Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हिंदुत्वाची व्होटबँक कोणाची? चंद्रकांत पाटील- संजय राऊत आमनेसामने

हिंदुत्वाची व्होटबँक कोणाची? चंद्रकांत पाटील- संजय राऊत आमनेसामने
, बुधवार, 15 डिसेंबर 2021 (12:58 IST)
भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या एका वक्तव्यामुळे नवी चर्चा सुरू झाली आहे. काल 14 डिसेंबर रोजी विधानपरिषदेच्या दोन जागांवर भाजपाचा विजय झाला त्यावेळेस बोलताना चंद्रकांत पाटील बोलत होते.
 
विधानसभेसाठी चंद्रशेखर बावनकुळे यांना तिकीट नाकारण्यात आलं होतं. त्या संदर्भात चंद्रकांत पाटील यांनी मत व्यक्त केलं.
ते म्हणाले, "पक्षाने आम्हाला हे शिकवलं की शेवटी तिकीट पक्षाचं असतं. माझं तिकीट कापलं हा शब्दप्रयोगच चुकीचा आहे. तिकीट पक्षाचं असतं व्होटबँक पक्षाची असते. तुमचं कर्तृत्व पाहून त्या ठिकाणी पक्ष तुम्हाला उमेदवारी देत असतो. व्होटबँक ही वर्षानुवर्षे मेहनत घेऊन तयार केलेली संत महंतांपर्यंत पोहोचते. छ. शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचते. त्यांनी ही हिंदुत्वाची व्होटबँक तयार केली. त्याच्यामध्ये अलीकडच्या काळात अटलजी, अडवाणीजी, मोदीजी यांनी त्यावर कळस चढवला."
 
उमेदवारी आणि व्होटबँक पक्षाची आहे. व्होटबँकेचा फायदा मिळतो. उमेदवाराचा चेहरा असतो. त्याचाही परिणाम होतो असं त्यांनी सांगितलं.
 
"हिंदू देवळांवर जो अन्याय झाला तो मोदींनी दूर केला. सामान्य हिंदूला आपल्या व्होटबँकेचे वारसदार मोदी आहेत असं वाटतं." असंही ते म्हणाले.
 
यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी चंद्रकात पाटील यांना उत्तर दिलं आहे.
 
दिल्लीमधून बोलताना संजय राऊत म्हणाले, या देशात हिंदूची व्होटबँक हा पहिला विचार बाळासाहेब ठाकरेंनी मांडला. कोण कोणत्या भ्रमात आहे मला माहिती नाही. या देशाची जनता बाळासाहेबांचं योगदान विसरणार नाहीत. बाबरीचं पतन होत असताना सध्याचे हिंदू व्होटबँकवाले पळून गेले. शिवसेना आणि शिवसेनाप्रमुख ठामपणे उभे राहिले.... आणि बाबरी पाडणाऱ्या शिवसैनिकांचा आम्हाला अभिमान आहे. आमचं हिंदुत्व पळपुटं आणि शेपूट गाळणारं नाही. आम्ही लढतो, ठाम राहतो आणि विजय प्राप्त करतो.
 
"चंद्रकांत पाटील काय म्हणतात त्यावर भूमिका ठरत नाहीत. छ. शिवाजी महाराजांनी हिंदू व्होटबँक तयार केली की नाही मला माहिती नाही. पण छ. शिवाजी महाराज यांनी देशातलं पहिलं हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. त्यांचाच विचार हा हिंदूहृद्यसम्राट आणि त्याआधी वीर सावरकर यांनी महाराष्ट्रात आणि देशात रुजवला. बाळासाहेब ठाकरे यांना हिंदूहृदृयसम्राट ही उपाधी देशातल्या लोकांनी दिली. प्रमोद महाजनांचं विधान रेकॉर्डेड आहे. बाळासाहेब त्यांना म्हणालेले ज्या प्रमाणे मी मराठी माणसाला मराठी म्हणून मतदान करायला लावलं तसं या देशातल्या लोकांना हिंदू म्हणून मतदान करायला लावेन." पार्ल्याच्या निवडणुकीत पहिल्यांदा हिंदू म्हणून मतदान करावं लागलं असंही राऊत म्हणाले.
 
शिवसेनेची हिंदुत्वाची भूमिका
ऑक्टोबर महिन्यात प्रबोधनकार ठाकरे यांच्या लेखांच्या संग्रहाचं प्रकाशन करतांना उद्धव ठाकरे यांनी त्यांना अभिप्रेत असणारं हिंदुत्व काय आहे याचा पुनरुच्चार केला होता आणि त्यांच्या हिंदुत्वाचं मूळ 'प्रबोधनकारां'शी कसं जोडलेलं आहे हेही सांगितलं.
 
प्रबोधनकार हे नास्तिक नव्हते, पण धर्माच्या नावावर चालणारी भोंदूगिरी त्यांना मान्य नव्हती असं सांगत सध्याचे इतर हिंदुत्ववादी आणि त्यांच्यात फरक कसा आहे हेही उद्धव यांनी सांगितलं.
 
