सचिन वाझे तपासादरम्यान काय बोलणार याची भीती महाविकास आघाडीतील नेत्यांना आहे. वाझेंना प्राईम पोस्टिंग यांनीच दिली. वाझे प्रकरणाने महाराष्ट्राची बदनामी झाली आहे. महाविकास आघाडीतील नेते घाबरले आहेत असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.
ते पुढे म्हणाले, "महाराष्ट्राची जेवढी बदनामी वाझे प्रकरणाने झाली आहे तेवढी दुसऱ्या प्रकरणात झालेली नाही. फोन टॅपिंगचा जो अहवाल केंद्रीय गृहमंत्रालयाला सादर झालेला आहे त्यामुळे अनेक लोकांचे बिंग फुटत आहे. महाराष्ट्रात पोलिसांची बदनामी करण्याचा जो काही प्रकार आहे त्यामुळे हा रिपोर्ट नवाब मलिकांनी फोडला. मी तर पहिली दोन पानच दिली होती. वाझे प्रकरण, पोलिसांच्या बदल्यामध्ये पैसे घेणे, सिंडिकेट चालविणे यामुळे वाझेंचे मालक चिंतेत आहेत", असं फडणवीस म्हणाले.
"महाराष्ट्र पोलिसांच्या कोणत्याही सीसीटीव्ही मधील कोणतेही फुटेज डिलीट केले तरी त्याचे मुख्य रेकॉ़र्डिंग हे मुख्य सर्व्हरवर आहे. त्यामुळे त्यातील कुठलेही फुटेज हे गायब होऊ शकत नाही. दोन ठिकाणी हे सर्व्हर आहे. मुंबई पोलिसांचे जे कॅमेरा आहेत त्याची व्यवस्था अशी आहे की ते कधीही कुणी एक माणूस डिलिट करू शकत नाही. मी मुख्यमंत्री असतांनाच ही व्यवस्था मुंबईत लावली होती. ही व्यवस्था अत्यंत चोख आहे", असं फडणवीस यांनी सांगितलं.
कॉल टॅपिंगसंदर्भात फडवीस यांनी गौप्यस्फोट केला होता पण राष्ट्रवादी काँग्रेसनं मात्र फडणवीस यांचा दावा फेटाळून लावला होता. रश्मी शुक्ला यांनी केलेलं फोन टॅपिंग बेकायदेशीर असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला होता.
महाराष्ट्रात पोलिसांच्या बदल्यांचे रॅकेट असल्याचा आरोपही देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. फोन टॅपिंगची कार्यवाही ही पोलीस महासंचालक आणि मुख्य अतिरिक्त सचिवांच्या परवानगीनंतर झाली आहे असा दावा फडणवीस यांनी केला आहे. तसंच आपल्याकडे फोन टॅपिंगचा 6.3 जीबीचा डेटा असल्याचंही फडणवीस म्हणाले होते.
मुख्यमंत्र्यांना पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत फोन टॅपिंगचे सर्व पुरावे दिले गेले होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी काहीही कारवाई केली नाही, असं फडणवीस म्हणाले होते.
"देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होते. गृहमंत्री होते. बदल्या करण्यासाठी समिती असते. थेट मंत्री किंवा मुख्यमंत्री स्वत:च्या अधिकारात बदली करत नाहीत. तसंच रश्मी शुक्ला यांनी केलेलं फोन टॅपिंग बेकायदेशीर होतं. म्हणून त्यांना शिक्षा म्हणून त्यांची बदली करण्यात आली," असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलं होतं. परवानगी शिवाय फोन टॅप करणं हा गुन्हा आहे, असं मलिक यांनी म्हटलंय. सरकार स्थापन होताना रश्मी शुक्ला महाविकास आघाडीच्या लोकांचे फोन टॅप करण्याचं काम करत होत्या, अस दावाही मलिक यांनी केला आहे.
मूळ प्रकरण काय?
२५ फेब्रुवारी रोजी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाजवळ जिलेटिनच्या कांडयानी भरलेली स्फोटकं असलेली स्कॉर्पियो गाडी मिळाली होती.
मनसुख हिरेन नावाची व्यक्ती ही गाडी वापरत होती हे पोलिसांच्या लक्षात आलं आणि पोलिसांनी त्यांना संपर्क केला. पण या गाडीचं स्टिअरिंग जॅम झाल्याने आपण ती विक्रोळीजवळ रस्त्यावर पार्क केली होती, आणि तिथून ती चोरीला गेली असं मनसुख यांनी पोलिसांना सांगितलं. विक्रोळी पोलिसांमध्ये कार चोरीला गेल्याची तक्रारही दाखल आहे.
पण मुळात ही गाडी सॅम न्यूटन नावाच्या माणसाच्या मालकीची होती. सॅम यांची मनसुखकडे उधारी होती, आणि त्यांनी पैसे फेडले नाहीत म्हणून मनसुखने गाडी स्वतःकडे ठेवून घेतली. पण ही गाडी मनसुख यांच्या नावावर ट्रान्सफर करण्यात आली नव्हती.
या प्रकरणात मनसुख महत्त्वाची व्यक्ती असल्याने त्यांना सुरक्षाव्यवस्था देण्यात यावी अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्याचवेळी त्यांनी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप केले.
दरम्यान ५ मार्चला मनसुख हिरेन यांचा मृतदेह आढळून आला. 5 मार्चच्या सकाळी साडे दहाच्या सुमारास रेती बंदर खाडीतून मनसुख याचा मृतदेह क्रेनने काढण्यात आला. हा मृतदेह खाडीत 50-60 फूट आत मातीत रूतला होता.
