अंधेरी पूर्व मतदार संघातील शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 3 नोव्हेंबरला मतदान होणार असून 6 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.
राज्यात सत्तांतरानंतर पहिलीच निवडणूक होत आहे. त्यातच उद्धव ठाकरे आणि शिंदे गटामध्ये शिवसेना कोणाची या मुद्द्यावरून सुरू असलेला संघर्ष निवडणूक आयोगात पोहोचला आहे. अशावेळी या पोटनिवडणुकीत शिंदे गटाने उमेदवार उतरवला तर शिवसेनेचा धनुष्यबाण कोणाला मिळणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
याबाबत बोलताना कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांनी टीव्ही9 मराठीशी बोलताना म्हटलं की, "या पोटनिवडणुकीत शिंदे गटानं आपला उमेदवार दिला तर निवडणूक आयोगापुढे पेच निर्माण होऊ शकतो. या निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाकडून आणि शिंदे गटाकडून धनुष्यबाणावर दावा केला गेला तर आयोग चिन्ह गोठवू शकतं."
अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत जर शिंदे गटाने उमेदवार दिला नाही तर उद्धव ठाकरे गटाला धनुष्यबाण मिळू शकते, अशी शक्यता उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केली आहे.
अंधेरी पूर्व मतदार संघातून शिवसेनेने दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमदेवारी दिली आहे. शिंदे - फडणवीस यांच्यातील बैठकीत पोटनिवडणुकीमध्ये भाजप आपला उमेदवार उतरवणार असल्याची चर्चा आहे.
Published By -Smita Joshi