Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

झाशीची राणी : प्राणाची बाजी लावणाऱ्या राणी लक्ष्मीबाई यांचे अखेरचे क्षण

झाशीची राणी : प्राणाची बाजी लावणाऱ्या राणी लक्ष्मीबाई यांचे अखेरचे क्षण
, शुक्रवार, 19 नोव्हेंबर 2021 (12:51 IST)
रेहान फजल
कॅप्टन रॉड्रिक ब्रिग्ज ही पहिली इंग्रज व्यक्ती होती ज्याने त्याच्या डोळ्यांनी राणी लक्ष्मीबाईला रणांगणात लढताना पाहिलं होतं.
राणीने घोड्याचा लगाम आपल्या दातांनी दाबून ठेवला होता. ती दोन्ही हातांनी तलवार चालवत होती आणि एकाच वेळेला दोन्ही बाजूंनी वार करत होती.
कॅप्टन रॉड्रिक ब्रिग्ज यांच्याआधी एक इंग्रज अधिकारी जॉन लँग यांनाही राणी लक्ष्मीबाईंना जवळून पाहण्याची संधी मिळाली होती. पण रणांगणात नव्हे तर त्यांच्या हवेलीमध्ये.
राणी लक्ष्मीबाई यांनी जेव्हा दामोदरला दत्तक घेतलं तेव्हा इंग्रजांनी ते बेकायदेशीर घोषित केलं. त्यामुळे राणी लक्ष्मीबाईंना त्यांचा झाशीचा महाल सोडावा लागला.
त्यांनी 'रानी महल' नावाच्या एका तिमजली हवेलीमध्ये आश्रय घेतला होता.
कायदेशीर लढाईसाठी राणीने वकील जॉन लँग यांची मदत घेतली. त्यांनी नुकताच ब्रिटिश सरकारच्या विरोधातला एक खटला जिंकला होता.
लँग यांचा जन्म ऑस्ट्रेलियामध्ये झाला होता आणि ते मेरठमध्ये The Moffusilite नावाचं एक वर्तमानपत्र चालवत होते.
लँग यांना फारसी आणि हिंदुस्तानी अशा दोन्ही भाषा चांगल्या येत होत्या. ईस्ट इंडिया कंपनीचे प्रशासकीय अधिकारी त्यांच्यावर नाराज होते कारण लँग नेहमीच त्यांना कायदेशीररीत्या घेरण्याचा प्रयत्न करत होते.
लँग जेव्हा पहिल्यांदा झाशीला आले तेव्हा राणीने त्यांना आणण्यासाठी एक घोड्यांचा रथ आग्र्याला पाठवला.
त्यांना झाशीला आणण्यासाठी राणीने आपले दिवाण आणि एका जवळच्या अनुयायाला पाठवलं होतं.
या अनुयायाच्या हातात बर्फानं भरलेली एक बादली होती. त्यात पाणी, बियर आणि निवडक वाइनच्या बाटल्या ठेवलेल्या होत्या. पूर्ण रस्त्यात एक नोकर त्यांना पंख्याने वारा घालत होता.
ते झाशीला पोहोचले तेव्हा लँग यांना पन्नास घोडेस्वारांनी एका पालखीत बसवून रानी महालपर्यंत आणलं. इथे राणीने एक शामियाना तयार ठेवला होता.
राणी लक्ष्मीबाई या शामियानाच्या एका कोपऱ्यात पडद्यामागे बसल्या होत्या. तेवढ्यात अचानक त्यांचा दत्तकपुत्र दामोदरने पडदा बाजूला केला.
