"आम्ही परिस्थितीवर काळजापूर्वक लक्ष ठेऊन आहोत. दुपारी साडेबारा वाजता दिल्लीहून काबूलला एक विमान रवाना होणार आहे. अफगाणिस्तानमधून लोकांना बाहेर काढण्यासंदर्भात सरकार प्रसिद्धीपत्रक जारी करेल", असं एअर इंडियाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.
तालिबानने अफगाणिस्तानच्या बहुतांश भागावर नियंत्रण मिळवलं आहे. हजारो नागरिक देश सोडून जाण्याच्या तयारीत आहेत.
मात्र अफगाणिस्तानमधली परिस्थिती लक्षात घेऊन अनेक देशांनी हवाई सेवा स्थगित केली आहे. काबूल विमानतळावर उभ्या असलेल्या एका विमानात जागा मिळवण्यासाठी चाललेली नागरिकांची धडपड या व्हीडिओतून स्पष्ट दिसते.
रविवारी तालिबानने राजधानी काबूलवर नियंत्रण मिळवलं. 24 तासानंतर काबूल शहरात गोंधळाचं वातावरण आहे. काबूल विमानतळावर हजारो नागरिकांनी देश सोडण्यासाठी गर्दी केली.
देशात लोकशाही ध्वस्त झाल्याबद्दल अनेकांनी दु:ख व्यक्त केलं.
बीबीसी प्रतिनिधी कवून खामोश यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, हताश चेहरे, दु:खी मनं यांनी काबूल भरून गेलं आहे. या सगळ्यांना देश सोडून जायचं आहे. त्यांच्या एका हातात फोन आणि दुसऱ्या हाताची नखं दातात धरून आहेत.
असंख्य महिलांना भवितव्याविषयी चिंता भेडसावते आहे.
मुलींचं बोर्डिंग स्कूल चालवणाऱ्या शबाना बासिज-रसीख यांनी ट्वीट करून म्हटलंय की मला असं वाटतंय की माझ्या डोक्यावर साडेतीन कोटीचा बोजा आहे.
अमेरिकन कर्मचारी अफगाणिस्तान सोडत आहेत
अमेरिकन दूतावास तसेच इतर कर्मचाऱ्यांना अफगाणिस्तानबाहेर आणण्यासाठी अमेरिकेचे प्रयत्न सुरू झाले आहेत. या कर्मचाऱ्यांना हमीद करझाई विमानतळावर आणण्यात आले आहेत. येथून ते काही वेळात अमेरिकेला रवाना होतील.
अफगाणिस्तानातून कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर आणण्यासाठी अमेरिकेनी 6 हजार सैनिकांची व्यवस्था केली आहे. असं सांगण्यात येत आहे की अमेरिकन सैनिक काबुल विमानातळाची सुरक्षा करत आहेत.
अफगाणिस्तानमधली वेगाने बदलणारी परिस्थिती लक्षात घेऊन, अमेरिकेने आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त सैनिक पाठवले आहेत.
दूतावासातील तसंच अन्य कर्मचाऱ्यांना अफगाणिस्तानमधून बाहेर पडता यावं यासाठी अमेरिकेचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत.