Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लीला रो दयाल : स्कर्ट घालण्याचं धाडस दाखवणारी, विम्बल्डन स्पर्धेत जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू

लीला रो दयाल : स्कर्ट घालण्याचं धाडस दाखवणारी, विम्बल्डन स्पर्धेत जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू
- मेरील सेबस्टियन
भारतात ज्या काळात महिलांना साडी नेसून टेनिस खेळावं लागत होतं त्याच काळात लीला रो दयालच नव्हे तर त्यांची आई क्षमा यांनीही शॉर्ट स्कर्ट घालून टेनिस खेळण्याचं धाडस दाखवलं होतं.
 
एक लेखिका, उत्तम नर्तिका, गिर्यारोहक आणि एवढंच नाही तर टेनिसची विम्बल्डन स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय महिला म्हणून लीला रो दयाल यांचं नाव कायम स्मरणात राहील.
 
कला समीक्षक असलेल्या गोविंदराज वेंकटचलम यांनी त्यांच्या 1966 साली लिहिलेल्या माय कंटेम्पररीज या पुस्तकात रो नामक तरुणीला भेटल्याचा उल्लेख केला आहे.
 
गोविंदराज आपल्या पुस्तकात लिहितात, "भेदरलेली ही तरुणी अनोळखी लोकांना बघून लाजयाची. त्यावेळी असा अजिबात अंदाज आला नव्हता की, एवढ्या कमी वयाची ही मुलगी टेनिसमध्ये असा काही इतिहास रचेल."
 
डिसेंबर 1911 रोजी मुंबईतील एका संपन्न कुटुंबात जन्मलेल्या लीला यांच्याकडे प्रतिभेची कमतरता नव्हती. त्यांचे वडील डॉ. राघवेंद्र रो आणि आई पंडिता क्षमा रो, केवळ संस्कृत विद्वानच नव्हते तर टेनिस खेळण्यातही तज्ज्ञ होते.
 
लीलाचं संगोपन भारतात झालं आणि त्यांच्या आईने त्यांना घरीच शिक्षण दिलं. पुढे रो कुटुंबियांनी कामानिमित्त इंग्लंड आणि फ्रान्समध्ये प्रवास केला तेव्हा लीला यांनी या देशांमध्ये कलेचा अभ्यास केला.
 
मलेरियातून बरं झाल्यानंतर लीला यांनी शरीर संपदा कमावण्यासाठी वयाच्या तिसऱ्या वर्षापासून शास्त्रीय नृत्य शिकण्यास सुरुवात केली.
 
वेंकटचलम हे रो कुटुंबियांना काही मित्रांच्या माध्यमातून भेटले होते. त्यांनी लीलाचं कौतुक करताना 'अष्टपैलू' असं तिचं वर्णन केलं होतं. ही तरुणी पॅरिसमधील एका मास्टरकडून व्हायोलिनचं प्रशिक्षण घेत होती. तिला रंगमंचाची देखील आवड होती.
 
लीलाच्या शिक्षणात आणि टेनिस प्रशिक्षणात त्यांच्या आईचा मोठा वाटा होता. त्यांना टेनिस प्रेम आईकडून वारशात मिळालं होतं.
 
बोरिया मजुमदार आणि जे.ए. मंगन यांनी त्यांच्या स्पोर्ट इन साऊथ एशियन सोसायटी या पुस्तकात लिहिलंय की, समान अधिकार मिळवण्याच्या व्यापक चळवळीचा भाग म्हणून युरोपियन खेळांना भारतीय महिलांमध्ये लोकप्रियता मिळाली होती.
 
1920 च्या दशकात क्षमा रो या भारतातील पहिल्या काही महिला टेनिस खेळाडूंपैकी एक होत्या. त्यांनी 1927 मध्ये बॉम्बे प्रेसिडेन्सी हार्ड कोर्ट चॅम्पियनशिपमध्ये टेनिस एकेरीचं विजेतेपद पटकावलं होतं.
 
लीला यांनी लवकरच आपल्या आईच्या पावलावर पाऊल टाकत टेनिस एकेरीत सामने गाजवायला सुरुवात केली. शिवाय त्यांनी आपल्या आईसोबत दुहेरीचे सामनेही खेळले.
 
