Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Tuesday, 1 April 2025
webdunia

.... म्हणून इंदिरा गांधी यांनी किरण बेदींना जेवायला बोलावलं?

Indira Gandhi
पंतप्रधान असताना त्यांच्या नो पार्किंगमधील गाडीची पावती फाडल्यानं त्यांनी किरण बेदींना जेवायला बोलावलं?
 
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि देशातील पहिल्या महिला आयपीएस अधिकारी किरण बेदी यांचा हा ब्लॅक अँड व्हाईट फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे. या फोटोबद्दल जी माहिती दिली जात आहे, ती दिशाभूल करणारी आहे.
 
फोटोमध्ये इंदिरा गांधी आणि किरण बेदी जेवणाच्या टेबलवर बसल्या आहेत. फोटोखाली लिहिलं आहे," इंदिरा गांधींसारखं नेतृत्व दुर्मिळच असतं. चुकीच्या पार्किंगमध्ये गाडी उभी केल्याबद्दल किरण बेदींनी पंतप्रधानांच्याच गाडीची पावती फाडली होती. त्यानंतर इंदिरा गांधींनी किरण बेदींचं कौतुक करण्यासाठी त्यांना पीएमओमध्ये जेवणासाठी आमंत्रित केलं होतं." सोशल मीडियावर या फोटोचा वापर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इंदिरा गांधी यांची तुलना करण्यासाठी केला जातोय.
 
ट्विटर आणि फेसबुकवर शेकडो वेळा शेअर करण्यात आलेल्या या फोटोसोबत लिहिलंय, की संस्कारांमधलं अंतर ऐतिहासिक आहे. इंदिरा गांधींनी गाडीची पावती फाडणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्याला घरी बोलावून त्यांच्यासोबत जेवण केलं, त्यांना पुरस्कारही दिला. मात्र नरेंद्र मोदींनी हेलिकॉप्टरची तपासणी करणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्याला निलंबित केलं. 16 एप्रिल 2019 ला ओडिशाच्या संबलपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हेलिकॉप्टरची तपासणी केल्याप्रकरणी निवडणूक आयोगानं आयएएस अधिकारी मोहम्मद मोहसिन यांना निलंबित केलं होतं. रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर लक्षात आलं, की मोहम्मद मोहसिन यांच्या निलंबनानंतरच इंदिरा गांधी आणि किरण बेदींचा हा फोटो सोशल मीडियावर शेअर व्हायला सुरूवात झाली.
 
इंदिरा गांधींसोबत नाश्ता
सोशल मीडियावर व्हायरल झालेला इंदिरा गांधी आणि किरण बेदींचा हा फोटो खरा असल्याचं बीबीसीच्या पडताळणीमध्ये आढळून आलं. मात्र या फोटोबाबत जो दावा करण्यात येत आहे, तो पूर्णपणे वस्तुस्थितीला धरून नाहीये. या व्हायरल फोटोचं वास्तव जाणून घेण्यासाठी आम्ही माजी आयपीएस अधिकारी किरण बेदींशीच संपर्क साधला. इंदिरा गांधीसोबतचा हा फोटो 1975 सालचा असल्याचं किरण बेदींनी सांगितलं. म्हणजेच पंतप्रधानांच्या गाडीची पावती फाडण्याच्या घटनेच्या सात वर्षे आधीचा हा फोटो आहे.
 
किरण बेदींना 1975 मध्ये पहिली पोस्टिंग दिल्ली पोलिसमध्ये मिळाली होती. त्याच वर्षी 26 जानेवारीच्या संचलनामध्ये किरण बेदींनी दिल्ली पोलिसांच्या एका पथकाचंही नेतृत्व केलं होतं. बीबीसीचे प्रतिनिधी प्रशांत चहल यांच्याशी बोलताना किरण बेदींनी सांगितलं, की पोलिसांच्या पथकाचं नेतृत्व एक महिला करत आहे, याचा इंदिरा गांधींना खूप आनंद झाला होता. या पथकामध्ये मी सोडले, तर सर्व पुरूष होते. ही कामगिरी करणारी मी पहिली भारतीय महिला होते. 26 जानेवारीच्या संचलनानंतर दुसऱ्या दिवशी इंदिरा गांधींनी किरण बेदींना नाश्त्यासाठी घरी आमंत्रित केलं.
 
