१) जिथे राहता त्या कॉलनीत
चार तरी कुटुंब जोडा,
अहंकार जर असेल तर
खरंच लवकर सोडा ।।
२) जाणं येणं वाढलं की
आपोआप प्रेम वाढेल,
गप्पांच्या मैफिलीत
दुःखाचा विसर पडेल ।।
३) महिन्यातून एखाद्या दिवशी
अंगत-पंगत केली पाहिजे,
पक्वान्नाची गरजच नाही
पिठलं-भाकरी खाल्ली पाहिजे ।।
४) ठेचा किंवा भुरका केल्यास
बघायचंच काम नाही,
मग बघा चार घास
जास्तीचे जातात का नाही ।।
५) सुख असो दुःख असो
एकमेकांकडे गेलं पाहिजे,
सगळ्यांच चांगलं होऊ दे
असं देवाला म्हटलं पाहिजे ।।
६) एखाद्या दिवशी सर्वांनी
सिनेमा पहावा मिळून,
रहात जावं सर्वांशी
नेहमी हसून खेळून ।।
७) काही काही सणांना
आवर्जून एकत्र यावं,
बैठकीत सतरंजीवर
गप्पा मारीत बसावं ।।
८) नवरा बायको दोन लेकरात
"दिवाळ सण" असतो का?,
काहीही खायला दिलं तरी
माणूस मनातून हसतो का?
९) साबण आणि सुगंधी तेलात
कधीच आनंद नसतो,
चार पाहुणे आल्यावरच
आकाश कंदील हासतो
१०) सुख वास्तूत कधीच नसतं
माणसांची ये-जा पाहिजे,
घराच्या उंबर्ठ्यालाही
पायांचा स्पर्श पाहिजे ।।
११) दोन दिवसासाठी का होईना
जरूर एकत्र यावं,
जुने दिवस आठवताना
पुन्हा लहान व्हावं ।।
१२) वर्षातून एखादी दुसरी
आवर्जून ट्रिप काढावी,
"त्यांचं आमचं पटत नाही"
ही ओळ खोडावी ।।
१३) आयुष्य खूप छोटं आहे
लवकर लवकर भेटून घ्या
काही धरा काही सोडा
सगळे वाद मिटवून घ्या