Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Who is Sanjay Shirsat उद्धव ठाकरे यांना खरमरीत पत्र लिहणारे संजय शिरसाट कोण आहेत?

sanjay shirsat
, शुक्रवार, 24 जून 2022 (09:10 IST)
राज्यात शिवसेना पक्षफुटीच्या चर्चा होत असताना बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सर्व आमदारांना भावनिक आवाहन केलं होतं.
 
पण उद्धव ठाकरे यांच्या या आवाहनाला शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी सडेतोड उत्तर दिल्याचं दिसून आलं.
 
संजय शिरसाट हे एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या बंडखोर आमदारांपैकी एक आहेत. त्यांनी उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्राची गुरुवारी दिवसभर सोशल मीडियावर चर्चा झाली.
 
त्यांनी शिवसेना पक्षप्रमुखांना लिहिलेल्या पत्रात थेट जाब विचारला. असं धाडस दाखवल्याने त्यांच्याविषयी जोरदार चर्चा राज्यभरात सुरू आहे.
 
या निमित्ताने संजय शिरसाट कोण आहेत, त्यांचा आजवरचा राजकीय प्रवास कसा राहिला, याविषयी आपण माहिती घेऊ.
 
पत्रातून व्यक्त केली नाराजी
उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात संजय शिरसाट म्हणाले, "आमचा विठ्ठल हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे साहेबांना वंदन करून हे पत्र लिहितोय.
 
"पत्र लिहिण्यास कारण की...काल वर्षा बंगल्याची दारं खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांसाठी उघडली. बंगल्यावर झालेली गर्दी पाहून आनंद झाला. ही दारं गेली अडीच वर्षं शिवसेनेचे आमदार म्हणून आमच्यासाठी बंद होती.
 
"आमदार म्हणून बंगल्यात प्रवेश करण्यासाठी आम्हाला तुमच्या आजूबाजूला असलेल्या लोकांमधून, निवडून न येणाऱ्या विधानपरिषद आणि राज्यसभेत आमच्या जीवावर जाणाऱ्या बडव्यांची मनधरणी करायला लागत होती. हेच so called (चाणक्य कारकून) बडवे आम्हाला डावलून राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीची रणनीती ठरवत होते.
 
"त्याचा निकाल काय लागला हे अवघ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना स्वपक्षीय आमदार म्हणून वर्षा बंगल्यावर आम्हाला कधीही थेट प्रवेश मिळाला नाही. मंत्रालयाच्या सहाव्या माळ्यावर मुख्यमंत्री सर्वांना भेटतात पण आमच्यासाठी तर सहाव्या माळ्याचाही प्रश्न आला नाही, कारण तुम्ही मंत्रालयात कधी गेलाच नाहीत.
 
"मतदारसंघातील कामांसाठी इतर प्रश्नांसाठी, वैयक्तिक अडचणींसाठी सीएम साहेबांना भेटायचे आहे अशी अनेक वेळा विनवणी केल्यानंतर वर्षा बंगल्यावर तुम्हाला बोलावलं आहे, असा निरोप बडव्यांकडून यायचा. पण तासनतास बंगल्याच्या गेटवर उभं केलं जायचं. बडव्यांना अनेक वेळा फोन केला तर बडवे फोन रिसीव्ह करत नसायचे. शेवटी कंटाळून आम्ही निघून जायचो.
 
"तीन ते चार लाख मतदारांमधून निवडून येणाऱ्या आम्हा स्वपक्षीय आमदारांना अशी अपमानास्पद वागणूक का हा आमचा सवाल आहे. हीच सर्व हाल अपेक्षा आम्ही सर्व आमदारांनी सहन केली. आमची व्यथा आपल्या आजूबाजूच्या बडव्यांनी ऐकून घेण्याची ही कधी तसदीही घेतली नाही.
 
"किंबहुना आपल्यापर्यंत पोचवली सुद्धा जात नव्हती. मात्र याचवेळी आम्हाला आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचा दरवाजा उघडा होता. आणि मतदारसंघात असलेली वाईट परिस्थिती मतदारसंघातील निधी, अधिकारीवर्ग काँग्रेस राष्ट्रवादीकडून होत असलेला अपमान, आमची सर्व गाऱ्हाणी पक्षात फक्त शिंदे साहेब ऐकत होते आणि सकारात्मक मार्ग काढत होते.
 