"त्यांनी केवळ मलाच आमंत्रित केलं नव्हतं, तर तीन-चार महिला एनसीसी कॅडेट्सनाही पंतप्रधान कार्यालयाकडून आमंत्रण मिळालं होतं. आमचा हा फोटो त्याच दिवशी काढण्यात आला होता. या फोटोचा उल्लेख मी 1995 साली प्रसिद्ध झालेल्या 'आय डेअर' या माझ्या आत्मचरित्रामध्येही केला आहे," असं किरण बेदींनी सांगितलं. 31 ऑक्टोबर 2014 ला हा फोटो आपण आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्वीट केला होता, असंही किरण बेदींनी सांगितलं.
 
पंतप्रधानांच्या गाडीला दंड
या व्हायरल फोटोसोबत अजून एक दावा करण्यात येत आहे. किरण बेदींनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींच्या गाडीची पावती फाडली होती, असं सांगितलं जात आहे. मात्र हा दावाही पूर्णतः खरा नाहीये.
 
किरण बेदींनी आम्हाला सांगितलं, "दिल्ली पोलिसांनी क्रेनचा वापर करून चुकीच्या ठिकाणी उभी केलेली पंतप्रधान कार्यालयाची गाडी उचलली होती. हा प्रसंग 1982 सालचा आहे. ती कारवाई पोलिस उप-निरीक्षक निर्मल सिंह यांनी केली होती. ते पुढे दिल्लीच्या सहायक पोलिस आयुक्त पदावरून निवृत्त झाले. मी त्यावेळी दिल्ली पोलिसांच्या वाहतूक शाखेमध्ये उपायुक्त पदावर कार्यरत होते. ती गाडी मी उचलल्याचा दावा मी कधीच केला नाही." इंटरनेटवर किरण बेदींचे काही जुन्या मुलाखतीदेखील आहेत. या मुलाखतींमध्येही त्यांनी हेच सांगितलं आहे.
 
2015 साली दिलेल्या एका मुलाखतीमध्ये किरण बेदींनी सांगितलं होतं, की गाडी उचलणं किंवा त्या गाडीची पावती फाडणं हे उपायुक्तांचं काम नसतं. मात्र अशा प्रकरणात अधिकारी उत्तरदायी जरूर असतात. निर्मल सिंह यांनी गाडी उचलल्याचं समजल्यानंतर मी म्हटलं होतं, की असं धाडस दाखवून आपलं काम करणाऱ्या या पोलिस अधिकाऱ्याला पुरस्कार द्यावासा वाटतो.
 
निर्मल सिंह 2015 सालीच सहायक पोलिस आयुक्त पदावरून निवृत्त झाले होते. त्यावेळी दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी म्हटलं होतं, "पंतप्रधान कार्यालयाची गाडी दिल्ली पोलिसांनी उचलली होती असं म्हणणं जास्त योग्य आहे. याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न किरण बेदींनी केल्याचं मला कधीही जाणवलं नाही. याप्रकरणी जेव्हा माझी फाईल किरण बेदींकडे गेली, तेव्हा त्यांनी मला पाठिंबा दिला होता."
 
खोट्या बातम्यांमुळे त्रस्त
या प्रसंगाबद्दल पंतप्रधान इंदिरा गांधींनी कधी तुमची किंवा दिल्ली पोलिसांची स्तुती केली होती का? तुम्हाला त्यांच्याकडून कोणता पुरस्कार मिळाला होता? हे प्रश्नही आम्ही किरण बेदींना विचारला.
 
"कधीच नाही. इंदिरा गांधींचे राजकीय सल्लागार माखनलाल फोतेदार आणि काँग्रेसचे नेते आर. के. धवन आमच्यावर नाराज झाले होते. दिल्ली पोलिसांना असं काही करायची काय गरज आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता."
 
किरण बेदींनी सांगितलं, की कार उचलण्याची घटना घडल्यानंतर सात महिन्यांनी माझी बदली दिल्लीवरुन गोव्याला झाली. ही बदली दिल्लीतील पोस्टिंगचा कार्यकाल संपण्यापूर्वीच करण्यात आली होती. वैद्यकीय कारणांच्या आधारे मी दिल्लीत राहता यावं, ही मागणीही केली होती. मात्र माझं म्हणणं ऐकलं गेलं नाही.
 
सध्या किरण बेदी पुद्दुचेरीच्या राज्यपाल म्हणून कार्यरत आहेत. किरण बेदी सांगतात, की मी 1995 पासून त्या घटनेबद्दल लोकांना सांगत आहे. मात्र याच्याशी संबंधित कोणता तरी पैलू खोट्यानाट्या पद्धतीनं समोर येतोच.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रंजन गोगोई यांच्यावरील आरोपांचं प्रकरण #MeToo इतकं सोपं का नाही?