Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Sunday, 13 April 2025
webdunia

अग्निपथ योजना: भारतीय सैन्यात 4 वर्षं सेवा करा, समजून घ्या ही योजना 7 मुद्द्यांत

Agneepath Yojana
, मंगळवार, 14 जून 2022 (17:35 IST)
Agneepath Yojana: भारतातील तरुणांना आता चार वर्षांसाठी सैन्यात भरती होऊन देशसेवा करता येणार आहे. भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी याबाबतची 'अग्निपथ योजना' जाहीर केली. या योजनेअंतर्गत सैन्यात भरती होणाऱ्या तरुणांना 'अग्निवीर' म्हटलं जाणार आहे.
 
भारताच्या तिन्ही सैन्यदलांच्या प्रमुखांसह संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पत्रकार परिषद घेतली आणि अग्निपथ योजनेची घोषणा केली. तसंच, या योजनेबाबत सविस्तर माहितीही दिली.
 
या अग्निपथ योजनेअंतर्गत तरुणांना चार वर्षांसाठी सैन्यात काम करता येणार आहे. या 'अग्निवीरांना' संरक्षण मंत्रालयाकडून आकर्षक आर्थिक मानधन आणि सोयी-सुविधाही दिल्या जाणार आहेत.
 
अग्निपथ योजनेमुळे रोजगाराच्या संधी वाढतील आणि सैन्यातील कौशल्य, अनुभव यांमुळे विविध क्षेत्रात रोजगाराच्य संधी मिळतील, असं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले.
 
तसंच, "आपल्या अर्थव्यवस्थेला उच्च कौशल्याच्या मनुष्यबळही उपलब्ध होईल. परिणामी उत्पादकता वाढेल आणि जीडीपी वाढण्यासही मदत होईल," असंही राजनाथ सिंह म्हणाले.
 
या अग्निपथ योजनेबद्दल जाणून घेऊया या 7 मुद्द्यांमधून...
 
1) अग्निपथ योजनेअंतर्गत सैन्यात चार वर्षांसाठी देशसेवा करता येणार आहे. चार वर्षांसाठी काम सेवा करणाऱ्या या सैनिकांना 'अग्निवीर' म्हटलं जाईल.
 
2) चार वर्षांनंतर या अग्निवीरांना निवृत्त केले जाईल. मात्र, यातील 25 टक्के तरुणांना पुन्हा सेवेत घेतले जाईल. त्यासाठी आणखी सहा महिन्यांचं स्वतंत्र प्रशिक्षण दिले जाईल.
 
3) पुढच्या 90 दिवसात म्हणजे तीन महिन्यात अग्निपथ योजनेअंतर्गत भरती सुरू होईल.
 
4) वय वर्षे 17 ते 21 दरम्यानच्या तरुणांना या अग्निपथ योजनेचा लाभ घेऊन सैन्यात चार वर्षांसाठी भरती होता येईल.
 
5) या योजनेअंतर्गत पहिल्या वर्षी महिन्याकाठी 30 हजार रुपये, तर चौथ्या वर्षी यात वाढ होऊन 40 हजार रुपये वेतन मिळेल.
 
6) या योजनेअंतर्गत काम करत असताना जर अग्निवीरानं सर्वोच्च बलिदान दिलं, तर विम्याची मदत दिली जाईल, तसंच कुटुंबाला एक कोटींची आर्थिक मदत आणि संपूर्ण सेवानिधी त्यांना दिला जाईल.
 
7) राष्ट्रनिर्मितीच्या उद्देशासाठी या योजनेचा फायदा होईल, अशी आशा व्यक्त केली गेलीय. तसंच, यातून शारीरिक तंदुरुस्ती, कौशल्य विकास, मानसिक विकास, टीम बिल्डिंग आणि डिसिप्लिन अशा विविध गोष्टी अग्निवीरांना या चार वर्षात आत्मसात करता येतील, असंही सैन्य अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलंय.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

IND vs SA 3rd T20 : भारतासाठी करा किंवा मरा सामना, सामना कधी, कुठे आणि कसा पाहायचा जाणून घ्या