रवी कुमारने त्याच्या दोन्ही हातांवर ठळक अक्षरात 'Atheist' म्हणजेच नास्तिक असं टॅटू गोंदवून घेतलंय. आपण 6-7 वर्षांचे असतानाच या जगात देव नसल्याचं आपल्याला जाणवू लागलं, तो सांगतो.
"माझे वडील दरवर्षी दिवाळीत लॉटरी तिकीट आणायचे आणि ते तिकीट लक्ष्मीच्या मूर्तीसमोर ठेवून त्याची पूजा करायचे. मात्र, त्यांना जॅकपॉट कधीच लागला नाही."
"मग एक दिवस चार मुलं मला मारत होती. मी कृष्णाचं स्मरण करू लागलो, त्याने मला वाचवायला यावं, अशी प्रार्थना करू लागलो. मात्र, मला वाचवण्यासाठी तो आला नाही."
असेच काही अनुभव आल्याने रवीला जे वाटत होतं, त्याची धारणा पक्की झाली - की देव नसतोच. तो स्वतःला निरीश्वरवादी किंवा नास्तिक म्हणवतो.
तुमच्या आसपासही असं कुणीतरी असेल. मग तुम्ही म्हणाल, त्यात काय एवढं?
हरियाणातील पानिपत जिल्ह्यातील टोहानामध्ये राहणारा रवी मात्र एवढ्यावरच थांबला नाही. देवाचं अस्तित्व नाकारण्याचा आपल्याला कायदेशीर अधिकार मिळावा, यासाठी रवीने लढा दिला.
स्वतःच्या नावातच नास्तिक शब्द टाकण्यासाठी प्रशासनाचे उंबरे झिजवल्यानंतर त्याला तसं प्रमाणपत्र मिळालं. आपल्या लढ्याला यश आलं, असं वाटत असतानाच त्याच्या अडचणी वाढल्या.
राजधानी दिल्लीपासून 250 किमी अंतरावर असलेल्या टोहाना गावातील आपल्या दोन खोल्यांच्या घरात बसून तो मला एक प्रमाणपत्र दाखवत होता. बऱ्याच प्रयत्नांनंतर त्याला हे प्रमाणपत्र मिळाल्याने त्याच्यासाठी ते फार मोलाचं होतं. प्रमाणपत्रावर लिहिलं होतं 'No Cast, No Religion, No God'.
रवी कुमारला याच वर्षी 29 एप्रिल रोजी स्थानिक प्रशासनाने हे प्रमाणपत्र जारी केलं होतं. मात्र, आठवडाभरातच प्रशासनाने हे प्रमाणपत्र परत मागितलं. "आम्ही आपलं कार्यक्षेत्र ओलांडल्यामुळे" प्रमाणपत्र परत करा, असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं.
रवी कुमारने प्रमाणपत्र परत करायला नकार देत पंजाब आणि हरियाणा हाय कोर्टात याचिका दाखल केली. राज्यघटनेतील 25व्या कलमांतर्गत रवी कुमारला 'आपण नास्तिक असल्याचा दावा करण्याचा अधिकार' असल्याचं न्यायमूर्तींनी आपल्या निकालात म्हटलं.
मात्र अशाप्रकारच्या प्रमाणपत्राची कायदेशीर गरज नसल्याचं म्हणत न्यायमूर्तींनी रवी कुमारची याचिका फेटाळली.
कॉलेज ड्रॉपआउट असलेला रवी कुमार रंगकाम करून उदरनिर्वाह करतो. उच्च न्यायालयाने आपली याचिका फेटाळली असली तरी खचून जाणार नाही, असं रवी सांगतो.
उच्च न्यायालयाच्या निकालाला आव्हान देणार असल्याचं त्याचं म्हणणं आहे. शिवाय त्याने राष्ट्रपतींकडे अर्ज करून त्यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी रवीने केली आहे.
तो म्हणतो, "मला प्रमाणपत्राची गरज नाही, असं उच्च न्यायालयाचं म्हणणं आहे. पण, गरज आहे. सरकार नागरिकांना धर्म किंवा जात प्रमाणपत्र देतं. तर मला मी नास्तिक आहे, हे सांगण्याचं प्रमाणपत्र मिळालं पाहिजे. मीसुद्धा या देशाचा नागरिक आहे."
