Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अफगाणिस्तान : अमेरिकेचे संरक्षणमंत्री अचानक काबूलमध्ये का पोहोचले?

अफगाणिस्तान : अमेरिकेचे संरक्षणमंत्री अचानक काबूलमध्ये का पोहोचले?
, सोमवार, 22 मार्च 2021 (15:27 IST)
अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन अचानक अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये पोहोचले आहेत. काही आठवड्यांनंतर अफगाणिस्तानात असलेले अमेरिकेचे सैन्य अफगाणिस्तान सोडणार आहेत. या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्त्वाचा मानला जातोय.
 
काबूलमध्ये अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांची भेट घेतल्यानंतर लॉईड ऑस्टिन म्हणाले, युद्धाचा अंत जबाबदार असला पाहिजे.
 
पण अंत कधी होईल हे मात्र त्यांनी सांगितलं नाही.
 
हिंसा कमी करण्यावर आणि संवादाच्या माध्यमातून संघर्ष संपवण्यावर भर दिला पाहिजे असं मत ऑस्टिन यांनी व्यक्त केलं.
गेल्या वर्षी ट्रंप प्रशासन आणि तालिबान यांच्यात झालेल्या करारानुसार, अमेरिकेचे सर्व सैन्य अफगाणिस्तानातून परतेल असं ठरलं होतं. पण तालिबान अफगाणिस्तान सरकारशी ठरल्याप्रमाणे चर्चा करणार का? हा प्रश्न कायम आहे.
 
अफगाणिस्तानातून सर्व सैन्य परतण्याची वेळ 1 मेपर्यंत ठरवणं कठीण असल्याचं अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी म्हटलंय.
 
बायडन यांच्या या वक्तव्यानंतर तालिबानने 'परिणाम भोगण्यास तयार रहा' असा इशारा दिला आहे.
 
ऑस्टिन हे अफगाणिस्तानचा दौरा करणारे बायडन प्रशासनातले पहिले उच्चस्तरीय अधिकारी आहेत. आशिया दौरा संपत असताना असताना ते काबूल येथे पोहचले.
 
करारानुसार तालिबान आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत आहे का? पत्रकारांशी बोलताना ऑस्टिन यांनी या प्रश्नाचे उत्तर दिले नाही.
न्यूयॉर्क टाईम्सनुसार संरक्षणमंत्री म्हणाले, "देशात मोठ्या प्रमाणावर हिंसा होते हे जाहीर आहे."
 
ते पुढे म्हणाले, "हिंसा कमी व्हावी अशी आमची इच्छा आहे. हिंसा कमी झाली तर चर्चेसाठी चांगले वातावरण निर्माण होईल. राजनैतिक कामाचे परिणाम दिसू शकतील."
 
दीर्घकालीन एक ठोस करार होण्यापूर्वी सर्व विदेशी सुरक्षा दल अफगाणिस्तानातून परतल्यास तालिबान पुन्हा सत्ता काबीज करेल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
 
आजही आमचे अडीच हजार सैनिक अफगाणिस्तानात आहे असं अमेरिकेचं म्हणणं आहे.
 
अमेरिका-तालिबान करार काय होता?
ट्रंप प्रशासनाने अफगाणिस्तानातून अमेरिकी सैन्य मागे घेण्यास प्राधान्य दिले होते. फेब्रुवारी 2020 च्या करारानुसार अमेरिकेला 14 महिन्यांत अफगाणिस्तानातून आपले सैन्य मागे घ्यायचे होते.
या बदल्यात तालिबान आपले आश्वासन पूर्ण करेल, असं ठरलं होतं. यानुसार, तालिबान अल-कायद्याला अफगाणिस्तानात बळ देणार नाही, तसंच तालिबानला राष्ट्रीय पातळीवर शांती वार्ता सुरू करेल.
 
या ऐतिहासिक करारानंतर तालिबान या कट्टर इस्लामी संघटनेने विदेशी दलांवरील हल्ले थांबवले. पण अफगाणिस्तान सुरक्षा दलांवरील हल्ले सुरूच आहेत.
 
अफगाणिस्तान सरकारशी चर्चा करण्यासाठी तालिबानने आपल्या हजारो मुलांची सुटका करण्याची अट घातली होती.
 
कतारची राजधानी दोहामध्ये तालिबान आणि अफगाणिस्तान सरकार यांच्यात थेट चर्चा सुरू झाली. पण अद्याप त्या चर्चेतून कोणत्याही प्रकारचा ठोस परिणाम दिसून आला नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आता या कामांना Aadhaar लागणार नाही, सरकारने नवीन अधिसूचना जारी केली आहे