Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Friday, 18 April 2025
webdunia

राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षनेत्यांना श्रीनगरमधून परत पाठवण्यात आलं

Rahul Gandhi sent back from Sringar airport
काश्मीरमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी हे 11 विरोधी पक्षनेत्यांच्या एका शिष्टमंडळासोबत श्रीनगरला पोहोचले होते. मात्र त्यांना परत पाठवण्यात आलं, असं ट्वीट ANI वृत्तसंस्थेने केली आहे.
 
या शिष्टमंडळात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, केसी वेणुगोपाल, CPMचे महासचिव सीताराम येचुरी, DMKचे नेते तिरुची शिवा, शरद यादव, राष्ट्रवादीचे नेते माजिद मेमन यांचा समावेश आहे.
 
दुसरीकडे जम्मू-काश्मीर प्रशासनानं राजकीय नेत्यांना काश्मिरात न येण्याचं आवाहन केलं आहे. "सरकार सध्या काश्मीरमधील लोकांचा सीमेपार दहशतवाद आणि कट्टरतावादी आणि फुटीरतावाद्यांपासून बचाव करण्याचा प्रयत्न करत आहे, इथे शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे. अशात जर काही ज्येष्ट राजकीय नेते काश्मीरमध्ये आले तर त्यामुळे सरकारच्या या प्रयत्नांना तडा जाईल, शिवाय स्थानिकांची गैरसोय होईल," असं ट्वीट जम्मू-काश्मीर प्रशासनानं केलं होतं.
 
पण असा कोणताही सल्ला आपल्याला मिळालेला नसल्याचं विरोधी पक्षांचं म्हणणं होतं.
 
"काश्मीरमधील परिस्थिती ठीक आहे, तर विरोधी पक्षांना तिथं जाण्यापासून का रोखण्यात येत आहे, दोन माजी मुख्यमंत्र्यांना नजरकैदेत का ठेवण्यात आलं आहे," असं गुलाम नबी आझाद यांनी माध्यमांना सांगितलं होतं. "माझं घर तिथं आहे आणि मी घरी जाऊ शकत नाहीये," असंही त्यांनी म्हटलं होतं.
 
भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी विरोधकांच्या भेटीला 'पर्यटन दौरा' म्हटलं आहे.
 
सत्यपाल मलिक यांचं निमंत्रण होतं
जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम 370 केंद्र सरकारने रद्द केल्यानंतर राहुल गांधींनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटलं होतं की, "जम्मू-काश्मीर अशांत असल्याचे वृत्त समोर येतायत. सरकारने तिथे माध्यम आणि एकूणच संवादावर बंदी आणलीय. मी सरकारला विनंती करतो की, त्यांनी जम्मू-काश्मीरच्या लोकांना सुरक्षेची हमी द्यावी आणि जी गोपनीयता पाळली जातेय, त्यावरील पडदा हटवावा."
 
राहुल गांधींच्या प्रतिक्रियेला उत्तर देताना जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक म्हणाले, "राहुल गांधी यांना मी जम्मू-काश्मीरमध्ये येण्याचं निमंत्रण देतो. मी तुमच्यासाठी विमानही पाठवेन, तुम्ही या आणि इथली परिस्थिती पाहून बोला. तुमच्यासारख्या जबाबदार व्यक्तीने असं वक्तव्य करायला नको होतं."
 
सत्यपाल मलिक म्हणाले होते, "कलम 370 आणि कलम 35ए हटवण्यात आलं आहे. याला धार्मिक रंग नाही. लेह, कारगिल, राजौरी, जम्मू, पुंछ कोठेही जातीय तणावाच्या घटना घडलेल्या नाहीत. काश्मीर खोऱ्यात कोठेही जातीय तणावाच्या घटना घडलेल्या नाहीत."
 
यानंतर राहुल यांनी ट्वीट केलं होतं, "प्रिय राज्यपाल मलिक, विरोधी पक्षनेत्यांचं शिष्टमंडळासह मी स्वत: तुमचं निमंत्रण स्वीकारून जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये येण्यास तयार आहे. आम्हाला तुमच्या विमानाची गरज नाही. मात्र, जम्मू-काश्मीरमध्ये आम्ही मुक्तपणे फिरू शकतो आणि स्थानिक नागरिक, राजकीय नेते आणि जवानांशी संवाद साधू शकतो, याची खात्री द्या."

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

स्वर्गीय अरुण जेटली यांची कारकीर्द कशी होती, वाचा