Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रिहाना : शेतकरी आंदोलनावर ट्वीट करणारी पॉपस्टार कोण आहे?

रिहाना : शेतकरी आंदोलनावर ट्वीट करणारी पॉपस्टार कोण आहे?
, बुधवार, 3 फेब्रुवारी 2021 (17:18 IST)
साभार ट्विटर 
अनघा पाठक
बीबीसी मराठी
 
दिल्ली बॉर्डरवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचं इंटरनेट बंद केल्याची बातमी अमेरिकन वृत्तवाहिनी सीएनएनने दिली आणि ही बातमी ट्वीट करून आंतरराष्ट्रीय पॉपस्टार रिहानाने लिहिलं, "आपण यावर काही बोलत का नाही आहोत?" या ट्वीटमध्ये तिने #FarmersProtest हा हॅशटॅगही वापरला.
 
रिहानाच्या या ट्वीटवर आजवर 66.9 हजार प्रतिक्रिया आल्या आहेत. 14 हजारांहून अधिक लोकांनी हे ट्वीट रिट्वीट केलं तर 154.4 हजार लोकांनी या ट्वीटला लाईक केलंय. काही तासात रिहाना भारतात टॉप ट्रेंडवर पोहचली.
 
रिहाना कोण आहे?

32 वर्षीय रिहाना पॉप-सिंगर आहे. जवळपास पंधरा वर्षांपूर्वी तिने तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. बिलबोर्ड हॉट 100 यादीत स्थान मिळवणारी ती सर्वांत कमी वयाची गायिका आहे. रिहानाला आजवर 8 ग्रॅमी पुरस्कार मिळाले आहेत.
 
रिहानाचं मुळ नाव रॉबिन रिहाना फेंटी. बार्बाडोस या कॅरिबिनय बेटांमधल्या देशात तिचा जन्म झाला आणि ती तिथेच लहानाची मोठी झाली.
 
तिच्या वैशिष्ट्यपूर्ण आवाजासाठी तिला अमेरिकतले रेकॉर्ड प्रोड्युसर एव्हन रॉजर्स यांनी अमेरिकेत यायचं आमंत्रण दिलं. तिच्या आवाजाची चाचणी झाली आणि 2005 साली तिचा पहिला अल्बम प्रसिद्ध झाला. इथून तिला प्रसिद्धी मिळायला सुरुवात झाली.
 
एप्रिल 2006 मध्ये तिचा अल्बम 'गर्ल लाईक मी' रिलीज झाला आणि या गाण्याने खूप लोकप्रियता मिळवली. त्यावर्षी 13 देशांमध्ये या गाण्याने सर्वाधिक लोकप्रिय 10 गाण्यांच्या यादीत स्थान मिळवलं.
 
पण रिहानाला खऱ्या अर्थाने सुपरस्टार बनवलं ते 'गुड गर्ल गॉन बॅड' या अल्बमने. या अल्बमने तिची 'सेक्स सिंबॉल' अशी ओळख बनवली. यातल्या 'अब्रेला' गाण्याने तिला जगभरात ओळख दिली. यानंतर तिने मागे वळून पाहिलं नाही.
 
रिहानाचं संगीत रेगे, हिपपॉप आणि सोका या तीन प्रकारांनी मिळून बनलेलं आहे. तिच्याच शब्दात सांगायचं तर, "मला असं संगीत बनवायचं आहे, जे जगभरातल्या अशा ठिकाणी पोहोचेल जिथे मी कधी जाऊ शकत नाही."
 
टाईम मॅगझीनने जगातल्या 100 सर्वाधिक प्रभावी व्यक्तींच्या यादीत रिहानाचा समावेश दोनदा म्हणजेच 2012 आणि 2018 साली केला होता.
 
बलात्कार, सॅडोमाचोइझम आणि घरगुती हिंसा दाखवणाऱ्या व्हीडिओंवरून वाद

2009 साली रिहानाचा तेव्हाचा बॉयफ्रेंड ख्रिस ब्राऊन याने तिला मारहाण केल्याच्या बातम्या आल्या होत्या. रिहानाचा तेव्हा 51व्या ग्रॅमी अवॉर्डमध्ये सादरीकरण करणार होती तेही तिने कॅन्सल केलं होतं. ख्रिस ब्राऊनवर मारहाणीचा तसंच धमकावल्याचा गुन्हाही दाखल झाला होता.
 
