Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोरोनाची लस घेतल्यानंतर या 3 मराठी डॉक्टरांना काय वाटलं?

कोरोनाची लस घेतल्यानंतर या 3 मराठी डॉक्टरांना काय वाटलं?
, शुक्रवार, 15 जानेवारी 2021 (18:10 IST)
- जान्हवी मुळे
16 जानेवारीपासून भारतात लसीकरणाला सुरूवात होत आहे. पण परदेशात राहणाऱ्या काही मराठी भाषिकांना याआधीच लशीचा डोस मिळाला आहे. त्यांचे अनुभव आम्ही जाणून घेतले.
 
बहुतांश देशांमध्ये आरोग्यक्षेत्रातील कर्मचारी, वयस्कर व्यक्ती किंवा ज्यांना कॅन्सरसारखे आजार आहेत अशा व्यक्तींना प्राधान्यानं लस दिली जाते आहे.
 
लसीकरणाची प्रक्रिया ही सगळीकडे काहीशी समान आहे. आधी नोंदणी करून मगच तुम्ही लस टोचून घेण्यासाठी नियोजित ठिकाणी जाऊ शकता. तुमची सगळी कागदपत्र तिथे तपासली जातात आणि तुम्हाला दुसरा कुठला आजार, अलर्जी नाही याची खात्री करून घेतली जाते.
 
दुष्परिणामांची माहिती दिल्यावर किंवा संमतीपत्रावर सही केल्यानंतर लस टोचली जाते. लस घेतल्यावर पंधरा ते तीस मिनिटं तिथेच बाजूला थांबावं लागतं, म्हणजे लशीचा काही थेट परिणाम होत नाही ना, हे पाहिलं जातं.
 
लस घेतल्यानंतरचा अनुभव कसा असतो? यूएसए, यूके आणि जर्मनीत राहणाऱ्या तीन डॉक्टर्सशी आम्ही बोललो. या तिघांनाही लशीचा पहिला डोस मिळाला आहे.
 
डॉ. निकिता बिळगी, फिलाडेल्फिया, यूएसए
डॉ. निकिता बिळगी अमेरिकेतल्या फिलाडेल्फिया शहरात राहतात आणि फिजिकल थेरपीस्ट म्हणून करतात. कोव्हिडची साथ पसरल्यावरही त्यांचं काम थांबलं नव्हतं.
 
"आम्ही रुग्णांना उपचार देणं थांबवू शकत नाही. कारण शस्त्रक्रियेनंतर त्यांना फिजियोथेरपीची गरज असते. मी पीपीई घालून, मास्क आणि ग्लव्ज घालून आवश्यक उपचार देत होते.
 
'फ्रंटलाईन वर्कर' असल्यानं मला लस घेण्याची संधी लवकर मिळाली. इथे मॉडर्ना आणि फायझर दोन्ही लशी उपलब्ध आहेत आणि वेगवेगळ्या कंपन्या किंवा संस्थांना लस पुरवणाऱ्या फार्मसीचा ज्यांच्याशी करार आहे त्यानुसार लस दिली जाते."
 
नऊ जानेवारीला निकिता यांना मॉडर्नाच्या लशीचा पहिला डोस मिळाला. त्या सांगतात, "कुठलंही इंजेक्शन घेतलं, की पहिल्या दिवशी असं दुखणं किंवा अवघडणं अपेक्षित असतंच. नशीबानं मला फार काही त्रास झाला नाही. फक्त लस घेतली तो हात खूप दुखत होता, अवघडल्यासारखा झाला.
 
"पण चोविस तासात दुखणं कमीकमी होत गेलं. मला ताप, मळमळण, थंडी वाजणं, यातलं काही झालं नाही. आता माझा पुढचा डोस अठ्ठावीस दिवसांनंतर आहे."
 
निकिता यांचा लस घेण्यामागे आणखी एक उद्देश आहे. "मी लस घेतली आणि मला थोडेफार दुष्परिणाम झाले, तरी त्याची माहिती सीडीसीला कळते आहे. म्हणजे माझ्यासारख्या लोकांना आलेल्या अनुभवाचा ते अभ्यास करू शकतील. एकप्रकारे आम्ही विज्ञानाला मदत करतो आहोत."
 