लँग यांची नजर राणीकडे गेली. या घटनेनंतर रेनर जेरॉस्च यांनी एक पुस्तक लिहिलं. 'द रानी ऑफ झाँसी, रेबेल अगेन्स्ट विल'.
या पुस्तकात रेनर जेरॉस्च यांनी जॉन लँग यांचं वक्तव्य दिलं होतं. ते म्हणतात, ''राणी एक मध्यम उंचीची पण तगडी महिला होती. तरुणपणी त्यांचा चेहरा खूपच सुंदर असावा पण याही वयात त्यांच्या चेहऱ्याचं आकर्षक रूप कमी झालं नव्हतं. मला एक गोष्ट थोडी आवडली नाही ती म्हणजे त्यांचा जरा जास्तच गोल चेहरा. हां, त्यांचे डोळे खूप सुंदर होते आणि नाकही खूपच नाजूक होतं. त्या फार गोऱ्या नव्हत्या. सोन्याचे कानातले सोडले तर त्यांनी एकही दागिना घातला नव्हता. त्यांनी पांढरी शुभ्र मलमलची साडी नेसली होती. त्यातून त्यांची देहाकृती स्पष्ट आणि रेखीव दिसत होती. त्यांच्या व्यक्तिमत्वाला मारक ठरेल अशी एकच गोष्ट होती.. त्यांचा फाटलेला आवाज.''
कॅप्टन रॉड्रिक ब्रिग्ज यांनी निर्धार केला होता की ते स्वत: पुढे येऊन राणीवर वार करण्याचा प्रयत्न करतील.
पण जेव्हाजेव्हा ते असं करू पाहत होते तेव्हा राणीचे घोडेस्वार त्यांना घेराव घालून त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत होते. त्यांचं लक्ष राणीवरून हटवावं यासाठी त्यांचा हा खटाटोप होता.
रॉड्रिकनी काही लोकांना ठार केलं आणि काही लोकांना जखमी केलं. त्यानंतर घोड्याला टाच मारून ते राणीकडे जाऊ लागले.
त्याचवेळी रॉड्रिकच्या मागून जनरल रोज यांच्या अत्यंत तरबेज असलेल्या उंटांच्या तुकडीने प्रवेश केला. ही तुकडी रोज यांनी राखीव ठेवली होती.
या तुकडीचा वापर ते हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी करणार होते. ही तुकडी अचानक आल्याने ब्रिटिशांच्या फौजेचं बळ वाढलं. राणीला लगेचच धोक्याचा अंदाज आला.
राणीचे सैनिक रणांगणातून पळाले नाहीत पण हळूहळू त्यांची संख्या रोडावली.
या लढाईत सामील झालेले जॉन हेनरी सिलवेस्टर त्यांच्या 'रिकलेक्शन्स ऑफ द कँपेन इन माळवा अँड सेंट्रल इंडिया' या पुस्तकात लिहितात, 'अचानक राणी जोरात ओरडली. माझ्या मागे या. पंधरा घोडेस्वारांचा एक जत्था त्यांच्यामागे निघाला. राणी रणांगणातून एवढ्या वेगाने बाहेर पडली की इंग्रज सैनिकांना हे लक्षात यायला काही सेकंद लागले. अचानक रॉ़ड्रिक आपल्या सहकाऱ्यांना ओरडून म्हणाले, ''ही झाशीची राणी आहे, पकडा तिला.''
 
