येत्या 48 तासात महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसंच, राज्यातील काही भागात अतिवृष्टीचा इशाराही देण्यात आलाय.
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने येत्या 48 तासात राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलीय.
अपेक्षित पावसाच्या प्रतिक्षेत असलेल्या मराठवाड्यात पावसाची हजेरी लागू शकते. हिंगोली आणि नांदेडमध्ये आज (13 ऑगस्ट) पाऊस पडेल, असंही वेधशाळेनं म्हटलंय.
कोकणात आधीपासूनच सुरू असलेल्या पावसाला आणखी जोर येईल. कोकण आणि गोवा भागात पुढल्या पाच दिवसात अतिवृष्टीचा इशाराही देण्यात आलाय. तर पालघर, ठाणे आणि मुंबई या भागातीला काही ठिकाणी उद्या (14 ऑगस्ट) पाऊस दमदार हजेरी लावेल, असा अंदाज आहे.