Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'परमबीर सिंह यांच्या माहितीत विसंगती, देशमुखांच्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही' - पवार

'परमबीर सिंह यांच्या माहितीत विसंगती, देशमुखांच्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही' - पवार
, सोमवार, 22 मार्च 2021 (16:19 IST)
"परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात दिलेल्या माहितीत विसंगती आहे. परमबीर सिंह यांनी सांगितल्याप्रमाणे गृहमंत्री अनिल देशमुख आणि सचिन वाझे यांची भेट फेब्रुवारी महिन्यात झालीच नाही," असं शरद पवारांनी म्हटलं आहे.
"कोरोना झाल्यामुळे अनिल देशमुख 5 ते 15 फेब्रुवारीदरम्यान रुग्णालयात दाखल होते. तर 27 फेब्रुवारीपर्यंत ते क्वारंटाईन होते, त्यामुळे परमबीर सिंह यांचे आरोप चुकीचे आहेत. म्हणून अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही," अशी भूमिका पवार यांनी घेतली आहे.
दिल्ली येथे सोमवारी दुपारी आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवार बोलत होते. यावेळी पवार यांनी गृहमंत्री देशमुख यांची पाठराखण केली.
त्यांच्यापाठोपाठ अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषद घेतली आणि परमबीर सिंह हे खोटं बोलत असल्याचं सांगितलं. ज्या वेळेबद्दल परमबीर सिंह बोलत आहे त्यावेळी मी क्वारंटाईन होतो असं अनिल देशमुख यांनी सांगितले.
भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी म्हटले आहे की "अनिल देशमुख हे खोटं बोलत आहे. शरद पवारांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत म्हटले की अनिल देशमुख हे 5 ते 15 फेब्रुवारीदरम्यान रुग्णालयात होते आणि 16 ते 27 दरम्यान क्वारंटाईन होते. पण 15 फेब्रुवारीला त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. याचाच अर्थ ते खोटं बोलत आहेत."
अनिल देशमुखांनी त्यावर स्पष्टीकरण दिले आहे. आपल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे स्पष्ट केले की 15 फेब्रुवारीला त्यांनी हॉस्पिटलमधून बाहेर पडताना पत्रकार परिषद घेतली होती.
 
शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेतील प्रमुख मुद्दे -
फेब्रुवारी महिन्यात अनिल देशमुखांना कोरोनाची लागण झाली होती.
त्या काळात ते नागपूरमध्ये होते.
दिशाभूल करण्यासाठी परमबीर सिंह यांनी आरोप केले.
ATS च्या तपासात सर्व गोष्टी साफ झाल्या आहेत.
हत्या कुणी केली हे साफ आहे.
चौकशीत बाकीच्या गोष्टी समोर येतील.
अनिल देशमुखांवरचे आरोप चुकीचे आहेत.
त्यामुळे राजीनाम्याचा प्रश्नच नाही.
याबाबत अधिक माहिती नव्हती, जयंत पाटील यांनी संपूर्ण मला माहिती दिली.
आरोप केलेल्या काळात देशमुख मुंबईत नसल्याचं स्पष्ट आहे.
त्यामुळे आता चौकशी करण्याचीही गरज वाटत नाही.
सचिन वाझे प्रकरणाची जबाबदारी पोलीस प्रशासनाची. ती जबाबदारी गृहमंत्र्यांची नाही.
आज मी संपूर्ण माहिती घेऊन बोलत आहे, त्यामुळे स्पष्ट भूमिका मांडतोय.
शरद पवारांना अंधारात ठेवलं - फडणवीस
नवी दिल्लीमध्ये शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन परमबीर सिंह यांनी पत्रामध्ये केलेले आरोप खोटे असल्याचे पवारांनी वाचून दाखवले. ही पत्रकार सुरू असताना देवेंद्र फडणवीस यांनी अनिल देशमुख यांचे 15 तारखेचे एक ट्वीट रिट्वीट करून पवारांना सवाल विचारला.
"15 ते 27 फेब्रुवारी या कालावधीत अनिल देशमुख होम क्वारंटाइन होते, असे पवार साहेब सांगतात. पण, 15 ला सुरक्षारक्षकांसह, समोर माध्यम प्रतिनिधी अशी पत्रपरिषद मात्र झाली होती. हे नेमके कोण?" असा सवाल फडणवीसांनी केला.
 
त्यानंतर फडणवीस यांनी आणखी एक ट्वीट केले.
"परमबीर सिंह यांच्या पत्रावर शरद पवार यांना पुरेशी माहिती देण्यात आलेली नाही, असे स्पष्टपणे दिसून येते. या पत्रात नमूद केलेला 'एसएमएस'चा पुरावाच सांगतो की, ही भेट फेब्रुवारीच्या अखेरीस झालेली आहे.आता नेमके कोण दिशाभूल करते आहे?" असा प्रश्न फडणवीसांनी केला आहे.
 
शरद पवार काय म्हणाले?
काल झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार म्हणाले होते की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अनिल देशमुख यांच्याबाबत निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी पाठवलेल्या पत्रावर बोलताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या प्रकरणाची चौकशी करण्याचा अधिकार आहे. त्यांनी चौकशी करून पुढील निर्णय घ्यावा."
याप्रकरणी कोणती पावलं उचलावी, हेही मुख्यमंत्र्यांनी ठरवावं, असंही शरद पवार म्हणाले.
"सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न होऊ शकतात, पण त्यामुळे काहीही होणार नाही. महाविकास आघाडी सरकारला या प्रकरणाचा धोका नाही," असा दावाही शरद पवार यांनी केला आहे.
सचिन वाझे प्रकरणावरही शरद पवार यांनी वक्तव्य केलं. पवार म्हणाले, "सचिन वाझेंच्या पुनर्नियुक्तीचा निर्णय गृहमंत्र्यांचा नाही. वाझेंना परमबीर सिंह यांनीच पुन्हा सेवेत घेतलं होतं."
तर "परमबीर सिंह यांनी केलेले 100 कोटींच्या वसुलीचे आरोप गंभीर आहेत. पण त्या पत्रावर परमबीर सिंह यांचे हस्ताक्षर नाहीत. तसंच, 100 कोटी कुणाकडे गेले याचा उल्लेख पत्रात नाही," असं पवार म्हणाले.
गृहमंत्री अनिल देशमुखांनी सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझेंना महिन्याला 100 कोटी रुपये वसूल करण्याचे लक्ष्य दिले होते असा आरोप माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केल्यानंतर विरोधी पक्षाने गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी परमबीर सिंहांचे आरोप फेटाळून लावले आहेतअनिल देशमुख यांचा राजीनामा घेतला जाईल की नाही याबाबत विचारले असता शरद पवार म्हणाले, 'अनिल देशमुख यांच्याबाबतचा निर्णय दोन दिवसांत होईल.'
 
राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही - जयंत पाटील
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर थेट आरोप केल्यानंतर अनिल देशमुखांना गृहमंत्रिपद सोडावे लागेल अशी भूमिका विरोधकांनी वारंवार मांडली. पण अनिल देशमुखांच्या राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत शरद पवार, प्रफुल पटेल, अजित पवार, सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील उपस्थित होते. त्यांच्यात तब्बल अडीच तास चर्चा झाली.
ही चर्चा झाल्यानंतर जयंत पाटलांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटले की "आमची चर्चा पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीबाबतच झाली. अनिल देशमुखांच्या राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही."

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जरे यांच्या हत्येसाठी बोठेनी 12 लाखांची सुपारी दिली होती