Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नरेंद्र मोदी हे राजीव गांधींचं नाव वारंवार का घेत आहेत?

नरेंद्र मोदी हे राजीव गांधींचं नाव वारंवार का घेत आहेत?
- श्रीकांत बंगाळे
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या सभांमध्ये वारंवार माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर टीका करत आहेत. त्यांच्या टीकेला काँग्रेसने प्रत्युत्तर देताना म्हटलं आहे की गेल्या पाच वर्षातल्या गैरकारभारासाठी राजीव गांधी हेच जबाबदार आहेत का?
 
राजीव गांधी यांच्यावर आतापर्यंत मोदींकडून झालेल्या टीकेवर आपण एक नजर टाकू.
 
1. "तुमच्या (राहुल गांधी) वडिलांच्या दरबारातील लोक त्यांनी मिस्टर क्लीन म्हणत. पण त्यांचं आयुष्य शेवटी एक नंबरचे भ्रष्टाचारी अशा ओळखीसह संपलं."
 
2. "राजीव गांधी यांनी पंतप्रधान असताना INS विराट या युद्धनौकेचा वापर कुटुंबीयांना सुट्टीत लक्षद्वीप इथं सहलीला नेण्यासाठी केला. त्यातून राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आणली."
 
पंतप्रधान नरेंद्र मोदींची ही वक्तव्यं.
मोदींच्या या वक्तव्यांवर काँग्रेस नेते पवन खेडा यांनी पत्रकार परिषद घेत उत्तर दिलं आहे.
 
ते म्हणाले, "बोफोर्स, आयएनएस विराटवर प्रश्न विचारले जात आहेत. आम्ही उत्तर द्यायला तयार आहोत. 30 वर्षांपूर्वी राजीव गांधी सहलीसाठी अंदमानला गेले, असं मोदी म्हणत आहे. पण ते सिरियल लायर आहेत. व्हाईस अडमिरल विनोद पसरिचा यांनी माध्यमांसमोर सांगितलं की, राजीव गांधी हे एका अधिकृत दौऱ्यावर होते. ते सहलीसाठी गेले नव्हते. पण मोदींना खरं बोलायचं नाहीये. त्यांच्याकडे सांगण्यासारखं काही नाहीये."
 
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचे 5 टप्पे पार पडले असून 2 टप्प्यांतील मतदान अजून बाकी आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर सतत टीका करत आहेत. तचे राजीव राजीव गांधींचं नाव वारंवार का घेत आहेत? यामागे काही राजकीय अर्थ आहे का?
webdunia
राजीव गांधींचा वारंवार उल्लेख का?
ज्येष्ठ पत्रकार रशीद किदवई यांच्या मते, "पंतप्रधान नरेंद्र मोदी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर सातत्यानं टीका करत आहेत. यामागे दोन गोष्टी असू शकतात. एक तर त्यांना लोकसभा निवडणुकीतील विजयाबद्दल प्रचंड आत्मविश्वास असू शकतो. म्हणजे 300हून अधिक जागा आपण जिंकणार आहोत, असं त्यांना वाटत असावं. किंवा दुसरीकडे त्यांच्या मनात प्रचंड अस्वस्थता असू शकते. या निवडणुकीत आपल्यासाठी अनुकूल स्थिती नाही, त्यामुळे इतर मुद्द्यावर प्रचार करावा, असं त्यांना वाटत असावं."
 
"मोदी हे बोफोर्स, 1984चे दंगे या मुद्द्यांवरून राजीव गांधींवर टीका करत आहेत. पण या मुद्द्यांमध्ये नवीन असं काहीच नाही. या सगळ्या गोष्टी आधीच पब्लिक डोमेनमध्ये आलेल्या आहेत," किदवई पुढे सांगतात.
 
किदवई यांचा हाच मुद्दा पुढे नेत ज्येष्ठ पत्रकार सुजाता आनंदन सांगतात, "मोदी आता सांगत असलेल्या सगळ्या गोष्टी तेव्हाच जनतेच्या समोर आल्या होत्या. यामुळे राजीव गांधी 1989ची निवडणूकही हरले होते. त्यामुळे 30 वर्षांपूर्वीचे हे मुद्दे नरेंद्र मोदी काढत आहेत. खरं तर मोदींनी 5 वर्षांत काय काम केलं, यावर निवडणूक लढवली पाहिजे. पण तसं होताना दिसत नाही. कारण त्यांच्याकडे नवीन मुद्दे नाहीत."
 
त्या पुढे एक नवीन मुद्दा सांगतात, "भाजपच्या इंटर्नल कमिटीचा एक अहवाल आहे. त्यामुळे कदाचित त्यांना उत्तर प्रदेशात हवा तसा प्रतिसाद मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे मग राजीव गांधींचं नाव घेऊन लोकांच्या भावनेला हात घालायचा मोदींचा प्रयत्न असू शकतो."
webdunia
शीख मतदारांवर प्रभाव?
मोदींच्या राजीव गांधींवरील टीकेचा येणाऱ्या मतदानावर काही प्रभाव पडेल का, यावर बीबीसी पंजाबीचे संपादक अतुल संगर सांगतात, "1984मध्ये इंदिरा गांधी यांनी ऑपरेशन ब्लू स्टार घडवून आणलं. यातून मग त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांची हत्या केली. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर दिल्लीत दंगल झाली. त्या दंगलीत शिखांची कत्तल करण्यात आली. यानंतर राजीव गांधींनी एक वक्तव्य केलं.
 