अमेरिकेत पूर्ण लॉकडाऊन झालं नाही, पण फिलाडेल्फियात नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये सेमी लॉकडाऊनसारखी परिस्थिती होती. अनेक गोष्टींवर बंधनं होती. अमेरिकेतली वाढती रुग्णसंख्या पाहता तिथे जास्तीत जास्त जणांनी लस घ्यायला हवी, असं निकिता यांना वाटतं. तसंच लस घेतल्यावरही काळजी घेत राहायला हवं असं त्या अधोरेखित करतात.
 
"लस मिळाल्यावरही मास्क घालत राहणं महत्त्वाचं आहे. लस मिळाली म्हणजे आपल्याला आजार होणारच नाही असं नाही. मास्क घालणं, हात धुणं या गोष्टी कोव्हिडच नाही तर कुठलाही संसर्ग टाळण्यासाठी महत्त्वाच्या आहेत."
 
डॉ. आशुतोष तोंडारे, लंडन, यूके
डॉ. आशुतोष तोंडारे मूळचे औरंगाबादचे असून ते ब्रेस्ट कॅन्सर सर्जन आहेत. याच क्षेत्रात त्यांना फेलोशिप मिळाली असून, त्यामुळेच ते सध्या युकेमध्ये आहेत आणि तिथेच कामही करत आहेत.
 
ते सांगतात, "मला फायजरची लस मिळाली, कारण जेव्हा मी लस घेण्यासाठी गेलो तेव्हा ही एकच लस उपलब्ध होती. बाकीच्या लशी टप्प्याटप्प्यानं येत आहेत."
 
लशीचा पहिला डोस घेतल्यावर त्या दिवशी आशुतोष यांना फारसा त्रास जाणवला नाही. "दुसऱ्या दिवशी जिथे लस घेतली तिथे हात दुखत होता आणि अंग थोडंसं भरून आल्यासारखं वाटत होतं. ही लक्षणं अपेक्षित होती आणि त्यापलीकडे फारसा काही त्रास झाला नाही. मी शनिवारी लस घेतली आणि सोमवारी पहिल्यासारखाच कामावर जाऊ शकलो."
 
यूकेमध्ये सध्या कोव्हिडच्या साथीची दुसरी लाट आली आहे, त्यामुळे लस योग्य वेळेत आल्याची भावना आशुतोष व्यक्त करतात.
 
"परिस्थिती चांगली नाहीये, रुग्णांची संख्या वाढते आहे. ही सेकंड वेव्ह अपेक्षितच होती. पण आरोग्ययंत्रणेवर त्यामुळे भार पडतो आहे आणि बरेच रुग्ण आयसीयूमध्ये दाखल आहेत. डिसेंबरच्या अखेरीस आम्हाला वाटलं होतं की जानेवारी महिना अवघड जाईल. पण आता वाटतं फेब्रुवारी आणखी अवघड असेल.
 
लस लवकरात लवकर आल्यानं कोव्हिडच्या साथीला आळा घालता येईल, असा विश्वास आशुतोष यांना वाटतो.
 
"तुम्हाला जोवर तुमच्या डॉक्टरनं तुमच्या एखाद्या आजारामुळे लस घेऊ नका असं सांगितलं नसेल तर लस घेण्यास हरकत नाही", असं ते सांगतात.
 
डॉ. अमेय कुंटे, हँबर्ग, जर्मनी
डॉ. अमेय कुंटे हे मेडिकल आँकॉलॉजिस्ट म्हणजे कर्करोगतज्ज्ञ असून पाच वर्षांपासून जर्मनीतल्या हँबर्गमध्ये राहात आहेत आणि तिथल्या रुग्णालयात काम करत आहेत.
 
