Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पाकिस्तानी माध्यमं भारताच्या निवडणुकीबद्दल काय म्हणतात? '2019 मध्ये पाकिस्तानने भाजपला जिंकण्यासाठी मदत केली', सविस्तर वाचा

पाकिस्तानी माध्यमं भारताच्या निवडणुकीबद्दल काय म्हणतात? '2019 मध्ये पाकिस्तानने भाजपला जिंकण्यासाठी मदत केली', सविस्तर वाचा
, शुक्रवार, 31 मे 2024 (12:31 IST)
भारतात लोकसभा निवडणुका सुरू आहेत. या निवडणुकीची पाकिस्तानच्या माध्यमांमध्येही चर्चा होऊ लागली आहे. चर्चेच्या केंद्रस्थानी भारत आणि पाकिस्तानमधील नेत्यांची वक्तव्यं आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी 25 मे रोजी मतदान केल्यानंतर कुटुंबासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. त्या पोस्टला रिशेअर करत इम्रान खान सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या फवाद चौधरी यांनी एक वक्तव्य केलं होतं. ‘’शांतता आणि सद्भावना...द्वेष आणि अतिरेकी शक्तींचा पराभव होऊ दे’’, असं चौधरी यांनी म्हटलं होतं. फवाद यांनी ट्विट करताच अरविंद केजरीवाल यांनीही त्यांना उत्तर दिलं होतं.
 
"चौधरी साहेब, मी आणि माझ्या देशातील लोक आमच्या समस्या सोडवण्यास सक्षम आहोत. आपल्या ट्विटची गरज नाही. यावेळी पाकिस्तानची स्थिती वाईट आहे. आपण आपला देश सांभाळावा’’ असं केजरीवालांनी सुनावलं होतं. यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये सोशल मीडियावर वाकयुद्ध रंगलं. फवाद यांनीही त्यावर केजरीवालांना प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले-मुख्यमंत्री साहेब, निवडणूक तुमचाच मुद्दा आहे. भारत असो वा पाकिस्तान अतिरेकाची कुठलीही सीमा नसते. विवेकबुद्धी असलेला कोणीही याला बरोबर म्हणणार नाही. पाकिस्तानमधली परिस्थिती चांगली नाही. पण, प्रत्येकानं सुधारणांसाठी प्रयत्न करायला हवा. केजरीवाल आणि फवाद यांच्यामध्ये रंगलेल्या सोशल मीडिया वॉरवरून दिल्ली भाजपनं केजरीवालांना घेरण्याचा प्रयत्न केला. केजरीवाल यांना मत देण्याची विनंती पाकिस्तानातून केली जात आहे, असं दिल्ली भाजपचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा म्हणाले.
 
लोकसभा निवडणुकीत भारत आणि पाकिस्तानच्या नेत्यांमध्ये असं वाकयुद्ध रंगण्याची ही पहिलीच वेळ नाही. फवाद चौधरी असतील, पंतप्रधान मोदी असतील किंवा माजी उच्चायुक्त यांच्या वक्तव्यांवरून भारताच्या लोकसभा निवडणुकीत पाकिस्तानबाबत आणि पाकिस्तानमध्ये भारताताली निवडणुकीची चर्चा सुरू आहे. पाकिस्तानची माध्यमंही याचं वार्तांकन करत आहेत. भारतीय निवडणुकीची पाकिस्तानमध्ये नेमकी कशी चर्चा सुरू आहे? याबद्दल लेखात माहिती घेऊ.
 
पाकिस्तानबद्दल काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
पंतप्रधान मोदींसह भाजपच्या बड्या नेत्यांनी लोकसभा निवडणूक प्रचारात पाकिस्तानचा उल्लेख केला. 19 एप्रिलला मध्य प्रदेशातल्या दमोह इथं पंतप्रधान मोदींची सभा झाली होती. त्यात दहशतवादी पुरवणारा शेजारचा देश आता अन्नासाठी संघर्ष करतोय, असं मोदी म्हणाले होते. तर दुसऱ्या एका प्रचार सभेत मोदींनी, विरोधी पक्षांना पाकिस्तानचा अणुबॉम्ब स्वप्नात येतो असं म्हटलं होतं. गृहमंत्री अमित शाह यांनीही बिहारमधील काराकाटमध्ये 26 मे रोजी झालेल्या सभेत म्हटलं होतं की, "काँग्रेस पाकिस्तानच्या अणुबॉम्बला घाबरतं. पण, आम्ही मोदींचे कार्यकर्ते आहोत. आम्ही कोणालाही घाबरत नाही.’’ मधल्या काळात मणिशंकर अय्यर यांची एक मुलाखतही व्हायरल झाली होती. त्यात पाकिस्तानकडं अणुबॉम्ब असल्याचा उल्लेख त्यांनी केला होता.
 