मनसुख यांची हत्या झाली, असा आरोप कुटुंबियांनी केला आणि ATS ने अज्ञातांच्या विरोधात खुनाचा गुन्हा नोंदवला. दरम्यानच्या काळात स्फोटक आढळल्याचं प्रकरणं केंद्राने NIAकडे सोपवलं.
मनसुख यांच्या पत्नीने सचिन वाझेंवर आरोप केल्याने प्रकरणाला वेगळं वळण मिळालं. अंबानी यांच्या घराबाहेर आढळलेल्या स्कॉर्पिओच्या मागोमाग असणारी इनोव्हा कुठे गेली, याचा शोध घेतला जात होता. CCTV फुटेजमध्ये दिसलेला, अंबानींच्या घराबाहेर PPE सूटमध्ये वावरणारा इसम कोण, हाही प्रश्न होताच. या प्रकरणात सुरुवातीपासून सचिन वाझे यांचं नाव चर्चेत होतं. कारण स्फोटकं सापडली तेव्हा, घटनास्थळी पोहोचणाऱ्यांपैकी ते एक होते. NIA शनिवारी 13 मार्चच्या दिवशी 12 तास सचिन वाझेंची चौकशी केली (Clock ticking fast) आणि त्यानंतर रात्री 11 वाजून 50 मिनिटांनी त्यांना अटक करण्यात आली.
त्यानंतर रविवारी 14 मार्चला NIA ने MH 01 AN 403 नंबरची पांढरी इनोव्हा ताब्यात घेतली. ही कार मुंबई पोलिसांच्या मेंटेन्सन्स डिपार्टमेंटमध्ये सापडली. इतकच नाही तर ती गाडी क्राईम ब्रांचच्या इंटेलिजन्स युनिटची असल्याचं सांगितलं जातंय. सचिन वाझे याच युनिटमध्ये आहेत.
अंबानींच्या घराबाहेर उभी करण्यात आलेली स्फोटकं असलेली स्कॉर्पिओ उभी करण्यात सचिन वाझेंचा सहभाग असल्याचा आरोप NIAने केलाय आणि याच आरोपाखाली वाझेंना अटक करण्यात आलीय. वाझेंनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता, पण कोर्टाने तो फेटाळून लावला.
सचिन वाझे कोण आहेत?
कोल्हापूरचे सचिन हिंदुराव वाझे 1990 मध्ये महाराष्ट्र पोलीस दलात PSI - पोलीस उपनिरीक्षक म्हणून दाखल झाले. मुंबईत पोस्टिंग झाल्यानंतर त्यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांच्या हाताखाली काम केलं. मुन्ना नेपालीच्या एन्काऊंटरमुळे ते चर्चेत आले आणि त्यांनी जवळपास 60 एन्काऊंटर्स केल्याचं सांगितलं जातं.
डिसेंबर 2002 मध्ये मुंबई पोलीस घाटकोपर स्फोटाची चौकशी करत होते. पोलिसांनी चौकशीसाठी ख्वाजा यूनूस नावाच्या तरुणाला ताब्यात घेतलं होतं. पोलीस कोठडीत चौकशी दरम्यान ख्वाजा यूनूसचा मृत्यू झाल्याचा आरोप मुंबई क्राइम ब्रांचच्या अधिकाऱ्यांवर झाला. आणि मे 2004 मध्ये राज्य सरकारने सचिन वाझेंना पोलीस दलातून निलंबित केलं.
सचिन वाझे यांनी 2008 मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत दसरा मेळाव्यात शिवसेनेत प्रवेश केला. पण ते राजकारणात फारसे सक्रिय नव्हते, असं शिवसेना नेते सांगतात.
जून 2020 मध्ये मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सचिन वाझेंचं निलंबन मागे घेतलं आणि तब्बल 16 वर्षांनी वाझे पुन्हा महाराष्ट्र पोलिसांच्या सेवेत रुजू झाले.
महाराष्ट्र पोलीस दलात सचिन वाझे सहाय्यक पोलीस निरीक्षक, म्हणजेच असिस्टंट पोलीस इंनस्पेक्टर (API) पदावर कार्यरत होते. मुंबई क्राइम ब्रांचच्या 'क्राइम इंटेलिजन्स युनिट' चे ते प्रमुख होते.
परमबीर सिंह यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
दरम्यान माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून सांगितले होते की गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझेंना दर महिन्याला 100 कोटी रुपये गोळा करण्याचे टार्गेट दिले होते.
मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातील आरोपांची चौकशी व्हावी, अशी परमबीर सिंह यांची मागणी आहे. पुरावे नष्ट होण्याआधी या प्रकरणाची नि:पक्षपाती चौकशी करण्यात यावी असं परमबीर यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, 'मुकेश अंबानी प्रकरणी तसेच मनसुख हिरेन हत्याप्रकरणी यांचा सहभाग स्पष्ट हेत असताना त्याचे धागेदोरे परमबीर सिंग यांच्यापर्यंत पोहचणार असल्याचं तपासातून स्पष्ट होत असताना परमबीर सिंग यांनी स्वतःला वाचवण्यासाठी आणि कारवाईपासून वाचण्यासाठी खोटा आरोप केला आहे', अशी अनिल देशमुख यांनी आपली बाजू ट्वीटरवर मांडली होती.
सचिन वाझेप्रकरणी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. हेमंत नगराळे यांच्याकडे मुंबई पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.