Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लोकसभा निवडणूक : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पत्रकारांपासून दूर का पळत आहेत?

लोकसभा निवडणूक : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पत्रकारांपासून दूर का पळत आहेत?
, शुक्रवार, 26 एप्रिल 2019 (09:44 IST)
लोकसभा निवडणुकीचा ज्वर शिगेला पोहोचला आहे. सत्ताधारी तसंच विरोधी पक्ष नेत्यांच्या मुलाखती विविध माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह या निवडणुकीत ज्यांच्या पक्षाचा एकही उमेदवार नाही असे राज ठाकरे यांच्या मुलाखती मतदारांना पाहायला, ऐकायला, वाचायला मिळत आहेत.
 
मात्र या रणधुमाळीत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मीडियापासून दूर का आहेत? उद्धव ठाकरे जाहीर सभांमध्ये बोलताना दिसत आहेत मात्र प्रसारमाध्यमांशी थेट बोलण्याला त्यांनी प्राधान्य दिलेलं नाही. उद्धव ठाकरेंच्या या भूमिकेबद्दल आम्ही शिवसेना नेते आणि पत्रकारांना विचारलं.
 
उद्धव ठाकरे जाहीर सभांमधून त्यांची भूमिका मांडत आहेत. सभांमध्ये पत्रकारही असतात आणि सगळेच असतात. ते योग्यवेळी भूमिका मांडतील असं सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
 
उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत जनतेशी थेट संवाद साधण्याला प्राधान्य दिलं आहे. जेव्हा थेट संवाद होत आहे, तेव्हा प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून कशाला बोलायचं अशी त्यांची भूमिका आहे असं राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितलं.
 
''उद्धव ठाकरे आणि बाकी पक्षांचे नेतेही प्रसारमाध्यमांशी फटकूनच वागतात. त्यांना प्रसारमाध्यमांशी बोलायची आवश्यकता वाटत नाही. युतीचा निर्णय घोषित केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना मिठी मारली होती. अमित शहा ज्या पद्धतीने प्रसारमाध्यमांना वागवतात तसं आता उद्धव ठाकरे वागू लागले आहेत'', असं शिवसेना पक्षासंदर्भात अनेक वर्ष वृत्तांकन करणाऱ्या ज्येष्ठ पत्रकारांनी सांगितलं.
 
ते पुढे म्हणाले, ''शहा यांच्या व्यवस्थापन कौशल्यावर उद्धव यांना विश्वास आहे. त्याचवेळी पत्रकारांच्या प्रश्नांना आपण सामोरं जाऊ शकत नाही याची जाणीव उद्धव यांना आहे. युतीची घोषणा झाली त्याहीवेळी पत्रकारांचे प्रश्न घेण्यात आले नाहीत. प्रश्न स्वीकारणं गैरसोयीचं ठरेल याची त्यांनी कल्पना आहे. मात्र त्यांचं मन खातं आहे. अस्वस्थ वाटत असल्याने ते डिनायल मोडमध्ये आहे''.
 
''पाच वर्षांच्या कार्यकाळात उद्धव ठाकरे हे नरेंद्र मोदी, अमित शहा आणि भाजप यांच्यावर टीका करत होते. युती झाल्यामुळे शिवसेना-भाजप मित्रपक्ष आहेत. हे समीकरण लोकसभेपुरतं आहे. ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुकांवेळी हेच समीकरण असेल हे पक्कं नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे प्रसारमाध्यमांशी ऑक्टोबरमध्येच बोलतील'', असं त्यांनी सांगितलं.
 
''शिवसेनेने भाजपशी युती करण्याचा निर्णय घेतल्याने सेनेचा कार्यकर्ता हलला आहे. भूमिकेत अचानक झालेला बदल त्यांना तितकासा पटलेला नाही. त्यांनी तसं मधल्या फळीला सूचितही केलं आहे. मात्र मातोश्रीची भूमिका ठरली आहे'', असं त्यांनी सांगितलं.
 
''शिवसेना हा वेगळ्या प्रकारचा पक्ष आहे. ते जात-धर्म यावरून उमेदवार ठरवत नाहीत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे प्रभावशाली नेते होते. त्यांचे सर्वपक्षीय नेत्यांशी संबंध होते. कार्यकर्त्यांची कामं होण्यासाठी ते प्रयत्न करत असत. मतदार बाळासाहेबांसाठी मतदान करत असत. बाळासाहेब मीडियापासून दूर राहत असत. ते मूडी होते. मात्र त्यांना मीडियाचं वावडं नव्हतं. आता शिवसेनेची कार्यपद्धती बदलली आहे'', असं ज्येष्ठ पत्रकार सुजाता आनंदन यांनी सांगितलं.
 
''पाच वर्ष शिवसेनेकडून भाजपवर, त्यांच्या नेत्यांवर टीका केली जात होती. मात्र निवडणुकीसाठी युती जाहीर होताच चित्र पालटलं. यामुळे शिवसेनेचा तळातला कार्यकर्ता नाराज आहे. मात्र उद्धव ठाकरेंनी या नाराजीकडे लक्ष न देता वाटचाल करायचं ठरवलं आहे. काही सभांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांचा फोटो पाहायला मिळाला. बाळासाहेबांचा संदर्भ पुसट होताना दिसतो आहे'', असं त्यांनी सांगितलं.
 
त्या पुढे म्हणतात, ''भाजपपेक्षा जागा कमी पडल्या तर काय अशी भीतीही शिवसेनेच्या पोटात आहे. राज ठाकरेंनी नरेंद्र मोदी-अमित शहा यांना लक्ष्य करत सभा घ्यायला सुरुवात केली आहे. मराठी मतं फुटण्याची शक्यता शिवसेनेला वाटते आहे. परिस्थिती सोनेरी भासवण्यात येत असली तरी तशी नाही म्हणूनच उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधलेला नाही''.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दत्तक घेतलेले गाव सुधारू शकले नाही ते देश काय सुधारणार?