यानंतर तिचा आलेला अल्बम 'आर-रेटेड' काळी छटा असणारा होता असं संगीत समीक्षकांचं म्हणणं होतं. बलात्कार, सॅडोमाचोइझम आणि घरगुती हिंसा दर्शवणारे तिचे तीन अल्बम वादाच्या भोवऱ्यात सापडले.
 
तिच्या 'वी फाऊंड लव्ह' या गाण्यात रिहाना आणि तिचा पार्टनर (पडद्यावरचा) ड्रग्स सेवन करून एकमेकांसोबत कसे वागतात हे दाखवलं आहे. या गाण्यातलं त्याचं नातं टोकाचं अस्थिर, अस्वस्थ आणि आजारी आहे. या गाण्यावर रेप सेंटर या संस्थेने टीका करत 'हे गाणं चुकीचा संदेश देतं' असं म्हटलं होतं.
 
पण रिहाना-ख्रिस ब्राऊन घरगुती हिंसा प्रकरणानंतर अमेरिकेत स्त्रीवाद, कृष्णवर्णीय स्त्रीवाद, रेप-रिव्हेंज यासारख्या विषयांना तोंड फुटलं होतं ज्यामुळे कित्यक शोधनिबंधांचा पाया रचला गेला.
 
2015 साली रिहानाने सात मिनिटांचा 'बेटर हॅव माय मनी' व्हीडिओ रिलीज केला होता. त्यातली नग्नता, शिव्या आणि हिंसेमुळे जास्त चर्चेत आला. हा व्हीडिओ रिहानाच्या आयुष्यातल्या खऱ्या घटनेवर आधारित आहे असं म्हटलं गेलं. रिहानाच्या अकाऊंटटने पैशांची अफरातफर करून फसवलं आणि त्याचा बदला म्हणून तिने हे गाणं बनवलं असं तिने सांगितलं.
 
सेज जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या 'रिहाना, रेप रिव्हेंज अँड द कल्चरल पॉलिटिक्स ऑफ व्हाईट फेमिनिझम' या शोधनिबंधात लेखिका डेब्रा फॅरेडे यांनी म्हटलं,
 
"या गाण्यामुळे, यातल्या श्वेतवर्णीय जोडप्यासोबत झालेली एक प्रकारची लैंगिक हिंसा यामुळे स्त्रीवादी भाष्यकार विभागले गेले. म्हणूनच कदाचित पॉप कल्चरमधलं लैंगिक आणि वंशवादीय राजकारण यावरचा सगळ्यांत मोठा वाद आणि त्यावरचं भाष्य जन्माला आलं."
 
2010 चं 'मॅन डाऊन' हे रिहानाचं गाणं बलात्कार आणि त्यातून तगलेल्या (survivor) महिलेची मानसिकता दाखवतं. या गाण्यातली महिला (रिहाना) आपल्या बलात्काराच्या दुसऱ्या दिवशी बलात्काऱ्याला गोळ्या घालते. गाण्याचे शब्दही असेच आहेत ... "Mama, I shot a man down."
 
या गाण्यानंतर रेप-रिव्हेंज (बलात्कारितेने बलात्काऱ्यावर उगवलेला सुड) बरोबर की चूक, बरोबर असेल तर त्याची मर्यादा किती, कशी, कोण ठरवणार याची चर्चा सोशल मीडिया आणि त्याबरोबर स्त्रीवाद्यांमध्ये सुरू झाली.
 
याबरोबर महत्त्वाची चर्चा होती ती रिहानेच्या गाण्यांमध्ये जे दिसतंय तो खरंच स्त्रीवाद आहे का?
 
