शिवसेना सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस राष्ट्रवादीची मदत घेईल का, या प्रश्नावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपलं मत मांडलं. ते म्हणाले, "उद्धव ठाकरेंकडे पर्याय काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापनेचा आहे ना, पण ते कधीच याचा विचार करणार नाहीत."
चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, "उद्धव ठाकरे खूप व्यावहारिक आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी काय आहे, हे उद्धव ठाकरेंना माहीत आहे. त्यामुळं उद्धव ठाकरे तत्वत:ही काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाण्याचं मान्य करणार नाहीत आणि व्यावहारिक रिस्कही ते घेणार नाहीत."
"बाळासाहेब ठाकरे असतानाही शिवसेना-भाजपमध्ये संघर्ष झाले, पण कधीही काँग्रेसला मदत व्हावी, असं पाऊल त्यांनी उचललं नाही. बाळासाहेबांचा परखडपणा उद्धव ठाकरेंमध्ये आहे, तेच प्रेम उद्धव ठाकरेंमध्ये आहे. त्यामुळं बाळासाहेबांनी आयुष्यभर काँग्रेसशी संघर्ष केला, तो उद्धव ठाकरे सोडणार नाहीत. काँग्रेसमुक्त महाराष्ट्र आणि काँग्रेसमुक्त देश हा भाजपचा विचार शिवसेनेचाही आहे," असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.