जर्मनीतल्या सध्याच्या परिस्थितीविषयी ते सांगतात, "इथे सेकंड वेव्ह सुरू आहे, ख्रिसमसच्या आधी केसेस वाढत होत्या. त्यामुळे लॉकडाऊन करण्यात आलं होतं, जे ३१ जानेवारीपर्यंत वाढवण्यात आलं."
 
कोव्हिडची पहिली लाट आली, तेव्हाही डॉ. अमेय रुग्णालयात काम करत होते. "मी इमर्जन्सी विभागात होतो. तिथे काही रुग्ण यायचे ज्यांना कोव्हिडची कुठलीही लक्षणं नसायची. पण नंतर त्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आली, तर त्यांच्या संपर्कात आल्यामुळे आम्हालाही पुढचे चौदा दिवस तब्येतीवर लक्ष ठेवावं लागायचं, रोज तपासण्या करून घ्याव्या लागायच्या. म्हणजे इतरांना संसर्ग व्हायला नको. "
 
"एक वेळ अशी आली की आलेल्या रुग्णांना आयसोलेशन मध्ये ठेवण्यासाठी जागा उरली नाही. अशा वेळेस तुम्हाला संसर्गाचा धोका वाढतो. लस येईपर्यंत त्यावर काही इलाज नव्हता."
 
जर्मनीत मोठ्या रुग्णालयांना सरकारनं लस पुरवल्याचं अमेय सांगतात. आधी थेट आयसीयूमध्ये काम करणारे डॉक्टर्स किंवा इमर्जन्सी पेशंटच्या संपर्कात येणारे डॉक्टर्स यांना लस देण्यात आली. त्यानंतर बाकीच्या डॉक्टर्सना नोंदणी करून लस घेता आली.
 
युरोपमध्ये फायझर बायोएन्टेक आणि मॉडर्नाच्या लशीला मान्यता मिळाली आहे. अमेय यांना एक जानेवारीला फायझर बायोएन्टेकच्या लशीचा डोस मिळाला.
 
"मी नव्या वर्षाची सुरुवात लस घेऊन केली. इतर कुठलंही इंजेक्शन घेतो तशीच दंडावर त्यांनी सुई टोचून लस दिली.
 
"सुरुवातीच्या काही काळ जिथे सुई टोचली तिथे दुखत होतं, जे स्वाभाविक आहे. त्यानंतर घरी आल्यावर रात्री माझा हात दुखत होता आणि डोकं जड झाल्यासारखं वाटलं. माझ्या सहकाऱ्यांपैकी कुणाला हलका ताप येऊन गेला तर कुणाचे सांधे दुखत होते, पण त्यानंतर फार काही त्रास कुणाला झाला नाही."
 
लशीचा परिणाम किती काळ राहील, किंवा त्याचे काही दूरगामी परिणाम होतील का हे अजून स्पष्ट नाही, पण त्यामुळे होणारे फायदे लक्षात घ्यायला हवेत असं ते सांगतात.
 
"लस न घेता जे नुकसान होईल त्यापेक्षा लस घेण्याचे फायदे जास्त आहेत. लस जर 70 टक्के किंवा 90 टक्के प्रभावी आहे, म्हणजे ती घेतल्यावर तुम्हाला कोव्हिड होण्याची संधी 70 टक्के किंवा 90 टक्के कमी होते. शंभर टक्क्यांपेक्षा दहा टक्के धोका परवडला.
 
"तुम्ही लस घेता, ती फक्त स्वतःसाठी नाही, तर अख्ख्या समाजासाठी हे करत आहात. म्हणजे तुम्हाला संसर्ग होण्याचा धोका कमी होतोच, पण तुमच्यामुळे अजून कोणाला संसर्ग होणार नाही. या आजाराची साखळी तोडण्यासाठी हा एकच मार्ग आहे."

Share this Story:

वेबदुनिया वर वाचा

मराठी ज्योतिष लाईफस्टाईल बॉलीवूड मराठी बातम्या

Follow Webdunia marathi

पुढील लेख

तालिबान म्हणतं, ‘महागाई’मुळे एकपेक्षा जास्त लग्न करू नका