Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अग्निपथ योजनेवरून हिंसक आंदोलनाचा तीनशेहून अधिक ट्रेन्सना फटका

अग्निपथ योजनेवरून हिंसक आंदोलनाचा तीनशेहून अधिक ट्रेन्सना फटका
, शनिवार, 18 जून 2022 (09:50 IST)
'अग्निपथ' योजनेच्या विरोधात देशभरात आंदोलन होत असताना दिसत आहेत. या हिंसक आंदोलनाचा तीनशेहून अधिक ट्रेन्सना फटका बसल्याचं समोर आलं आहे.
 
देशाच्या विविध भागात लष्कर भरतीशी निगडीत अग्निपथ योजनेवरून हिंसक आंदोलनामुळे देशभरातील तीनशेहून अधिक रेल्वेगाड्यांना फटका बसला आहे.
 
गेल्या तीन दिवसांपासून या योजनेला विरोध म्हणून रेलरोको, रेल्वेचे डबे जाळणे असे प्रकार होत आहेत. तेलंगण, बिहार आणि उत्तर प्रदेशात रेल्वे गाड्यांना आग लावण्याचे प्रकार घडले आहेत.
 
उत्तर प्रदेशातल्या बलिया जिल्ह्यात अग्निपथ योजनेला झालेला विरोध लक्षात घेऊन पुढील दोन महिन्यांकरता जमावबंदीचं कलम 144 लागू करण्यात आलं आहे.
 
बीबीसी प्रतिनिधी दिलनवाझ पाशा यांच्याशी बोलताना बलियाच्या जिल्हाधिकारी सौम्या अग्रवाल यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
 
'अग्निपथ'ची आग दक्षिणेतही
हैदराबादमधील सिकंदराबाद रेल्वे स्थानकावर पुकारलेल्या आंदोलनाला शुक्रवारी हिंसक वळण लागलं. शुक्रवारी सकाळीचं शेकडोच्या संख्येने तरुण रेल्वे स्थानकावर जमले. फलाटावर जाऊन त्यांनी तिथल्या दुकानांची नासधूस केली. तिथेच असलेल्या काही प्रत्यक्षदर्शींनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "अंदाजे दोन हजार आंदोलक रेल्वे स्थानकात घुसले होते."
 
आंदोलकांनी रेल्वे पार्सलमधून माल उचलून रुळांवर ठेवला आणि आग लावली.
 
आंदोलकांनी तिरुपती-सिकंदराबाद ट्रेनसह काही गाड्यांचे काही डबे पेटवल्याने परिस्थिती तणावपूर्ण बनलीय.
 
बीबीसी तेलुगूच्या रिपोर्टर सुरेखा अब्बुरी सांगतात, पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला, तसेच हवेत गोळीबार केला. यात दहाहून जास्त राउंडफायर केले.
 
पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये नेमके किती लोक जखमी झाले आहेत याची आकडेवारी सध्या उपलब्ध नाही. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार, या निदर्शनांमध्ये एका आंदोलकाचा मृत्यू झाला असून पोलिसांकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. बीबीसीची टीम या वृत्ताची स्वतंत्रपणे पडताळणी करू शकलेली नाही.
 
प्लॅटफॉर्म क्रमांक 1, 2 आणि 3 वर मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. रेल्वे सुरक्षा दलासह तेलंगणा पोलीसही रेल्वे स्थानकावर पोहोचले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याच्या प्रयत्नात आहेत.
 
शेकडो तरुणांचा जमाव अजूनही रेल्वे स्टेशनमध्येच आहे. हे आंदोलक आपल्या हातात 'लष्कर भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी न्याय' अशा आशयाचे फलक घेऊन उभे आहेत. या आंदोलनात उत्तर भारतीयांसोबतचं स्थानिकांनीही सहभाग घेतला होता.
 
तेलंगणातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून हैदराबादला आल्याचा दावा करणाऱ्या आंदोलकांनी अग्निपथ योजनेच्या विरोधात असल्याचं सांगितलं. या योजनेमुळे सैन्य भरतीमध्ये अडचणी निर्माण होतील, असा आरोप त्यांनी केला आहे. सैन्य भरतीची आहे ती पद्धतचं सुरू ठेवण्याची मागणी ही या आंदोलकांनी यावेळी केलीय.
 
तेलंगणमधील गांधी रुग्णालयाचे डॉ. राजा राव यांनी बीबीसीशी बोलताना हल्ल्यात जखमी झालेल्या लोकांबद्दल माहिती दिली. या हल्ल्यात जखमी झालेल्या एका व्यक्तीचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आणि 13 लोकांवर अजून उपचार सुरू आहेत असं ते म्हणाले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

परबांना ईडीचा बुलावा आला असेल तर जावंच लागणार”- किरीट सोमय्या