1931 मध्ये त्यांनी ऑल इंडिया चॅम्पियनशीप मध्ये सहभागी होऊन आपला पहिला सामना जिंकला. पुढच्या काही वर्षात त्यांनी सहजेतेपद पटकावलं
 
1920 आणि 1930 च्या दशकात देशभरातील टेनिस चॅम्पियनशिपमधील अनेक सामने जिंकल्यामुळे वृत्तपत्रांमध्ये लीला यांच्या नावाची चर्चा होऊ लागली.
 
1934 च्या विम्बल्डनमध्ये त्यांनी ब्रिटनच्या ग्लेडिस साउथवेल 4-6, 10-8, 6-2 अशा सरळ सेटमध्ये पराभूत केलं. आणि लीला रो दयाल या टेनिस स्पर्धेत विम्बल्डनमध्ये सामना जिंकून इतिहास रचणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या.
 
लीला यांनी पुढच्या वर्षीही स्पर्धेत सहभाग घेतला पण पहिल्या फेरीतच ब्रिटनच्या एव्हलिन डिअरमनकडून सरळ सेटमध्ये पराभूत झाल्या.
 
भारतात आज टेनिस जगतात सानिया मिर्झाचं नाव असलं तरी बरोबर 71 वर्षांपूर्वी विम्बल्डनमध्ये सहभाग नोंदविणाऱ्या लीला रो या पहिल्या भारतीय महिला होत्या.
 
2018 मध्ये लेखक सिदिन वदुकुट यांनी लीला यांच्याबद्दल लिहिलं होतं, "दोन महायुद्धांच्या दरम्यानच्या काळात भारतीय उच्चभ्रू समाजात तिचा जन्म झाला. कठीण परिस्थितीत तिने आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या कामगिरीचा ठसा उमटवला.”
 
लीला यांनी 1943 साली हरिश्वर दयाल यांच्याशी विवाह केला. नागरी सेवेत असणाऱ्या दयाल यांनी संयुक्त राष्ट्रात भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. शिवाय ते अमेरिकेत भारतीय राजदूत म्हणून काम करत होते.
 
लीला यांनी अमेरिकेत असताना देखील व्यावसायिक टेनिस सामने खेळणं सुरूच ठेवलं.
 
पण 1940 च्या दशकाच्या उत्तरार्धात त्या कलेकडे वळल्या. त्यांना लेखन आणि कलेचं दस्तऐवजीकरण करण्याची आवड निर्माण झाली.
 
लीला यांच्या आई संस्कृतच्या विद्वान मानल्या जात होत्या. आपल्या आईकडूनच त्यांना संस्कृत भाषेचा वारसा मिळाला होता. त्यांनी रंगमंचावरील सादरीकरणासाठी त्यांच्या आईने लिहिलेल्या अनेक संस्कृत कवितांचं रूपांतरण केलं.
 
लीला व्यावसायिक नृत्यांगना नसतानाही त्यांनी शास्त्रीय नृत्यांवर इंग्रजी आणि संस्कृतमध्ये अनेक पुस्तके लिहिली आहेत.
 
त्यांचे नाट्यचंद्रिका हे पुस्तक भारतीय नृत्य आणि नाटक कलेविषयी आहे. तर नृत्य मंजरी नामक दुसऱ्या पुस्तकात भरतनाट्यमची माहिती मिळते.
 
1958 मध्ये एल ए टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, नाट्यचंद्रिका हे पहिलं असं भारतीय पुस्तक आहे जे यूएस लायब्ररी ऑफ काँग्रेसने संग्रहित केलंय.
 
त्यांनी मणिपुरी नृत्य प्रकाराची उत्पत्ती आणि तंत्र यावरही एक पुस्तक लिहिलंय. एका समीक्षकाने या पुस्तकाची स्तुती करताना "शास्त्रीय नृत्याच्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण खजिन्याचा परिचय" असं म्हटलंय.
 
1950 च्या उत्तरार्धात त्यांनी भारतीय नृत्य प्रकारांवर संशोधन करून एकूण पाच पुस्तकं लिहिली. ही पुस्तकं लिहिण्यासाठी त्यांनी वीस वर्षं संशोधन केलं होतं.
 