"त्यामुळे आमच्या सर्व आमदारांच्या न्याय हक्कासाठी सर्व आमदारांच्या आग्रहाखातर आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना आम्ही हा निर्णय घ्यायला लावला.
 
"हिंदुत्व, अयोध्या, राममंदिर हे मुद्दे शिवसेनेचे आहेत ना? मग आता आदित्य ठाकरे आयोध्येला गेले तेव्हा आम्हाला अयोध्येला जाण्यापासून तुम्ही का रोखलं? तुम्ही स्वतः फोन करून अनेक आमदारांना अयोध्येला जाऊ नका असं सांगितलं. मुंबई विमानतळावरून अयोध्येला निघालेला मी आणि माझ्या सहकाऱ्यांचे लगेज चेक इन झाले होते.
 
"आम्ही विमानात बसणार इतक्यात तुम्ही शिंदे साहेबांना फोन करून सांगितलं की आमदारांना अयोध्येला जाऊ देऊ नका, जे गेले आहेत त्यांना तुम्ही स्वतः परत घेऊन या. शिंदे साहेबांनी आम्हाला लगेच सांगितलं की सीएम साहेबांचा फोन आला होता, आमदारांना अयोध्येला जाऊ देऊ नका. आम्ही मुंबई विमानतळावर चेक इन केलेले लगेज परत घेतले आणि आपलं घर गाठले.
 
"राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेच एकही मत फुटलं नव्हतं. मग विधानपरिषद निवडणुकीच्या तोंडावर आमच्यावर इतका अविश्वास का दाखवला? आम्हाला रामल्लांचं दर्शन का घेऊ दिलं नाही?
 
"साहेब, जेव्हा मला वर्षावर प्रवेश मिळत नव्हता तेव्हा आमचे खरे विरोधक काँग्रेस राष्ट्रवादीचे लोक तुम्हाला नियमित भेटत होते. मतदार संघातली काम करत होते, निधी मिळाल्याची पत्रं नाचवत होते, भूमिपूजन आणि उद्घाटन करत होते, तुमच्या सोबत काढलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल करत होते.
 
"त्यावेळी आमच्या मतदारसंघातले लोक विचारायचे की मुख्यमंत्री आपला आहे ना मग आपल्या विरोधकांना निधी कसा मिळतो? त्यांची कामं कशी होतात? तुम्ही आम्हाला भेटतच नव्हता तर आम्ही मतदारांना उत्तर काय द्यायचं या विचाराने जीव कासावीस व्हायचा.
 
"या सर्व कठीण प्रसंगात शिवसेनेचं, माननीय बाळासाहेबांचं, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं, हिंदुत्व जपणाऱ्या एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला मोलाची साथ दिली. आमच्या प्रत्येक कठीण प्रसंगात त्यांनी त्यांच्या घराचे दरवाजे आमच्यासाठी उघडे ठेवले होते, आजही आहेत उद्या ही राहतील या विश्वासापोटी आम्ही शिंदे साहेबांसोबत आहोत.
 
"काल तुम्ही जे बोललात जे काही झालं ते अत्यंत भावनिक होतं. पण त्यात आमच्या मूळ प्रश्नांची उत्तरं कुठेच मिळाली नाहीत. त्यामुळे आमचा भावना तुमच्यापर्यंत पोहोचवणारं हे भावनिक पत्र लिहावं लागलं."
 
रिक्षाचालक ते राजकारणी
आता आपण संजय शिरसाट यांच्या राजकीय प्रवासाबाबत अधिक जाणून घेऊ. शिरसाट हे शिवसेनेचे औरंगाबाद पश्चिम मतदारसंघाचे आमदार आहेत. राजकारणात सक्रिय होण्यापूर्वी ते स्वतःचा रिक्षाचा व्यवसाय सांभाळत होते. त्यांच्या राजकारणाची सुरुवात 1985 साली शिवसेनेचे शहर संघटक म्हणून झाली. त्याकाळात त्यांनी पक्षवाढीसाठी काम केलं.
 
