Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अमेठी लोकसभा निवडणूक: मतदान LIVE - राहुल गांधी वि. स्मृती इराणी लढतीकडे सगळ्यांचं लक्ष

अमेठी लोकसभा निवडणूक: मतदान LIVE - राहुल गांधी वि. स्मृती इराणी लढतीकडे सगळ्यांचं लक्ष
, सोमवार, 6 मे 2019 (10:13 IST)
लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सुरू आहे. पाचव्या टप्प्यातील मतदानानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह आणि स्मृती इराणी यांच्यासह अनेकांचं भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे.
 
पाचव्या टप्प्यासाठी 7 राज्यांतील 51 जागांवर मतदान होत आहे. यामध्ये उत्तर प्रदेशातील 14, मध्य प्रदेशातील 7, बिहारमधल्या 5, राजस्थानातील 13, झारखंडमधल्या 4, जम्मू-काश्मीरमधील 2 आणि बंगालमधील 7 जागांवर मतदान होत आहे.
 
हा टप्पा भाजपसाठी अतिशय महत्त्वाचा आहे, कारण 2014च्या निवडणुकीत या 51 जागांपैकी 39 जागा भाजपने जिंकल्या होत्या.
 
राज्य मतदारसंघांची संख्या मतदारसंघ
उत्तर प्रदेश 14 अमेठी, रायबरेली, लखनौ, फिरोजाबाद, सीतापूर, धौरहरा, बांदा, फतेहपूर, कौशांबी, बाराबंकी, बहराइच, कैसरगंज, गोंडा, मोहनलालगंज
राजस्थान 12 जयपूर, जयपूर ग्रामीण, बिकानेर, दौसा, नागौर, गंगानगर, चुरू, झुंझुनु, सीकर, अलवर, भरतपूर, करौली
मध्य प्रदेश 7 दमोह, खजुराहो, सतना, रीवा, होशंगाबाद, बैतुल, टीकमगढ
बिहार 5 मधुबनी, सारन, सीतामढी, मुझफ्फरपूर, हाजीपूर
झारखंड 4 कोडरमा, रांची, हजारीबाग, खुंटी
पश्चिम बंगाल 7 बैरकपूर, हावडा, श्रीरामपूर, बंगाव, उलुबेरिया, आरामबाग, हुगली
जम्मू-काश्मिर 2 लडाख, अनंतनाग (केवळ शोपियां जिल्ह्यामध्येच)

राजस्थानमधील ज्या 13 जागांवर मतदान होत आहे, त्या जागाही 2014च्या निवडणुकीत भाजपच्या पारड्यात पडल्या होत्या.
 
उत्तर प्रदेशचा विचार करता इथल्या 14 जागांपैकी 12 जागा भाजपच्या खात्यात गेल्या होत्या. काँग्रेसनं जिंकलेल्या दोन जागा होत्या रायबरेली आणि अमेठी. पण या उत्तर प्रदेशमध्ये सपा आणि बसपाची युती झाली आहे.
 
राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुका जिंकल्यानंतर काँग्रेसचाही आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळेच उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये भाजपसाठी ही निवडणूक तितकी सोपी नाहीये.
 
अमेठीकडे सर्वांचेच लक्ष
पाचव्या टप्प्यातील सर्वांत लक्षवेधी लढत आहे अमेठीची. इथं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींसमोर केंद्रीय मंत्री स्मृती इराणींचं आव्हान आहे. अमेठी हा काँग्रेसचा परंपरागत मतदारसंघ आहे. काँग्रेस केवळ दोन वेळा अमेठीमध्ये पराभूत झाली आहे.
 
राहुल गांधी 2004 पासून अमेठीचं प्रतिनिधीत्व करत आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींना 4 लाख 8 हजार मतं मिळाली होती तर स्मृती इराणी यांना 3 लाख. पराभवानंतरही स्मृती इराणी अमेठीमध्ये आपलं काम सुरूच ठेवलं होतं. त्यामुळंच यावेळी राहुल गांधींसमोर स्मृती इराणींचं आव्हान अधिक कडवं असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.
 
रायबरेलीतून निवडणूक लढवत असलेल्या सोनिया गांधींसाठी मात्र ही निवडणूक फारशी कठीण जाणार नाही, असं राजकीय विश्लेषक सांगतात. काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले दिनेश प्रताप सिंह सोनिया गांधींविरोधात निवडणूक लढवत आहेत.
 
राजनाथ सिंह विरुद्ध पूनम सिन्हा
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह हे लखनौमधून निवडणूक लढवत आहेत. लखनौ हा माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा मतदारसंघ होता.
 
राजनाथ सिंह यांच्या विरोधात सपा-बसपा आघाडीनं शत्रुघ्न सिन्हा यांच्या पत्नी पूनम सिन्हांना उमेदवारी दिली आहे. स्वतः काँग्रेसचे पाटणा साहीबचे उमेदवार असलेले शत्रुघ्न सिन्हा हे पूनम यांच्या प्रचारसभांमध्ये ठळकपणे दिसत होते.
 
राजस्थानमध्ये दोन खेळाडूंमध्ये लढत
राजस्थानमध्ये लोकसभेच्या 12 जागांसाठी मतदान होत आहे. दोन केंद्रीय मंत्रीही निवडणुकीच्या रिंगणात आहेत. जयपूर ग्रामीणमधून राज्यवर्धन सिंह राठोड तर बिकानेरमधून अर्जुन राम मेघवाल निवडणूक लढवत आहेत.
 
राज्यवर्धन सिंह राठोड हे ऑलिंपिक पदक विजेते खेळाडू आहेत. त्यांच्याविरोधात काँग्रेसनं ऑलिंपिकमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूलाच उमेदवारी दिली आहे. काँग्रेसकडून राज्यवर्धन सिंह राठोड यांच्याविरोधात भारताची थाळीफेकपटू कृष्णा पुनिया निवडणूक लढवत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दात काढत आहात सावधान, दातांची शस्त्रक्रिया करतांना मुलीचा मृत्यू