राणी आणि तिच्या सैनिकांनी एक मैलाचं अंतर कापलं होतं तेव्हा कॅप्टन ब्रिग्ज यांचे घोडेस्वार त्यांच्या अगदी मागे येऊन ठेपले. ही जागा होती, कोटा की सराय.
 
पुन्हा शर्थीची लढाई सुरू झाली. राणीच्या सैनिकांच्या दुपटीने ब्रिटिश सैनिक होते. अचानक राणीला आपल्या छातीच्या डाव्या बाजूला वेदना जाणवू लागली. जणू तिथे सापानेच चावा घेतला होता.
 
एका इंग्रज सैनिकाने तिच्या नकळत तिच्या छातीत सुरा खुपसला होता. ती वेगाने वळली आणि हल्लेखोरावर तलवार घेऊन तुटून पडली.
राणीला झालेली जखम फारशी खोल नव्हती पण या जखमेतून खूप रक्त निघत होतं. घोड्यावरून जाताना तिला एक छोटासा ओढा दिसला.
 
राणीने विचार केला की घोड्याच्या एका टापेत हा ओढा पार करता येईल. मग कुणीच आपल्याला पकडू शकणार नाही.
 
तिने घोड्याला टाच मारली पण घोडा उडी मारण्याच्या ऐवजी इतक्या झटकन थांबला की राणी घोड्याच्या मानेभोवती लटकू लागली.
 
तरीही तिने घोड्याला टाच मारली पण घोडा एक इंचही पुढे सरकायला तयार नव्हता. तेवढ्यात तिच्या लक्षात आलं की तिच्या कमरेच्या डाव्या बाजूला कुणीतरी जोराने वार केला आहे.
 
राणीला बंदुकीची गोळी लागली होती. तिच्या डाव्या हातातली तलवार निखळून पडली. तिने त्याच हाताने आपल्या कमरेतून वाहणारं रक्त थांबवण्याचा प्रयत्न केला.
अँटोनिया फ्रेजर 'द वॉरियर क्वीन' (लढवय्यी राणी) या पुस्तकात लिहितात, 'तोपर्यंत एक इंग्रज राणीच्या घो़ड्याजवळ येऊन पोहोचला होता. त्याने राणीवर वार करण्यासाठी त्याची तलवार उचलली. राणीनेही त्याचा वार परतवून लावण्यासाठी उजव्या हातातली आपली तलवार वर केली. पण त्या इंग्रज सैनिकाची तलवार राणी लक्ष्मीबाईंच्या डोक्यावर एवढ्या जोराने लागली की त्यांचं डोकं अर्ध्यात फाटलं. त्यातून वाहणाऱ्या रक्तामुळे राणीला दिसेनासं झालं.'
 
'तरीही ती पुरी ताकद लावून लढत होती. तिने त्या इंग्रज सैनिकावर पलटवार केला पण ती त्याच्या खांद्यावरच वार करू शकली. राणी घोड्यावरून खाली पडली.
 
तेवढ्यात एका सैनिकाने घोड्यावरून उडी मारून राणीला उठवलं आणि एका मंदिरात आणलं. तोपर्यंत ती जिवंत होती.
 
मंदिरातल्या पुजाऱ्याने तिच्या सुकलेल्या ओठांवर एका बाटलीत ठेवलेलं गंगेचं पाणी लावलं. राणीची अवस्था खूपच बिकट होती. हळूहळू तिची शुद्ध हरपू लागली.
 
तिकडे मंदिराच्या बाहेर गोळीबार सुरूच होता. शेवटच्या सैनिकाला मारल्यानंतर इंग्रज सैनिकांना वाटलं की त्यांनी त्यांचं काम फत्ते केलं आहे.
तेवढ्यात रॉड्रिकने जोरात ओरडून सांगितलं, ते लोक मंदिरात गेले आहेत. त्यांच्यावर हल्ला करा. राणी अजूनही जिवंत आहे.
 
इकडे पुजाऱ्यांनी राणीसाठी अंतिम प्रार्थना सुरू केली होती. राणीच्या एका डोळ्याला इंग्रज सैनिकाने केलेल्या कट्यारीच्या वारांमुळे जखम झाली होती. तो डोळा ती उघडू शकत नव्हती. पण तिने मोठ्या मुश्किलीने आपला दुसरा डोळा उघडला. तिला सगळं धूसर दिसत होतं. तिच्या तोंडातून कसेबसे शब्द निघत होते. दामोदर.. मी त्याला तुमच्या भरवाशावर सोडते. त्याला छावणीमध्ये घेऊन जा. लवकर जा.. घेऊन जा त्याला.
 
राणीने आपल्या गळ्यातला मोत्यांचा हार काढण्याचा प्रयत्न कोला. पण तो ती काढू शकली नाही. ती पुन्हा बेशुद्ध पडली.
 
मंदिराच्या पुजाऱ्याने राणीच्या गळ्यातला हार उतरवून तिच्या अंगरक्षकाकडे सोपवला. हे ठेवा दामोदरसाठी .. ते म्हणाले.
राणीचे श्वास वेगाने चालू लागले. तिच्या जखमांमधून निघणारं रक्त फुफ्फुसांमध्ये जात होतं. हळूहळू ती श्वास मंद होत गेले.पण अचानक तिच्यात कुठूनतरी शक्ती आली.
ती म्हणाली, माझं शरीर इंग्रजांच्या हाती पडू देऊ नका. हे म्हणताना तिने थोडं उचललेलं डोकं लगेचच खाली पडलं. तिच्या श्वासात एक झटका बसला आणि सगळं शांत झालं.
 
