Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दलित तरुणाशी लग्न करणारी भाजप आमदाराची मुलगी म्हणते- 'माझ्या जीवाला धोका'

दलित तरुणाशी लग्न करणारी भाजप आमदाराची मुलगी म्हणते- 'माझ्या जीवाला धोका'
उत्तर प्रदेशातले भाजपचे आमदार राजेश कुमार यांच्या मुलीनं एका दलित तरुणासोबत लग्न केलं आहे.
 
दलित तरुणासोबत लग्न केल्यानं वडिलांनी आम्हाला मारण्यासाठी लोक पाठवले आहेत, असं साक्षी आणि तिचे पती अभी उर्फ अजितेश कुमार यांनी सोशल मीडियावरून सांगितलं आहे.
 
अभी या दलित तरूणाशी प्रेमविवाह केल्याचा साक्षीचा दावा आहे. पण राजेश कुमार मिश्रा उर्फ पप्पू भरतौल यांना तो विवाह मान्य नव्हता. त्यामुळे वडिलांनी साक्षी आणि अभी मारण्यासाठी लोक पाठवले आहेत, असं साक्षी 'त्या' व्हीडिओ सांगत आहे.
 
'द हिंदू' वृत्तपत्राचे पत्रकार सौरभ त्रिवेदी यांनी शेअर केलेला व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
 
दरम्यान, बरेलीचे आमदार राजेश कुमार मिश्रा यांच्याशी बीबीसीनं संपर्क साधला. तेव्हा त्यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत.
 
साक्षीचे पती अभी सांगतात, "ज्या हॉटेलमध्ये आम्ही थांबलो होतो, त्या ठिकाणी आमदारांचे मित्र राजीव राणा आणि त्यांचे साथीदार आले होते. पण संधी मिळताच आम्ही तिथून निसटलो."
 
दलित असल्यानं साक्षीचे वडील मला स्वीकारायला तयार नाहीत, असं अभी यांचं म्हणणं आहे.
 
"बाबा, हे कुंकू मी फॅशन म्हणून लावलं नाही मी खरंच लग्न केलंय. आता आम्हाला त्रास देऊ नका," असं साक्षी आणखी एका व्हीडिओत म्हणत आहे.
 
उत्तर प्रदेश विधानसभेच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार भाजपचे आमदार राजेश कुमार मिश्रा हे जातीने ब्राह्मण आहेत.
 
आमदार राजेश कुमार मिश्रा यांचं काय म्हणणं आहे?
आमदार राजेश कुमार मिश्रा यांनी साक्षीचे सगळे आरोप फेटाळले आहेत. साक्षी आणि अभी यांना पकडण्यासाठी कुणालाही धाडलं नाही असं मिश्रा यांनी बीबीसीला सांगितलं.
 
साक्षी सध्या कुठं आहे हे आम्हाला माहिती नाही. तिच्याशी आम्ही संपर्क साधायचा प्रयत्न केला नाही आणि साक्षीनेही त्यांच्याशी संपर्क केला नाही, असं मिश्रा म्हणाले.
 
"जे आमचं घर सोडून जातात त्यांच्याशी आम्ही संपर्क करत नाही. तिला जिथं राहायचं आहे तिथं राहू द्या. आम्ही तिचा शोधही घेतला नाही किंवा फोनही केला नाही. या मुद्द्यावर आम्ही प्रशासनाची पण मदत घेतली नाही. याबाबत आम्हाला काहीही करायचं नाही. मी भाजपचा कार्यकर्ता आहे. मी माझं काम करत आहे. त्या दोघांशी माझं काहीही देणं-घेणं नाही," असं आमदार मिश्रा यांनी बीबीसीला सांगितलं.
 
साक्षीच्या म्हणण्यानुसार, तिचं, तिचे पती आणि पतीच्या परिवाराचं बरंवाईट झालं तर त्यामागे तिचे वडील आणि त्यांचे मित्र हे जबाबदार असतील.
 
बरेलीच्या पोलिसांनी आम्हाला सुरक्षा द्यावी असं साक्षीनं व्हीडिओद्वारे मागणी केली आहे.
 
दरम्यान बरेली शहरचे पोलीस आयुक्त अभिनंदन यांच्याशी बीबीसीनं संपर्क केला. त्यांच्याकडं साक्षीने अशी कोणतीही तक्रार दाखल केली नसल्याचं त्यांनी सांगितलं. केवळ व्हीडिओच्या आधारे कारवाई करणं बरोबर नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
 
"जोपर्यंत तक्रार येत नाही, तो पर्यंत कारवाई कसं करणार? तक्रार आली तर कारवाई करता येईल. कित्येक वेळा व्हीडिओ खोटे असतात. जिवाला धोका वाटत असेल त्यांनी पोलिसांकडे यावं. मुलीच्या परिवाराकडून किंवा मुलाच्या परिवाराकडून तक्रार आली नाही. त्यांच्याकडून फोनही नाही आला," असं अभिनंदन सांगतात.
 
तक्रार आली तर कारवाई करणार का? असं विचारलं असता, अभिनंदन सांगतात, "मुलीनं किंवा मुलानं आमच्याकडं तक्रार केली किंवा फोन केला तर आम्ही मदत करायला तयार आहोत. केस दाखल केली जाईल किंवा त्यांनी सुरक्षा पुरवण्यात येईल."
 
दरम्यान, साक्षीच्या जिवाला धोका नाही असं आमदारांनी दावा केला आहे. "ती हे सगळं हसून सांगतेय. खरंच जिवाल धोका असता तर ती हसत हसत बोलली नसती," असं आमदार मिश्रा यांचं म्हणणं आहे.
 
"आनंदी आणि स्वतंत्र जीवन जगण्यासाठी मी हे केलंय," असं साक्षी व्हीडिओमध्ये सांगते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आणि धर्मेंद्र ट्विटरवर परतले