकर प्रसंगात ठाम उभी राहिलेली काही झाडं होती. इथल्या एका झाडाखाली गणपतीच एक छोटास मंदिर होतं. पण पाण्यानं देव आणि माणूस यांच्यात फरक केला नाही सर्वांना आपल्या सोबत घेऊन गेलं.
 
दुर्घटना झाल्यानंतर आता प्रशासनाकडून मोठी खबरदारी घेतली जात आहे. तिवरे धरणाच्या पायथ्याशी कुणालाही सोडलं जात नाहीये. जवळपास पंधरा किलोमीटर आधीच गाड्या अडवल्या जात आहेत. तिथून पायी चालत तिवरे धरणापर्यंत पोहोचावं लागतं.
 
धरणाच्या पायथ्याशी गेल्यानंतर भयाण चित्र पाहायला मिळालं. ज्या ठिकाणी घर होती त्याचे अवशेष देखील शिल्लक नव्हते. तर शेजारी वाचलेली काही घरं होती जी आता धरणाच्या पाण्याच्या जोरानं मोडकळीला आली होती. त्या घरातल्या सगळ्यांना तिवरे गावच्या शाळेत स्थलांतरित करण्यात आले आहे.
 
काही लोकांचं अख्खं कुटुंबच उध्वस्त झालाय. तर काहीजण वेगळ्या ठिकाणी असल्याने किंवा नशीब बलवत्तर असल्याने या दुर्घटनेतून वाचलेत.
 
आपल्या जवळच्यांना गमावल्याचे दुःख करावं की स्वतःचा जीव वाचल्याचं समाधान मानावं अशा विचित्र अवस्थेत इथं अनेक कुटुंब पाहायला मिळाली.
 
माणसाची ही गत होती तर मुक्या जनावरांची त्याहून वाईट अवस्था होती. बरीचशी जनावर वाहून गेली तर काही वाचली. माणसाचं स्थलांतर झालं. पण मुकी जनावर तिथंच होती. काही जखमी जनावरांना हालचाल ही करता येत नव्हती. त्यांच्यापर्यंत कोण मदत पोहचवणार हा देखील प्रश्नच आहे.
 
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळी संध्याकाळी सव्वासातच्या दरम्यान भेट दिली यावेळी बोलताना दोषींवर कठोर कारवाई करू असं त्यांनी सांगितलं.
 
दरम्यान, मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केल्याचंही गिरीश महाजन यांनी जाहीर केलं.
 
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि गृहनिर्माण राज्यमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी काल प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी केली.
 
त्याआधी कामठेमधल्या उपजिल्हा रुग्णालयात त्यांनी पीडितांच्या नातेवाईकांशी चर्चा केली आणि माहिती जाणून घेतली. यावेळी पत्रकारांशी बोलताना महाजन म्हणाले, "ज्यांची घरं वाहून गेली आहेत, त्या सर्वांची एका शाळेत तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे आणि त्यांना चार महिन्याच्या आत मजबूत घरं बांधून देण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे."
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या दुर्घटनेवर तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. "या संदर्भातील मदतकार्याचा सातत्याने आढावा घेण्यात येत असून घटनेस जबाबदार असलेल्या कारणांचा शोध घेऊन संबंधितांवर कारवाई करण्यात येईल", असं त्यांनी स्पष्ट केलं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नरेंद्र मोदी सरकार शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट कसं करणार?