"जब कोई बडा पेड गिरता है, तो धरती कांपती है," हे ते वक्तव्य होतं. त्यांचं हे वक्तव्य म्हणजे शीखांच्या हत्याकांडावरील स्पष्टीकरण म्हणून पाहिलं गेलं. यामुळे मग विरोधी पक्ष आजही त्या गोष्टींचा वापर करताना दिसून येतात. यातून विरोधकांना शिखांच्या कत्तलींची आठवण शीख समुदायाला करून द्यायची असते. तो काळ आठवा, असं शिखांना सांगण्याचा त्यांचा प्रयत्न असतो."
 
"आता दिल्ली, पंजाब आणि हरियाणात मतदान होणार आहे. या तिन्ही राज्यात शीख मतदारांची संख्या अधिक आहे. यादरम्यान, शिखांनी राजीव गांधींचा काळ आठवावा, जेणेकरून त्यांच्या मतावर त्याचा परिणाम होईल, अशी विरोधकांची खेळी असू शकते. कारण आजही राजीव गांधींचा काळ आठवला की, शीख समुदायाच्या मनात जुन्या आठवणी ताज्या होतात. पंतप्रधान मोदी राजीव गांधी यांचं नाव याचसाठी घेत असावेत," ते पुढे सांगतात.
webdunia
काँग्रेस पक्ष का बोलत नाही?
राजीव गांधी यांच्यावरील टीकेवर उत्तर देताना सुरुवातीला काँग्रेस पक्षाने टाळलं. पण त्यांनतर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी प्रत्युत्तर दिलं.
 
"मोदी तुमचे कर्म तुमचं वाट पाहत आहेत. तुम्ही कितीही तिरस्कारानं बोललात तरी मी तुम्हाला प्रेमानं मिठी मारेल," असं राहुल गांधींनी म्हटलं.
 
"सैनिकांच्या नावानं मतदान मागणाऱ्या पंतप्रधानांनी एका ईमानदार माणसाचा अपमान केला आहे. तुम्हाला अमेठीचं जनताच उत्तर देईल," असं प्रियंका गांधींनी म्हटलं.
 
पण या केवळ प्रतिक्रिया आहेत, काँग्रेस नेते राजीव गांधींवरील टीकेवर जास्त बोलत नाही आहेत, असं बीबीसी पंजाबीचे संपादक अतुल संगर यांनी सांगितलं.
 
ते सांगतात, "राजीव गांधी यांच्या नावाशी काही वाद जोडले गेले आहेत. यामध्ये बोफोर्स प्रकरण, दिल्ली आणि पंजाबमधील हिंसाचार प्रकरण यांचा समावेश होतो. राजीव गांधींचं नाव घेतलं की हे वाद पुन्हा उफाळून येतात. त्यामुळे मग यापासून दूर राहण्यासाठी काँग्रेस राजीव गांधींवरील टीकेला चोख प्रत्युत्तर देत नसावेत."
 
राजीव गांधी यांच्यावर होणाऱ्या टीकेवर काँग्रेस पक्ष बोलताना दिसत नाही. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण सांगतात, "राजीव गांधी यांच्यावर होणाऱ्या टीकेवर मी बोलतच आहे की. पंतप्रधान नरेंद्र मोदींना पराभव दिसत आहे, त्यामुळे प्रसिद्धी मिळवण्यासाठी ते राजीव गांधींबाबत अशोभनीय वक्तव्यं करत आहेत."
 
मोदींचं स्पष्टीकरण
 
राजीव गांधींवर सातत्याने टीका का करत आहात या प्रश्नाला पंतप्रधान मोदींनीच एका मुलाखतीदरम्यान उत्तर दिलं आहे. ते सांगतात, "काँग्रेसच्या नेत्यानं (राहुल गांधी) एका मॅगेझिनला मुलाखत देताना म्हटलं की मला नरेंद्र मोदींची प्रतिमा उद्ध्वस्त करायची आहे. यासाठीच मग ते माझ्यावर खोटे आरोप लावत आहेत. मग मी या विरोधात बोलायचं ठरवलं."
 
"त्यांच्या वडिलांना त्यांचे दरबारी मि. क्लीन म्हणायचे. पण जाताना भ्रष्टाचार प्रकरणातले आरोपी अशी प्रतिमा ठेवून ते गेले," असं मोदींनी टाईम्स नाऊ या वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.
 
"देशाच्या पंतप्रधानाची इमेज तोडण्यासाठी तुम्ही कोणताही चुकीचा मार्ग अनुसरत असाल, तर हा देश माजी पंतप्रधानांबद्दलही बोलेल, असं मी म्हटलं. माझ्या बोलण्यानं त्यांना मिरची लागली आहे, कारण खरं ऐकण्याची त्यांची तयारी नाहीये," असंही मोदींनी म्हटलं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

एअरटेल फोर-जी हॉटस्पॉट झाला स्वस्त