झाशीच्या राणीने आपल्या प्राणांची आहुती दिली होती. राणीच्या अंगरक्षकांनी जवळूनच काही लाकडं जमा केली आणि राणीच्या पार्थिवाला अग्नी दिला.
 
त्यांच्या भोवती सगळीकडे बंदुकीच्या गोळ्यांचे आवाज घुमत होते. मंदिराच्या भिंतीबाहेर आता शेकडो ब्रिटिश सैनिक पोहोचले होते.
 
मंदिराच्या आतून फक्त तीन बंदुकांमधून इंग्रज सैनिकांवर गोळ्या झाडल्या जात होत्या. आधी एक बंदूक शांत झाली, मग दुसरी आणि तिसरीही बंदूक शांत झाली.
इंग्रज सैनिक जेव्हा मंदिरात घुसले तेव्हा तिथे कुठलाच आवाज नव्हता. सगळं काही शांत होतं. सगळ्यात पहिल्यांदा रॉड्रिक ब्रिग्ज आत घुसले.
 
तिथे राणीचे सैनिक आणि पुजाऱ्यांचे काही मृतदेह पडले होते. एकही जण जिवंत वाचला नव्हता. पण ते एका मृतदेहाच्या शोधात होते.
 
हा शोध घेतानाच त्यांची नजर एका जळणाऱ्या चितेकडे गेली. त्यांनी आपल्या बुटांनी ही आग विझवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांना या ज्वाळांमध्ये मानवी शरीराचे अवयव जळताना दिसले.
 
राणीच्या हाडांची जवळजवळ राख झाली होती.
 
या लढाईत लढलेल्या कॅप्टन क्लेमेंट वॉकर हेनीज यांनी नंतर राणीच्या या शेवटच्या क्षणांचं वर्णन करताना म्हटलं, 'आमचे विरोधक आता संपले होते. अवघ्या काही सैनिकांच्या आणि काही शस्त्रांच्या मदतीने ही राणी आपल्या सैनिकांमध्ये जान आणण्याचा प्रयत्न करत होती. राणी मोठ्याने ओरडून वारंवार आपल्या सैनिकांचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करत होती. पण त्याचा फारसा परिणाम होत नव्हता. काही मिनिटांतच आम्ही या महिलेच्या फौजेवर ताबा मिळवला. आमच्या एका सैनिकाने तिच्या डोक्यावर कट्यारीने केलेल्या वारामुळे सगळं काही संपलं. आम्हाला नंतर कळलं की, ही महिला म्हणजे खुद्द झाशीची राणी होती.'
राणीचा पुत्र दामोदरला रणांगणापासून सुरक्षित ठिकाणी नेण्यात आलं. इरा मुखोटी आपल्या 'हिरॅाइन्स'या पुस्तकात लिहितात, "दामोदरने 2 वर्षांनंतर 1860 मध्ये इंग्रजांच्या समोर आत्मसमर्पण केलं. नंतर इंग्रजांनी त्याला निवृत्तीवेतनही दिलं. दामोदरला 58 व्या वर्षी मृत्यू आला. मृत्यूच्या वेळी ते पूर्ण कंगाल होते. त्यांचे वंशज अजूनही इंदूरमध्ये राहतात आणि स्वत:ला 'झाशीवाले' म्हणवून घेतात."
 
राणीच्या मृत्यूनंतर बंडखोरांचा धीर खचला आणि ग्वाल्हेरवर इंग्रजांनी ताबा मिळवला.
नानासाहेब पेशवे तिथून वाचले पण तात्या टोपेंशी त्यांचा मित्र नवाडच्या राजाने गद्दारी केली.
तात्या टोपे पकडले गेले आणि त्यांना ग्वाल्हेरजवळ शिवपुरीला नेऊन एका झाडाला लटकवून फाशी देण्यात आलं.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

International Men's Day 2021 : पुरुषांबद्दल काही मनोरंजक तथ्ये