त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजप नेत्यांनी काँग्रेसवर टीका केली होती. पंतप्रधान मोदी यांना एका वाहिनीवरील मुलाखतीतही पाकिस्तानच्या शक्तीबाबत प्रश्न विचारला होता. त्यावर मोदी म्हणाले,"लाहोरला जाऊन पाकिस्तानची शक्ती मी स्वतः तपासून आलो. कुठल्याही सुरक्षेविना मी थेट गेलो होतो. व्हिसा नसताना हे कसे काय आले? असं पाकिस्तानचे पत्रकार बोलत होते. पाकिस्तानची जनता त्रस्त आहे आणि त्याचं कारण मी स्वतः आहे, हे मला माहिती आहे असंही मोदी म्हणाले होते.
 
पाकिस्तानचे नेते, माजी अधिकारी काय म्हणाले?
फवाद चौधरी यांनी 26 मे रोजी पंतप्रधान मोदींची मुलाखत सोशल मीडियावर शेअर करत लिहिलं की, ‘’मोठ्या कार्यालयात लहान व्यक्ती. नवाज शरीफ यांनी मोदींना भारताचे पंतप्रधान म्हणून सन्मान दिला होता.’’ दुसरीकडं पाकिस्तानचे माजी उच्चायुक्त अब्दुल बासित यांनीही पंतप्रधान मोदींची मुलाखत शेअर केली होती. त्यात मोदींनी पाकिस्तानचा उल्लेख केला होता. आपण पाकिस्तानबद्दल जास्त विचार करायला नको. आपल्याला आपली उद्दीष्टे घेऊन पुढं वाटचाल करायची आहे, असं मोदी म्हणाले होते. पाकिस्ताननं 1947 मध्ये देश भारतापासून वेगळा करून घेतला. आता त्यांनी स्वतः त्यांचं भलं करावं. त्यांनी त्यांचं त्यांचं जगावं, आम्ही खूप पुढे निघून गेलो आहोत’’, असं पंतप्रधान मोदी म्हणाले होते. हीच मुलाखत शेअर करत बासित म्हणाले, "यात पाकिस्तानचं; भलं आहे. जरा धीर धरा. भारताला पाकिस्तानची अधिक गरज आहे. मोदी पुन्हा निवडून आले तर ते त्यांची वक्तव्यं मागे घेतील. थोडी वाट पाहा.’’
 
पाकिस्तानी माध्यमांमधील चर्चा?
लोकसभेच्या प्रचारात पाकिस्तानचा उल्लेख झाल्यानंतर पाकिस्तानी माध्यमांनी त्यावर बातम्या केल्या. इंटरनॅशनल लेबर ऑर्गनॉयझेशनमध्ये काम करणारे माजी शास्त्रज्ञ नोमान माजिद यांनी डॉन न्यूजमध्ये ‘’भारताच्या निवडणुकीत मुस्लिमांसंबंधी प्रश्न’’ अशा मथळ्याखाली लेख लिहिला. यात 2019 आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीतल्या प्रचाराची चर्चा करण्यात आली आहे. "2019 मध्ये पाकिस्तानसारख्या बाहेरच्या शत्रूला केंद्रस्थानी ठेवून प्रचार झाला होता. त्यावेळी आरएसएस आणि भाजप म्हणायचे आम्ही पाकिस्तानमध्ये घुसून मारू. आता मात्र भारतातील मुस्लीम समाज प्रचाराच्या केंद्रस्थानी आला आहे. 2024 च्या निवडणुकीत भाजप मुस्लीम समाजाला घुसखोर ठरवत आहे.’’ हिंदू माता-भगिनींचं सोनं मुस्लीमांना वाटण्याचा काँग्रेसचा डाव आहे, असं मोदी म्हणाले होते. काँग्रेसनं असा कुठलाही दावा आपल्या जाहीरनाम्यात केला नव्हता. तरीही मोदींनी असं वक्तव्य केलं होतं. त्याचाही उल्लेख डॉन न्यूजच्या लेखात आहे. भाजप आणि आरएसएस मुस्लीम समाजाला घुसखोर मानतात, असंही या लेखात म्हटलंय. पण, पंतप्रधान मोदी आणि भाजप धार्मिक ध्रुवीकरण आणि भेदभावाचे आरोप फेटाळून लावताना दिसतात. आम्ही फक्त विकासाचं राजकारण करतो, असं भाजपकडून सांगण्यात येतं.
 
