Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गलवान खोऱ्यात जवानांनी दाखवलेल्या धैर्याचा देशाला अभिमान - नरेंद्र मोदी

webdunia
शुक्रवार, 3 जुलै 2020 (17:27 IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज (3 जुलै) सकाळी अचानक लेहमध्ये पोहोचले. 15 जूनला भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक झटापटीच्या पार्श्वभूमीवर मोदींची ही भेट महत्त्वाची मानली जाते आहे. 15 जूनच्या हिंसक झटापटीत भारताच्या 20 जवानांचा मृत्यू झाला होता.
 
या भेटीनंतर मोदींनी जवानांना संबोधित केलं. ते म्हणाले, "गलवान खोऱ्यात भारताच्या जवानांनी जे धैर्य दाखवलं, त्यामुळे देशाला तुमचा अभिमान वाटतो."
 
"भारत सरकारनं अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. यात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफच्या पदाची निर्मिती, वन रँक वन पेन्शन असे अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. आपण सगळे एकत्र येऊन अडचणींचा सामना करत आलो आहोत, करत राहू, " असंही त्यांनी म्हटलं आहे.
 
दरम्यान, प्रसार भारती या भारतीय सरकारी वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, "भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता निमु इथं आहेत. पहाटेच ते इथे पोहोचले. पंतप्रधान मोदी सध्या लष्कर, हवाई दल आणि ITBP च्या जवानांशी संवाद साधत आहेत."
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे आणि सीडीएस बिपीन रावत हेही आहेत.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी आता जिथं आहेत, ती जागा समुद्रसपाटीपासून 11 हजार उंचीवर आहे. हा परिसर झंस्कार खोऱ्यात आहे. लष्करातील अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना परिस्थितीची सर्व माहिती दिली.
 
याआधी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे सीमेवर जाऊन परिस्थितीचा आढावा घेणार होते. मात्र, राजनाथ सिंह यांचा गुरुवारचा दौरा अचानक रद्द झाला होता.
 
आपण भारतासोबत असल्याचं अमेरिकेकडून स्पष्ट संकेत
दुसरीकडे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनीही भारत-चीन सीमेवरील तणावास चीनच्या आक्रमकतेला जबाबदार ठरवलंय.
 
व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी केली मॅकेनी यांनी बुधवारी ट्रंप यांच्यातर्फे भारत-चीन तणावाबाबत भाष्य केलं. चीनची आक्रमकता केवळ भारतासोबतच नव्हे, तर अनेक भागांबाबत असून, चिनी कम्युनिस्ट पार्टीचा तोच खरा चेहरा असल्याची टीका अमेरिकेनं केली.
 
याआधी अमेरिकेनं भारत-चीन तणावाबाबत बऱ्यापैकी तटस्थ भूमिका घेतली होती. मात्र, आता चिनी आक्रमकतेचा स्पष्ट उल्लेख करून आपण भारतासोबत असल्याचेच दाखवले आहे.
 
गलवानमध्ये 15/16 जूनच्या रात्री नेमकं काय झालं?
15 आणि 16 जूनच्या रात्री गलवान खोऱ्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनी जवानांसोबत झालेल्या हिंसक चकमकीत भारताच्या एका कर्नलसह 20 जवान मृत्युमुखी पडसे.
 
या चकमकीत चीनी जवानांनी खिळे लावलेल्या लोखंडी रॉडचा हत्यार म्हणून वापर केल्याचं सांगितलं जात आहे.
 
भारत-चीन सीमेवर तैनात असणाऱ्या एका वरिष्ठ भारतीय लष्करी अधिकाऱ्यानेही हा फोटो बीबीसीला पाठवला आहे आणि यानेच चीनी जवानांनी भारतीय जवानांवर हल्ला केल्याचं सांगितलं आहे. या घटनेनंतर दोन्ही देशांमधला तणाव अधिकच वाढला आहे. दोन्ही देशांनी एकमेकांवर अतिक्रमण केल्याचा आरोप केला आहे.
 
2020 च्या मे महिन्यात काही वृत्तांनुसार भारत आपला भूभाग समजत असलेल्या गलवान खोऱ्यातील काही ठिकाणी चिनी सैनिकांनी तंबू उभारले. तसंच अवजड साहित्यासहीत शिरकाव केला.
 
भारताचे आघाडीचे संरक्षण विश्लेषक अजय शुक्ला यांनी केलेल्या दाव्यानुसार, गेल्या महिन्याभरात चिनी सैन्याने भारतीय लष्कराची गस्त असलेल्या भूभागावर 60 चौरस किमीपर्यंत ताबा घेतला आहे.

Share this Story:

Follow Webdunia Hindi

पुढील लेख

तर पतंजलीवर कारवाई करण्याचा इशारा