"पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालणं थांबवत नाही, तोपर्यंत त्यांच्याशी कोणतीही बोलणी होणार नाही. आता चर्चा व्हायची असेल, तर ती फक्त आणि फक्त पाकव्याप्त काश्मीर या एकाच विषयावर होईल," असं वक्तव्य संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं आहे.
हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काल्कामध्ये भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे, त्यावेळी ते बोलत होते.
"भाजप केवळ सरकार बनवण्यासाठी नाही, तर देश बनवण्यासाठी राजकारण करत आहे. मोदींच्या नेतृत्वात कलम 370 आणि 35 ए हटवल्यानंतर जम्मू -काश्मीर आणि लडाखच्या विकासासाठी, तसंच स्थानिक युवकांच्या भविष्याचा विचार करता त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यात येत आहे," असं ट्वीटही त्यांनी केलं आहे.
राजनाथ सिंह यांच्या वक्तव्यानंतर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी म्हटलं की, "राजनाथ सिंह यांचं वक्तव्य दाखवून देतं की, भारत एका अवघड स्थितीत फसला आहे. कारण भारतानं जम्मू-काश्मीरच्या सुरक्षेला आणि शांतलेला धोक्यात ढकललं आहे."