मलीहा लोधी काय म्हणत आहेत?
संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानच्या स्थायी प्रतिनिधी असलेल्या मलीहा लोधी यांनीही एक विश्लेषण लिहिलंय. यात त्यांनी भाजपच्या 400 पारच्या दाव्यावर संशय व्यक्त केला आहे. तसंच मोदींनी प्रचारात केलेल्या पाकिस्तानबद्दलच्या वक्तव्याचा उल्लेखही त्यांनी लेखात केलाय. काही दिवसांपूर्वी पाकव्याप्त काश्मीरमध्ये पीठाच्या किंमतीवरून हिंसक आंदोलनं झाली होती. यावरून मोदींनी पाकिस्तानवर टीका केली होती. त्याबाबत लोधी यांनी लिहिलं की, "मोदी पुन्हा सत्तेत आले तर भारत आणि पाकिस्तान यांचे संबंध आणखी ताणले जातील. मोदींची ही व्यक्तव्यं राजकीय आहेत असं काही लोक म्हणतात. पण, बोललेल्या प्रत्येक गोष्टीचे परिणाम भोगावे लागतात.’’ "भाजपची विचारसरणी पाकिस्तान आणि मुस्लीमविरोधी आहे. अशात भारतात मोदींचं सरकार आलं तर पाकिस्तानसोबत संबंध सुधारण्याची शक्यता कमी आहे,’’ असंही त्यांनी म्हटलं.
 
लोकसभा निवडणूक आणि पाकिस्तान
भारतीय निवडणुका आणि पाकिस्तान या मथळ्याखाली 'द एक्सप्रेस ट्रिब्यून' वृत्तपत्रात एक लेख प्रकाशित झाला. यात पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेस आणि पाकिस्तानचा संबंध जोडल्याच्या वक्तव्याचा उल्लेख आहे. भारतात काँग्रेस संपण्याच्या मार्गावर आहे, त्याचवेळी पाकिस्तान रडतोय हा काही फक्त योगायोग नाही, असं मोदी म्हणाले होते. त्याचाच उल्लेख या लेखात आहे. 2019 च्या निवडणुकीआधी पुलवामा हल्ल्यानंतर मोदी सरकारनं पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केल्याचं म्हटलं होतं. याच एअर स्ट्राईकवरून जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केलेल्या दाव्यांचा उल्लेख या लेखात आहे. पाकिस्तानसोबत संबंध ताणून भाजप स्वतःच्या देशात आपला फायदा करून घेते, असं यात म्हटलंय. फवाद चौधरी यांनी राहुल गांधींचा व्हीडिओ शेअर करत स्तुती केली होती. त्यानंतर भाजपनं काँग्रेसवर टीका केली होती. त्याचाही उल्लेख या लेखात आहे.
 
कामरान युसूफ यांनी याचा उल्लेख करताना लिहिलं की, "हे नेते भारत आणि पाकिस्तानमधील लोकांना मुर्ख बनवत असल्याचं दिसतं आहे. फवाद चौधरी यांच्या ट्विटला पाकिस्तानमध्ये कोणीही विचारत नाही. पण, सीमेच्या दुसऱ्या बाजूचे लोक भारतात भाजप फवाद चौधरीच्या ट्विटवरून काँग्रेस आणि पाकिस्तान सोबत असल्याचं चित्र निर्माण करतात.’’ या लेखात इम्रान खान यांनी केलेल्या वक्तव्याचाही उल्लेख आहे. "भारतात भाजपचं सरकार आलं तर काश्मीरबद्दल काहीतरी तोडगा नक्की निघेल’’ असं इम्रान खान म्हणाले होते. त्यावरून, "एकमेकांवर केलेल्या टीका-टीप्पण्यांवरून एखाद्याच्या देशप्रेमावर टीका केली जात असेल तर 2019 ची निवडणूक जिंकण्यासाठी भाजपला मदत करणारा पाकिस्तानच होता हे विसरू नये,’’ असं या लेखात म्हटलं आहे. पाकिस्तानचे तत्कालिन पंतप्रधान इम्रान खान यांनी मोदींनी परत निवडून यावं अशी पाकिस्तानची इच्छा असल्याचं म्हटलं होतं, असा उल्लेखही या लेखात आहे.
 
Published By- Dhanashri Naik 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

धर्मांतर न करताही आंतरधर्मीय जोडपे करू शकतात लग्न, अलाहाबाद उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय