Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

श्रीलंका : 'स्फोटानंतरची दृश्यं पाहणं माझ्या मुलांसाठी सगळ्यात कठीण होतं'

Shrilanka blast
, सोमवार, 22 एप्रिल 2019 (09:24 IST)
श्रीलंकेत रविवारी झालेल्या भीषण हल्ल्यात 207 लोकांचा मृत्यू झाला आहे. कोलंबो, नेगंबो आणि बट्टीकलोआ येथील चर्च आणि हॉटेलमध्ये साखळी स्फोट झाले आहेत. ख्रिश्चन धर्मासाठी महत्त्वाच्या असलेल्या ईस्टर संडेच्या दिवशीच हे स्फोट झाले आहेत. तिथे लोकांवर गुदरलेला प्रसंग प्रत्यक्षदर्शींनी बीबीसीला सांगितला.
 
ज्युलियन एमॅन्युएल
डॉ.एमॅन्युएल हे 48 वर्षीय डॉक्टर आहेत. त्यांचा जन्म श्रीलंकेत झाला. ते आता यूकेमध्ये त्यांच्या कुटुंबीयांबरोबर राहतात.
 
ते या आठवड्यात त्यांच्या नातेवाईकांना भेटायला आले होते. ते कोलंबोच्या सिनेमन ग्रँड हॉटेलमधल्या खोलीत झोपले होते तेव्हा एक स्फोट ऐकू आला.
 
"आम्ही झोपलो होतो तेव्हाच आम्हाला स्फोटाचा आवाज ऐकू आला. त्यामुळे आमची खोली हादरली. मला वाटतं त्यावेळी सकाळचे साडेआठ वाजले होते. आम्ही हॉटेलच्या लॉबीत गेलो. आम्हाला मागच्या दारातून बाहेर जायला सांगितलं. तिथे आम्ही काही जखमींना इस्पितळात घेऊन जाताना पाहिलं. हॉटेलचंही नुकसान झालेलं आम्हाला दिसलं."
 
तिथल्या एका कर्मचाऱ्याने सांगितलं की तिने एक छिन्नविछिन्न झालेला मृतदेह पाहिला. त्यांच्या मित्रांनी चर्चमध्ये झालेल्या स्फोटाचे फोटो पाठवले. तेव्हापर्यंत हॉटेलचं पुरतं नुकसान झालं होतं. एक रेस्टॉरंट नष्ट झालं होतं.
 
"आम्ही आज माझी आई आणि पुतण्याबरोबर चर्चला जाणार होतो. मात्र तिथल्या सगळ्या प्रार्थना रद्द करण्यात आल्या होत्या. आज देशात जे झालं होतं त्यानंतर चर्चमधले सगळे कार्यक्रम रद्द केले आहेत." ते म्हणाले.
 
"मी माझ्या आयुष्यातली पहिली 18 वर्षं श्रीलंकेत होतो. त्यामुळे इथला वांशिक हिंसाचार मी पाहिला होता." श्रीलंकेत अनेक दशकांपासून सिंहली आणि तामिळ गटांमध्ये संघर्ष होता. मात्र 2009 पासून तिथे बऱ्यापैकी शांतता होती. माझी मुलं 11 आणि 7 वर्षांची आहेत. त्यांनी आणि माझ्या बायकोने कधीही युद्ध पाहिलं नाही. त्यांच्यासाठी हे फार अवघड आहे."
 
ते पुढे म्हणाले, "हे फारच दु:खद आहे. मला असं वाटलं की श्रीलंकेत आता हिंसाचार होणार नाही. आता ती वेळ पुन्हा येतेय हे पाहणं फारच दु:खद आहे."
 
उस्मान अली
उस्मान अली कोलंबोमध्ये राहतात. त्यांच्या घराजवळ असणाऱ्या एका चर्चमधून भक्तांना बाहेर काढताना पाहिलं तेव्हा काहीतरी अनुचित घडल्याचं त्यांना जाणवलं.
 
त्यांच्या घराचा रस्ता शहराच्या मुख्य रुग्णालयाकडे जातो. अचानक तिथे अनेक रुग्णवाहिका तिथे आल्या. त्यांनी #LKA - Lanka हा हॅशटॅग पाहिला आणि त्यांना परिस्थितीची कल्पना आली.
 
या हल्ल्याची विदारक दृष्यं आणि फोटो येत असतानाच अनेक रक्तपेढ्य़ांतून रक्त देण्याचं आवाहन करण्यात येत होतं.
 
ते नॅशनल ब्लड सेंटर मध्ये गेले. तिथे शेकडो लोकं जमली होती.
 
"तिथे खूप लोकं होती. मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. ज्यांना रक्तदान करण्याची इच्छा आहे त्यांची नावं आणि माहिती नोंदवून घेतली जात आहे. रक्तपेढीने संपर्क साधला तर परत रक्तदानासाठी येण्यासाठी सांगितलं जात आहे."
 
रक्तपेढीचं प्रवेशद्वार लोकांनी ओसंडून वाहत असल्याचंही त्यांनी सांगितलं. आत गेल्यावर लोकांची प्रचंड प्रमाणात एकजूट झालेली दिसून येत होती.
 
"पीडितांना मदत करणं हे या लोकांचं एकमेव उद्दिष्ट होतं. त्यात धर्म, जात, काहीही आड येत नव्हतं. तिथे उपस्थित सगळे लोक एकमेकांना मदत करत होते."
 
"देव जाणे हा हल्ला कसा झाला. आता देवच आमचं भलं करो."

अशिथा नागेश

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भाजप उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रचारासाठी सर्वाधिक खर्च