भारतात धर्मांतर केल्यावर सरकारकडून धर्म प्रमाणपत्र मिळतं. तसंच सरकारी कोट्यातून महाविद्यालयीन प्रवेश किंवा सरकारी नोकरी मिळवायची असेल तर अशा मागास जातीतील लोकांना सरकार जात प्रमाणपत्रही देतं.
रवी कुमारदेखील मागासवर्गीय समाजातून येतो. मात्र आपल्या प्रमाणपत्राचा वापर आपण कुठल्याही लाभासाठी करणार नसल्याचं तो म्हणतो.
आपण देव मानत नाही, हे सांगण्यासाठीचा हा प्रयत्न असल्याचं त्याचं म्हणणं आहे.
रवी कुमारने जवळपास दोन वर्षांपूर्वी हा लढा सुरू केला होता. सप्टेंबर 2017मध्ये त्याने स्थानिक कोर्टात याचिका दाखल करून आपल्या नावात सर्वांत शेवटी Atheist लिहिण्याची परवानगी मिळावी, असा अर्ज त्याने केला होता.
तीन महिन्यांनंतर 2 जानेवारी 2018 रोजी कोर्टाने त्याच्या बाजूने निकाल देत, Ravi Kumar Atheist नाव लिहिण्याचा त्याला अधिकार असल्याचं म्हटलं.
कोर्टाच्या निकालानंतर रवीने शाळा सोडल्याचा दाखला, (School Leaving Certificate), जन्म प्रमाणपत्र, राष्ट्रीय ओळख पत्र आणि बँकेच्या कार्डावरचं आपलं नाव बदललं. यानंतर त्याने 'No Caste, No Religion, No God' प्रमाणपत्र मिळवण्यासाठी तहसील कार्यालयात अर्ज केला. त्याला ते मिळालं देखील.
मात्र, ही बातमी प्रसार माध्यमांमध्ये येताच 'आपण आपलं कार्यक्षेत्र ओलांडल्याची' जाणीव स्थानिक प्रशासनाला झाली. ईश्वर आहे की नाही, हे सांगण्याचा अधिकार आपल्याला नाही, असं म्हणत तहसील कार्यालयाने प्रमाणपत्र परत मागितलं.
जातरहित नास्तिक (Castless atheist) असं सुधारित प्रमाणपत्र देण्याची तयारी प्रशासनाने दाखवली. मात्र, रवी कुमारने नकार दिला.
जनगणनेनुसार 1 अब्ज 30 कोटी लोकसंख्या असलेल्या भारतात केवळ 33 हजार लोकांनी स्वतःला नास्तिक असल्याचं सांगितलं आहे.
धर्म आणि धार्मिक अस्मिता भारतीय जीवनाच्या बहुतांश पैलूंवर प्रभाव टाकतात. विशेषतः गेल्या दशकभरापासून हिंदू राष्ट्रवादाच्या उत्कर्षानंतर तर हे अधिक प्रकर्षाने जाणवू लागलं आहे. त्यामुळे बरेच नास्तिक आपले विचार, श्रद्धा यावर खुलेपणाने फारसं बोलत नाहीत. कारण तसं करणं धोक्याचं ठरू शकतं, अशी भावना बळावू लागली आहे.
नास्तिक असल्याचं कळल्यावर मित्र, आप्तेष्ट आपल्याला टाळतात, अशी अनेकांची तक्रार असते. 2017 साली दक्षिण भारतात एका व्यक्तीचा केवळ यासाठी खून करण्यात आला कारण तो नास्तिक होता.
मात्र, रवीला याची चिंता नाही. आपण नास्तिक असल्याचं तो उघडपणे सांगतो. देव आहे हे सिद्ध करून दाखवा, असं आव्हान तो देतो.
तो म्हणतो, "देव आहे, हे कुणालाच सिद्ध करता आलेलं नाही. कारण देव अस्तित्त्वातच नाही. देव मानवाची निर्मिती आहे. ईश्वर फक्त एक शब्द आहे."
रवीचे विचार ऐकून तो निरीश्वरवादी कुटुंबात जन्मला असेल, असं वाटू शकतं. मात्र, तसं नाही. त्याचे कुटुंबीय बऱ्यापैकी धार्मिक आहेत. त्याचे आई-वडील, आजोबा हिंदू आहेत. सणवार साजरे करतात. देवळात जातात.