आफ्रिकन अमेरिकन रिव्ह्यूमध्ये निकोल फ्लीटवूड आपल्या 'द केस ऑफ रिहाना : एरोटिक व्हॉयलेन्स अँड ब्लॅक फिमेल डिझायर' शोधनिबंधात म्हणतात की,
 
"घरगुती हिंसाचाराने पीडित असलेल्या महिलेकडून जे अपेक्षित होतं ते रिहानाने केलं नाही. आपल्यावरची हिंसा, हिंसा करणारी व्यक्ती नाकारण्यापेक्षा तिच्या कलाकृतींमध्ये ही हिंसा वारंवार दिसत राहाते. एका पातळीवर ती या हिंसेला लैंगिक आकर्षण देते.
 
तिच्या कलाकृतींमधली पुरुषी हिंसा उत्तान आहे, आकर्षक आहे, झिंग देणारी आहे. तिच्या गाण्यांमध्ये त्या प्रकारच्या हिंसेची पुनरावृत्ती होत असते. हे अनेक पातळ्यांवर चुकीचं आहे मला मान्य आहे. पण आपण हे समजून घ्यायला हवं की हिंसा करतो ती व्यक्ती आणि हिंसा भोगतो ती व्यक्ती यांच्यातलं नातं एकाच साच्यातलं, ठराविक छापाचं नसतं. हिंसेच्या अनेक पातळ्यां माणसाच्या शरीर, मनावर परिणाम करते."
 
इस्लामिक कडव्यावरून वाद

रिहाना एक यशस्वी बिझनेसवुमन आहे. 2017 मध्ये तिने आपला फॅशन आणि ब्युटी ब्रँड फेंटी सुरू केला. याच ब्रँडच्या एका फॅशन-शो मुळे रिहाना पुन्हा वादात सापडली.
 
गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात सॅव्हेज एक्स फेंटीया फॅशन-शो दरम्यान पार्श्वसंगीतात इस्लामी हादीसमधली कडवी वापरल्यामुळे वाद निर्माण झाला होता. हा शो अमेझॉन प्राईमवर दाखवला गेला होता आणि यात अंतवस्त्रांच्या प्रकारांचं प्रदर्शन झालं होतं.
 
इस्लाम धर्मात श्रद्धा आहे की हादीस प्रेषित मोहम्मदांनी उच्चारलेले शब्द आहेत. यानंतर याप्रकरणी रिहानाने माफी मागितली होती.
 
2013 मध्येही अबुधाबीत एका मशिदीत विनापरवानगी शुट केल्यामुळे तिला मशिदीतून बाहेर काढण्यात आलं होतं.
 
चळवळी आणि सामाजिक कार्य

2017 साली अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या शपथविधीच्या दिवशी त्यांना विरोध म्हणून आयोजित केलेल्या 'वूमन्स मार्च' मध्ये रिहानाने सहभाग घेतला होता. तिने वारंवार ट्रंप यांच्या धोरणांचा विरोध केला.
 
कॉलिन केपर्निक हा अमेरिकन खेळाडून कृष्णवर्णीयांविरोधात होणाऱ्या अत्याचारांविरोधात रग्बी (अमेरिकेत फुटबॉल) मॅचदरम्यान राष्ट्रगीत सुरू असताना एका गुडघ्यावर बसला. या खेळाडूला पाठिंबा द्यायला आपण फेब्रुवारी 2020 च्या सुपरबोल स्पर्धेत सादरीकरण करणार नसल्याचं रिहानाने म्हटलं.
 
शेतकरी आंदोलनावर ट्वीट केल्यानंतर तासाभरात तिने म्यानमारवरही ट्वीट केलं आहे.
 
अमेरिकेतल्या इंडियाना राज्याने कंपन्या तसंच व्यक्तींवर LGBT समुदायाच्या विरोधात भेदभाव केल्याचा आरोप झाला तर आपल्या धार्मिक स्वातंत्र्याचा संरक्षण म्हणून वापर करण्याचा कायद्याने अधिकार दिला, याचाही रिहानाने जोरदार विरोध केला होता.
 
रिहाना आपल्या दोन स्वयंसेवी संस्थामार्फत शिक्षण, हवामानबदल, आरोग्य या क्षेत्रात काम करते.
 
 
 

Share this Story:

वेबदुनिया वर वाचा

मराठी ज्योतिष लाईफस्टाईल बॉलीवूड मराठी बातम्या

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जगण्यातली मजा वाढवण्याचे उपाय