भारतीय वायुसेनेचं विमान एएन-32 बेपत्ता आहे. आसामच्या जोरहाट येथून उड्डाण घेतल्यानंतर काही वेळाने हे विमान बेपत्ता झालं. हे विमान अरुणाचल प्रदेशातील मेनचुका अॅडव्हान्स लॅंडिंग ग्राऊंडवर उतरणार होतं. काही वेळानी या विमानाचा संपर्क तुटला.
विमानात एकूण 13 लोक आहेत. यामध्ये 8 जण हे चालक दलातील आहेत, असं भारतीय सेनेचे प्रवक्ते विंग कमांडर रत्नाकर सिंह यांनी सांगितलं आहे.
नियोजित वेळी विमान मेनचुका अॅडव्हान्स लॅंडिंग ग्राऊंडवर उतरलं नाही हे समजताच अधिकाऱ्यांनी या विमानाच्या तपासाचं काम हाती घेतलं.
"भारतीय लष्करानं या विमानाच्या शोधकार्याला 1 जून 2019 पासून सुरुवात केली आहे. या शोधकार्यात लष्करानं आतापर्यंत 4500 मीटर उंचीवर अडकलेले डेप्युटी लीडर आणि यूनायटेड किंगडमच्या 4 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवलं आहे. आठ सदस्यांचा शोध सुरू आहे," असं भारतीय लष्करानं प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केलं आहे.
या विमानाचा शोध घेतला जात आहे. सुखोई-30 आणि 130 हर्क्लीज या विमानाच्या साहाय्याने एएन-32चा शोध घेतला जात आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे की या विमानाच्या स्थितीबाबत माझं एअर मार्शल राकेश सिंह भादुरिया यांच्याशी बोलणं झालं. या शोधमोहिमेबाबत ते मला माहिती देत आहेत. या विमानातले सर्व प्रवासी सुखरूप असावेत हीच प्रार्थना मी करत आहे असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे.
एएन 32 म्हणजेच अंतोनोव्ह 32 हे विमान मालवाहू विमान आहे. 1984 पासून या विमानाचा वापर भारतीय वायुसेना करत आहे. या विमानाचं डिजाइन युक्रेनच्या अॅंतोनोव्ह स्टेट कॉर्पोरेशनने बनवलं आहे. या विमानांना अत्यंत विश्वासू विमान मानलं जातं. हे विमान सात टन पर्यंत वजन उचलू शकतं. दोन इंजिन क्षमता असलेलं हे विमान 530 किमी प्रती तास या वेगाने उडू शकतं.