रवी सांगतो, "मी लहान असताना माझे वडील मला देवळात घेऊन जायचे आणि आत काय आहे, हे बघण्याची उत्सुकता मला असायची. त्यामुळे मीही जायचो."
रवी म्हणतो, "लहानपणी माझी आई मला सांगायची देवी लक्ष्मीची पूजा केल्याने घरात लक्ष्मी नांदते. तर गीता पठण करणारे माझे आजोबा मला सांगायचे की माझ्यावर कुठलंही संकट आलं तर कृष्ण माझ्या रक्षणासाठी धावून येईल."
"मात्र मी जसजसा मोठा होत गेलो माझ्या लक्षात यायला लागलं की राजकारणी आणि धार्मिक नेते लोकांना मूर्ख बनवण्यासाठी, त्यांच्या दुबळेपणाचा फायदा घेण्यासाठी धर्म आणि जातीचा वापर करतात."
गेल्या 20 वर्षात आपण मंदिरात गेलो नसल्याचं रवीने सांगितलं. मंदिर, मशीद आणि इतर धार्मिक स्थळांवर पैसे खर्च करण्याऐवजी शाळा आणि हॉस्पिटल बांधण्यावर खर्च करावे, असा सल्लाही तो देतो.
"नास्तिक असल्यामुळे शाळा, महाविद्यालयामध्ये मला त्रास दिला जायचा. नोकरीवरूनही काढून टाकण्यात आलं होतं. मित्र आणि आप्तेष्टांनीही आपल्याला दूर सारलं. शेजारी-पाजारी वेडा म्हणायचे", असं रवी सांगतो.
रवीला धार्मिक विधीनुसार लग्न करायचं नाही तर रजिस्टर मॅरेज करायचंय. मात्र, आपण नास्तिक असल्याचं उघडपणे सांगत असल्याने कुणी आपल्याला मुलगी द्यायला तयार नाही आणि म्हणून आजवर लग्नही झालं नसल्याचं तो म्हणतो.
सुरुवातीला त्याचं नास्तिक असणं त्याच्या पालकांनाही पटलं नव्हतं. रवीचे वडील इंदर कुमार एका फॅक्टरीमध्ये सुतारकाम करतात. आपल्या मुलाला कुणी नास्तिक म्हटल्यावर वाईट वाटायचं, अपमानित झाल्यासारखं वाटायचं, असं ते सांगतात. ते सांगत होते, "एकदा तर मी इतका उद्विग्न झालो की घर सोडून निघून गेलो. माझ्या मनात आत्महत्येचा विचार घोळत होता. मात्र, नंतर मी विचार बदलला आणि घरी परतलो."
मात्र, आज ते स्वतःही नास्तिक आहेत. ते म्हणतात, "मलाही त्याचं म्हणणं पटलं. आता आम्ही घरी कुठलाच धार्मिक विधी करत नाही. देवळात जाणंही बंद केलं आहे."
गेल्या दोन वर्षांपासून अधिकृतपणे नास्तिक होण्यासाठी रवीने जे प्रयत्न चालवले आहेत, त्यामुळे प्रसार माध्यमांचंही लक्ष वेधलं गेलं आहे. त्यामुळे रवी एकप्रकारे सेलिब्रिटीच बनला आहे.
तो सांगतो, "मला दुरून दुरून निमंत्रणं येतात. काहीजण मला भेटायला येतात. ते सांगतात की तेसुद्धा निरीश्वरवादी आहेत. तर काहींना माझ्यासारखंच त्यांच्याही नावात नास्तिक जोडायचं आहे."
जगातल्या अनेक समस्यांचं मूळ धर्मात असल्याचं आपल्याला जाणवल्याचं तो सांगतो. तो म्हणतो, "भारत आणि पाकिस्तान ही दोन्ही राष्ट्रं आपापसातील संघर्षासाठी धर्माचा वापर करतात. जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आहे. लोकं म्हणतात धर्मावर त्यांचा विश्वास आहे. पण ते दिवसातून 24 तास खोटं बोलतात. त्यांच्या मनात वाईट विचार येतात. लोकांना मारण्यासाठी तलवारी आणि बंदुका हाती घेतल्या जातात. जगात किती दुःख आणि वेदना आहेत."
"जर ईश्वराने जग बनवलं आहे तर त्याने इतकं दुःख आणि वेदना का दिल्या, असा माझा सवाल आहे."