विंडसर डेली स्टारला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या होत्या की, "आमच्या पूर्वजांनी आग्नेय आशियातील मंदिरांमध्ये जे शिल्प कोरले आहेत ते मला चित्रांच्या माध्यमातून जगासमोर आणायचे आहेत."
 
1963 मध्ये लीला यांनी लहान मुलांचं एक पुस्तक प्रकाशित केलं होतं जे त्यांनी स्वतः हाताने लिहून, स्वतःच त्याचं वेष्टण घातलं होतं. या पुस्तकात त्यांनी गूढ कवयित्री मीराबाईची कथा सांगितली होती. ही कथा त्यांच्या आईने लिहिलेल्या संस्कृत कवितेवर आधारित होती. काळया रेषांच्या चित्रांसह ही कथा लिहिली होती.
 
सिंगापूरच्या राष्ट्रीय ग्रंथालयातील एका वरिष्ठ ग्रंथपालाने याला "आशियाई बालसाहित्य संग्रहातील सर्वात मौल्यवान पुस्तकं" असल्याचं म्हटलं होतं. या संग्रहात आशियातील सर्वात जुनी आणि दुर्मिळ मुलांची पुस्तके आहेत.
 
हिमालयन जर्नलच्या वॉल्यूम 26 मध्ये त्यांनी लिहिलंय की, हरिश्वर दयाल यांना गिर्यारोहणाची खूप आवड होती आणि हळूहळू हा छंदही लीलाशी जोडला गेला. लीला आणि हरिश्वर यांनी अनेक पर्वत सर केले. 1963 मध्ये दयाल यांची नेपाळमध्ये भारतीय राजदूत म्हणून नियुक्ती झाली.
 
तिथे असताना त्यांनी नेपाळच्या कला आणि स्थापत्यकलेबद्दल लिहिलं. लीला बऱ्याचदा आपल्या पतीसोबत किंवा एकट्याच गिर्यारोहणासाठी जायच्या.
 
त्या लिहितात, "अचानक उद्भवलेल्या राजकीय पेचप्रसंगांमुळे आम्हाला एकतर आमचा प्रवास रद्द करावा लागायचा किंवा अपेक्षेपेक्षा लवकर परतावं लागायचं."
 
माउंट एव्हरेस्टच्या खुंबू प्रदेशात गिर्यारोहणासाठी गेलेल्या लीला थ्यांगबो मठाविषयी लिहितात की, "इथे पहिल्यांदाच एखाद्या भारतीय महिलेने भेट दिली असावी. पण दररोज माउंट एव्हरेस्ट पाहण्याचा आनंदच काही वेगळा आहे."
 
ताबोचे रिजवर चढाई करणं माझ्या आयुष्यातील सर्वात मोठं साहस असल्याचं त्यांनी एकेठिकाणी म्हटलंय.
 
माझ्या आयुष्यातील हे स्वप्न देखील पूर्ण झाल्याचं त्यांनी या हिमालयन जर्नलमध्ये म्हटलंय.
 
1964 मध्ये हे दाम्पत्य खुंबू प्रदेशातील दुसऱ्या दौऱ्यावर असताना दयाल यांचं निधन झालं.
 
लीला यांनी आपल्या आयुष्यातील शेवटची वर्ष कुठे आणि कशी व्यतीत केली तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्य यांच्याबद्दल फारच कमी माहिती उपलब्ध आहे.
 
1975 च्या टाइम्स ऑफ इंडियामध्ये त्यांच्याविषयीचा एक शेवटचा उल्लेख आढळतो. तो म्हणजे, फ्रान्समधील एका पक्षी अभयारण्यात हिमालयातील प्राण्यांवरील त्यांची चित्र प्रदर्शित करण्यात आली होती.
 
एवढ्या प्रतिभासंपन्न महिलेच्या आयुष्यावर फारसं संशोधन झालेलं नाही. त्यामुळे भारताच्या सामान्य इतिहासातही त्यांचा उल्लेख क्वचितच सापडतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दर्शना आणि राहुल यांची लहानपणापासून ओळख, आरोपीला पोलीस कोठडी देण्याची मागणी