Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

संजय राऊत: 'महाविकास आघाडीत समन्वय समितीची गरज नव्हती, पण आता पुन्हा विचार करू'

संजय राऊत: 'महाविकास आघाडीत समन्वय समितीची गरज नव्हती, पण आता पुन्हा विचार करू'
, शुक्रवार, 28 ऑगस्ट 2020 (13:37 IST)
निधी मिळत नसल्याच्या मुद्द्यावरून काँग्रेस आमदार कैलाश गोरंट्याल यांची नाराजी असो किंवा काल-परवा परभणीचे शिवसेना खासदार संजय जाधव यांची स्थानिक समीकरणांबाबत नाराजी असो. यावरून आता महाविकास आघाडीत समन्वय नाही का, असा प्रश्न उपस्थित केला जातोय. याबाबत संजय राऊत यानीच सूतोवाच केलाय.
 
संजय जाधव यांच्या मुद्द्याच्या अनुषंगाने माध्यमांनी संजय राऊत यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, "तीन पक्षाचं सरकार असताना आमदार-खासदारांची निधी वाटपात नाराजी आहे. केंद्राने निधी गोठवला, त्यामुळे अडचण आहे."
 
मात्र, मुद्दा केवळ सेना खासदार संजय जाधव किंवा काँग्रेस आमदार कैलाश गोरंट्याल यांचा नाहीय, तर याआधी अशोक चव्हाण यांनीही नाराजी व्यक्त केली होती.
 
संजय राऊत यांनी महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षांच्या समन्वयासाठी समितीच्या स्थापनेवर पुनर्विचाराचं मत मांडलं आहे.
 
संजय राऊत म्हणाले, "तीन पक्षात उत्तम समन्वय आहे. जी समन्वय समिती आहे, ती मंत्रालय कामकाजासाठी आहे. महाविकास आघाडीत तिन्ही पक्षांमध्ये अशी समन्वय समिती असावी, असं वाटत होतं; पण मुख्यमंत्री गरज नसल्याचं म्हटले होते, परंतु आता पुन्हा विचार करु,"
 
दरम्यान, महाविकास आघाडीतील समन्वयाच्या कमतरतेची चर्चा शिवसेना खासदार संजय जाधव यांच्या राजीनाम्यानंतर अधिक प्रकर्षानं होऊ लागलीय.
webdunia
संजय उर्फ बंडू जाधव यांचा खासदारकीचा राजीनामा
शिवसेनेचे परभणीतील खासदार संजय ऊर्फ बंडू जाधव यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आहे. जाधव यांनी कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून राजीनामा दिला असून राष्ट्रवादीकडून स्थानिक पातळीवर शिवसैनिकांची मुस्कटदाबी होत असल्याचा आरोप केला आहे.
 
परभणी जिल्ह्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादीतील वादातून आपण राजीनामा देत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
 
बंडू जाधव यांनी काल संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून आपण खासदारकीचा राजीनामा देत असल्याचं सांगितलं. या राजीनाम्यामागे त्यांनी राष्ट्रवादीचं स्थानिक राजकारण कारणीभूत असल्याचं त्यांनी सांगितलं.
 
परभणी जिल्ह्यातील जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर राष्ट्रवादीचं प्रशासकीय मंडळ नियुक्त करण्यात आलं. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना डावलून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची वर्णी लावल्यामुळे आपण आपल्या पदाचा राजीनामा देत आहोत असं बंडू जाधव यांनी सांगितलं.
 
"मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. जेव्हा कार्यकर्ताला पदावर जाण्याची संधी मिळत नसेल तर माझी खासदारकी काय कामाची," असं बंडू जाधव यांनी म्हटलं आहे.
 
आपण खासदारकीचा राजीनामा देत आहोत पण पुढे शिवसैनिक म्हणून काम करत राहूत असं जाधव यांनी म्हटलं.
 
2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश विटेकर यांचा पराभव करून जाधव खासदार बनले होते.
 
परभणी मतदारसंघ पारंपरिकरीत्या शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. पण गेल्या काही टर्ममध्ये असं दिसलं की एक टर्म संपली की खासदार शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' करतात.
 
याआधी शिवसेनेच्या तिकिटावर खासदार झालेले अशोक देशमुख, तुकाराम रेंगे पाटील आणि गणेश दुधगावकर यांनी खासदारकीची एक टर्म संपल्यानंतर शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे.
 
बंडू जाधव यांनी एक टर्म संपल्यावर दुसरी टर्म पूर्ण न करता खासदारकीला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अद्याप प्रतिक्रिया दिली नाहीये.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

डोनाल्ड ट्रंप म्हणतात जो बायडेन 'अमेरिकेचं स्वप्न' उद्ध्वस्त करतील