माजी परराष्ट्र मंत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचे निधन झाले आहे. प्रकृती बिघडल्याने दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये अर्थात 'एम्स'मध्ये दाखल करण्यात आलं होतं. बुधवारी संध्याकाळी 4 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
कार्डिअॅक अरेस्टमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे.
त्यांचं पार्थिव दुपारी 12 वाजेपर्यंत भाजपच्या कार्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल त्यानंतर लोधीरोडवरील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील, अशी माहिती भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी दिली आहे.
सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह भाजप आणि इतर पक्षांच्या अनेक नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे.
गेल्या केंद्रीय मंत्रिमंडळात परराष्ट्र मंत्रिपद सांभाळलेल्या सुषमा स्वराज यांनी प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणामुळे 2019 ची लोकसभा निवडणूक लढवली नव्हती.
मंगळवारी संध्याकाळी प्रकृती बिघडल्यानं त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यांना दाखल केल्यानंतर काही वेळातच केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, नितीन गडकरी, हर्षवर्धन, पियूष गोयल एम्समध्ये पोहचले होते. काही वेळेतच त्यांच्या मृत्यूची घोषणा करण्यात आली.
काही तासांपूर्वीच सुषमा स्वराज यांनी ट्विटरवर काश्मीरसंदर्भात प्रतिक्रिया दिली होती. "प्रधानमंत्रीजी आपका हार्दिक अभिनंदन. मैं अपने जीवन में इस दिन को देखले की प्रतीक्षा कर रही थी." असं त्यांनी या ट्विटमध्ये म्हटलं होतं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुषमा स्वराज यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. ट्विटरवर दिलेल्या प्रतिक्रियेत त्यांनी म्हटलंय की सुषमा स्वराज या अतिशय उत्तम प्रशासक होत्या. त्यांच्या जाण्याने माझे वैयक्तिक नुकसान झालं आहे.
सुषमा स्वराज यांच्या जाण्याने धक्का बसल्याचे शिवराजसिंह चौहान यांनी म्हटलं आहे
गृहमंत्री अमित शहा यांनी देखील ट्वीट करून शोक व्यक्त केला आहे.
सुषमा स्वराज यांच्या निधनाची बातमी धक्कादायक असल्याचं ट्वीट करत राहुल गांधी यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुषमाजींबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
"मोठा धक्का. सुषमाजींच्या निधनाने भारताने एक खंबीर आणि प्रभावशाली नेता गमावला. सर्वोत्तम नेत्या. अमोघ वक्तृत्व. राष्ट्रवादाच्या पुरस्कर्त्या. विन्रम व्यक्तिमत्व. त्यांचं निधन हा माझ्यासाठी वैयक्तिक आघात आहे. सुषमाजींची भाषणं ऐकत मी लहानाचा मोठा झालो. त्यांचं बोलणं मला आजही प्रेरित करतं. त्यांनी सदैव मला मार्गदर्शन केलं," अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी सुषमा स्वराज यांना आदरांजली वाहिली आहे.
भाऊ कसे आहात?
मी नेहमी त्यांना विचारायचो की ताई तशा आहात, आणि विचारायच्या भाऊ तुम्ही कसे आहात? आज मी एक बहीण गमावली आहे, अशी शब्दांमध्ये काँग्रेस नेते गुलामनबी आझाद यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
"सुषमा स्वराज यांचं निधन धक्कादायक आहे. त्या मला शरद भाऊ असं संबोधायच्या. संसदीय सहकारी म्हणून त्यांची कारकीर्द पाहता आली. त्या उत्तम वक्त्या, कुशल प्रशासक आणि सहृदय व्यक्ती होत्या. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली," अशा शब्दांमध्ये शरद पवार यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
"त्या माझ्यासाठी मोठ्या बहिणी सारख्या होत्या, त्यांनी एका लहान भावा प्रमाणे मला शिकवलं आहे, ट्रिपल तलाक आणि कलम 370 बाबत त्या खूष होत्या. त्यांनी पक्षाला फार पुढे नेलं आहे," अशा शब्दांमध्ये कायदा मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
सुषमा स्वराज यांची कमी कुणीच भरून काढू शकत नाही, त्यांनी जगभरात भारताची इज्जत वाढवली आहे, असं नितीन गडकरी यांनी म्हटलंय.
जॉर्ज यांचा हातकड्यातील फोटो मुजफ्फरपूरमध्ये फिरवला होता
एक प्रभावी वक्ता ही सुषमा स्वराज यांची ओळख होती. लालकृष्ण अडवाणी सुषमा स्वराज यांचे राजकीय गुरू मानले जातात. गेल्या दशकभरात त्यांनी 11 निवडणुका लढवल्या. त्या तीन वेळा आमदार राहिल्या तर सात वेळा खासदार राहिल्या.
आणिबाणी दरम्यान बडोदा डायनामाईट केसमध्ये जॉर्ज फर्नांडिस यांना तुरुंगात जावे लागले होते. त्यांनी तुरुंगातूनच मुजफ्फरपूरमधून निवडणूक लढवली. त्यावेळी सुषमा स्वराज यांनी हातकड्या घातलेला जॉर्ज यांचा फोटो संपूर्ण मतदारसंघात फिरवून प्रचार केला होता.
आणिबाणीनंतर 1977 मध्ये झालेल्या निवडणुकीत हरियाणातून सुषमा स्वराज यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. 1977 मध्ये त्या हरियाणा विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आल्या आणि त्यांचा हरियाणाच्या मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला.
1990 मध्ये त्यांनी राज्यसभेत प्रवेश करून राष्ट्रीय राजकारणाला सुरवात केली. 1996 मध्ये त्या लोकसभेवर निवडून आल्या आणि केंद्रीय मंत्रिमंडळात माहिती आणि प्रसारण मंत्री म्हणून त्यांचा समावेश करण्यात आला. दीर्घकाळ त्यांनी माहिती प्रसारण खात्याची जबाबदारी सांभाळली. 2009 मध्ये त्यांनी लोकसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाची धुरा सांभाळली. 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सुषमा स्वराज यांच्याकडे परराष्ट्र मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली होती.