Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Friday, 18 April 2025
webdunia

संजय राऊत आज बेळगावमध्ये काय बोलणार? प्रकट मुलाखतीवर सर्वांचं लक्ष

Sanjay Raut
, शनिवार, 18 जानेवारी 2020 (11:59 IST)
शिवसेनेचे नेते संजय राऊत आज बेळगावच्या दौऱ्यावर आहेत. बेळगावमध्ये बॅ. नाथ पै यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी आयोजित होणाऱ्या व्याख्यानमालेत ते सहभागी होणार आहेत.
 
या कार्यक्रमात त्यांची प्रकट मुलाखत घेतली जाणार आहे.
 
नुकताच 'लोकमत'च्या पुणे येथील एका कार्यक्रमात त्यांनी केलेल्या काही विधानांमुळे ते अडचणीत आले होते. त्यानंतर त्यांना आपलं विधानही मागे घ्यावं लागलं होतं.
 
त्यामुळे आज बेळगाव येथील मुलाखतीत त्यांना कोणते प्रश्न विचारले जातात आणि त्यावर ते काय खुलासा करतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
 
बेळगावात हुतात्मा दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेलेल्या आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन महाराष्ट्राच्या हद्दीत आणून सोडलं.
 
बेळगाव आणि सीमा भागात 17 जानेवारी रोजी हुतात्मा दिन साजरा केला जातो. त्याला महाराष्ट्रातले नेते येऊ नयेत म्हणून कर्नाटक पोलिसांनी सकाळपासूनच महामार्गावर तपासणी सुरू केली होती. मात्र कर्नाटक राज्य परिवहनाच्या बसमधून कार्यक्रमस्थळी पोहोचलेल्या यड्रावकर यांना तेथेच रोखण्यात आलं.
 
काही दिवसांपूर्वी, विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सीमाभागाचा उल्लेख "कर्नाटक-व्याप्त महाराष्ट्र" असा केला होता. "नागरिकत्व सुधारणा कायद्याद्वारे केंद्र सरकार परदेशातून येणाऱ्या हिंदूंचा विचार करत आहे. मग बेळगावात हिंदू राहात नाहीत का? बेळगाव, कारवार, निपाणीच्या हिंदूंच्या प्रश्नांचं काय, असा प्रश्न त्यांनी भाजपला विचारला होता. कर्नाटक व्याप्त महाराष्ट्राचा भाग महाराष्ट्रात आणण्यासाठी सर्वच पक्षांनी एकत्र यायला हवं," असं ते म्हणाले होते.
 
इंदिरा गांधी यांच्यावरील वाद कसा सुरू झाला?
'लोकमत'च्या पुरस्कार सोहळ्यावेळी संजय राऊत यांची मुलाखत घेण्यात आली. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी या अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला याला भेटल्या होत्या, असं संजय राऊत यावेळी म्हणाले.
 
त्यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेस आणि राऊत यांच्यामध्ये खडाखडी झाली.
 
काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली. त्यावर प्रत्युत्तर देताना राऊत म्हणाले, "ज्यांना मुंबईचा इतिहास माहीत नाही त्यांनी या विषयावर बोलू नये."
 
"करीम लाला 'पख्तून जिरगा-ए-हिंद' या पठाणांच्या संघटनेचे प्रमुख होते. त्या निमित्ताने त्यांनी अनेक मोठ्या नेत्यांची भेट घेतली आहे. म्हणून ते इंदिरा गांधींना भेटायला गेले होते," असं ट्वीट संजय राऊत यांनी केलं.
 
तरीदेखील काँग्रेसने टीका करणं सोडलं नाही. यानंतर मात्र संजय राऊत यांना माघार घ्यावी लागली. "जर माझ्या वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माझं वक्तव्य मागे घेतो," असं त्यांनी स्पष्ट केलं.
 
छत्रपतींचे वंशज आणि राऊत यांच्याशी वाद
याआधी त्यांनी छत्रपती संभाजीराजे आणि उदयनराजे भोसले यांच्याशीही वाद घातला. दिल्ली भाजपच्या कार्यालयात जय भगवान गोयल यांच्या 'आज के शिवाजी - नरेंद्र मोदी' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा झाला. या सोहळ्यानंतर संजय राऊत यांनी वक्तव्य केलं भाजपमध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांनी तत्काळ राजीनामा द्यावा.
 
"महाराष्ट्रातील नेत्यांनी भूमिका घेतली पाहिजे, असं आमचं म्हणणं आहे. छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत आहे. नरेंद्र मोदींशी महाराजांची तुलना करणं राज्यातील भाजप नेत्यांना मान्य आहे का? मान्य असेल तर त्यांनी स्पष्टपणे सांगावं," असं संजय राऊत यांनी म्हटलं.
 
पुन्हा ते उदयनराजेंना म्हणाले की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहात याचा पुरावा द्या.
 
संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एक ट्वीट केलं. त्या ट्वीटमध्ये त्यांनी संजय राऊत यांच्या नावाचा एकेरी उल्लेख केला. 'उद्धवजी संजय रौतांच्या जीभेला लगाम घाला' असं ट्वीट त्यांनी केलं.
 
शिवाजी महाराजांच्या घराण्याला सातत्याने लक्ष्य करत असल्याबद्दल साताऱ्याचे माजी खासदार आणि सध्या भाजपमध्ये असलेले उदयनराजे भोसले यांनीही नाराजी व्यक्त केली होती. त्यांचं नाव न घेता त्यांनी त्यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली होती.
 
"नाव घेऊन मला त्यांना मोठं करायचं नाही. तो मोठ्ठा कधीच नव्हता. दरवेळी म्हटलं जातं की वंशजांना विचारा. जेव्हा शिवसेना काढली तेव्हा वंशजांना विचारून शिवसेना हे नाव तुम्ही ठेवलं का," असा सवाल उदयनराजेंनी त्यांचं नाव न घेता केला.
 
"वंशज म्हणून आम्ही काय केलं आहे? जे आम्हाला शिवाजी महाराजांनी शिकवलं की तेच आम्ही केलं. जर कुणी आमच्याविरोधात ब्र काढला तर बांगड्या आम्ही पण भरलेल्या नाहीत," असा इशारा उदयनराजे भोसले यांनी दिला. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Bapu Nadkarni: सलग 21 मेडन ओव्हर टाकणाऱ्या माजी फिरकीपटूचं निधन