राज्यात युतीची सत्ता आल्यानंतर 1995 आणि 1999 मध्ये मराठवाडा औद्योगिक विकास महामंडळाच्या सदस्यपदी निवड करण्यात आली.
 
2000 साली त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला आणि औरंगाबाद महापालिकेत कोकणवाडी वॉर्डातून नगरसेवक म्हणून निवडून आले. 2001 मध्ये पक्षाने शिरसाट यांच्यावर सभागृहनेते पदाची जबाबदारी सोपवली. 2003 मध्ये स्थायी समिती सभापतिपदी नेमणूक करण्यात आली. 2005 मध्ये ते पुन्हा वेदांतनगर वॉर्डातून नगरसेवक पदी पुन्हा निवडून आले.
 
2009 साली शिरसाट पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले होते. 2009 व 2014 अशा सलग दोन विधानसभा निवडणुकीत विजयी झाले. तेव्हापासून संजय शिरसाट सलग निवडून येत आहेत.
 
भाजप बंडखोराचा पराभव करून विजयाची हॅट्रिक
संजय शिरसाट हे सलग तीन टर्म औरंगाबाद पश्चिम मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करत आहेत. 2019 साली विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजप युती झाली होती. पण या निवडणुकीत भाजपचे राजू शिंदे हे बंडखोरी करून अपक्ष उमेदवार म्हणून उभे होते. शिरसाट यांनी निवडणुकीत राजू शिंदे यांचा पराभव करत विजयाची हॅट्रिक साधली होती.
 
संजय शिरसाट यांना 83,099 तर अपक्ष राजू शिंदे यांना 43,045 मते मिळाली. एमआयएमचे अरूण बोर्डे 39,211 मत घेऊन तिसऱ्या क्रमाकांवर तर वंचित बहुजन आघाडीचे संदीप शिरसाट 25,500 मतांसह चौथ्या स्थानवर राहिले.
 
त्याआधीच्या 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे मधुकर सावंत यांनी 54 हजार 355 इतकी लक्षवेधी मते घेतली होती. त्यावेळी संजय शिरसाट यांचा केवळ 6 हजार 900 मतांनी विजय झाला होता.
 
मंत्रिपद न मिळाल्याने नाराजी
तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आल्यांनतर संजय शिरसाट यांना मंत्रीपदी संधी मिळण्याची आशा होती. पण त्यांना संधी मिळाली नाही. त्यांच्याऐवजी औरंगाबाद जिल्ह्यातून अब्दुल सत्तार यांना संधी देण्यात आली.
 
त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांची समजूत घातली, असं माध्यमांमध्ये छापून आलं होतं.
 
आमदार शिरसाट यांना शिवसैनिकाकडून प्रत्युत्तर
आमदार संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंना लिहिलेलं पत्र सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं. या पत्रासंदर्भात त्यांना काही सामान्य शिवसैनिकांच्या रोषालाही सामोरं जावं लागत आहे.
 
शिरसाट यांनी पत्र लिहिल्यानंतर त्यांच्याच औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातील एका शिवसैनिकाने पत्राद्वारे त्यांना जाब विचारला आहे. शिवसैनिक आणि औरंगाबादचे युवासेना शहर चिटणीस किरण लखनानी यांनी लिहलेलं हे पत्रही सोशल मीडियात व्हायरल झालं आहे.
 
"मुख्यमंत्री भेटत नाहीत असे म्हणता, तुम्ही तर मतदारांना न भेटता अनेक 'रात्री' मुंबईत घालवता याची कल्पना सर्वांना आहे. तुमचे अनेक कारनामे शिवसैनिकांनी पाठीशी घातले आहेत. अशी आठवण करून देत येत्या निवडणुकीत बोलू," असा इशाराच शिवसैनिकाने शिरसाट यांना दिला आहे.
 
या पत्रावर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया अद्याप आली नाही. पण ते आपल्यावरील टीकेला कशा पद्धतीने उत्तर देतात हे पाहणं आता महत्त्वाचं आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

विरोधी बाकावरच बसावं लागणार- जयंत पाटील