"हिंदुत्वाचा विचार एक असला तरी धारा वेगळ्या आहेत. म्हणजे आम्ही आणि दुसरे जे हिंदुत्ववादी आहेत, त्यांच्या. आमचं हिंदुत्व जे आहे ते नुसतं शेंडी-जानव्याचं हिंदुत्व नाही आहे. नुसती घंटा वाजवली म्हणजे हिंदू झालो असं नाही," असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.
 
"अनेक जण असं म्हणतात की उद्धव ठाकरे यांनी आता प्रबोधनकारांचं हिंदुत्व घेतलं आहे. पण तसं नाही आहे. जो मधला मोठा काळ बाळासाहेबांचा आहे, ते विचार घेऊन आम्ही पुढे जात आहोत," उद्धव म्हणाले.
 
उद्धव यांची नवी भूमिका सध्याच्या राजकीय स्थितीत उपयोगाची ठरते आहे असं राजकीय पत्रकार आणि लेखक सुधीर सूर्यवंशी बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले होते.
 
"जेव्हा महाविकास आघाडी बनत होती, तेव्हा काँग्रेसच्या राज्यातल्या नेत्यांना सोनिया गांधींनी भिंतीवरचे नेहरु, गांधी यांचे फोटो दाखवून विचारलं होतं की शिवसेनेबरोबर गेलो तर यांना मी काय उत्तरं देऊ? तेव्हा बाळासाहेब थोरातांनी त्यांना प्रबोधनकार ठाकरेंबद्दल सांगितलं होतं आणि त्यांचा वारसा उद्धव पुढे नेऊ शकतील असं म्हटलं होतं. आपण आजची उद्धव यांची भाषणं आणि वक्तव्यं पाहिली, तर तोच धागा आपल्याला दिसेल," असं सूर्यवंशी म्हणतात.
 
"आपल्या वडिलांच्या भूमिकेपासून फारकत घेऊन नवी मांडणी ते करताहेत. प्रसंगी रा. स्व. संघावरही टीका करताहेत. असं अगोदर त्यांनी केलं नव्हतं. मला असं वाटतं की एका प्रकारे ते स्वत: उत्क्रांत करताहेत.
 
"महाराष्ट्राबरोबर भारतातही त्यांना महत्त्व येतं आहे. भाजपविरोधी जे पक्ष आहेत, त्यांना वाटतं की भाजपच्या हिंदुत्वाला उत्तर देण्यासाठी उद्धव योग्य आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे दोन वारसे आहेत. एक प्रबोधनकारांचा, एक बाळासाहेबांचा. आवश्यक राजकीय स्थितीनुसार उद्धव त्याचा वापर करतात," असं सूर्यवंशी म्हणाले होते.
 
त्यात बाळासाहेब आणि संघाच्या हिंदुत्वाबद्दल परब लिहितात, "संघाच्या हिंदुत्वाची नेहमी टवाळीच केली. संघवाल्यांना आपल्या जवळही येऊ दिलं नाही. अगदी सुरुवातीच्या काही घटनांनीच सावध होऊन त्यांनी संघवाल्यांना शिवसेनेच्या संघटनेत शिरू दिलं नाही. संघ हाच आपला संघटन बांधणीतला सर्वांत मोठा शत्रू आहे, हे त्यांना पक्कं माहीत होतं. त्यामुळेच बाळासाहेब असेपर्यंत संघ कधीच शिवसेनेपेक्षा वरचढ होऊ शकला नाही. पण आता पारडं पूर्ण फिरलंय.
 
आजच्या शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत संघ आतपर्यंत घुसला असावा, असं लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या काळात वाटलं. जवळपास पंधरा वर्षांपूर्वी शिवसेनेचं पहिलं चिंतन शिबीर रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत झालं आणि तिथे बाळासाहेबांच्या शिवसेनेला हिंदुत्व शिकवण्यासाठी सु. ग. शेवडे बोलावले गेले.
 
तसंच एकदा थेट सांगलीच्या भिडे गुरुजींना मार्गदर्शनासाठी आणण्याचा प्रयत्न झाला. आज शिवसेनेच्या अनेक शाखांमध्ये प्रबोधनकारांचा फोटो नाही पण सावरकरांचा आहे. राज ठाकरे यांनी दोनेक महिन्यांपूर्वी पहिलं फेसबूक लाईव्ह केलं, तेव्हा सावरकरांचा फोटो वर आणि प्रबोधनकारांचा फोटो खाली होता. उद्धव ठाकरे यांनी या दोनेक वर्षांतच नागपूरला जाऊन मोहन भागवतांची भेट घेतली होती. प्रबोधनकारांचं हिंदुत्व माहीत नसल्याचे हे परिणाम असावेत.
 
पण बाळासाहेब असतानाच या घसरणीची सुरुवात झाली होती. प्रबोधनकारांच्या निधनानंतर वर्षभरातच वरळीची दंगल झाली, हा काही योगायोग नव्हता. या दंगलीत शिवसेनेने सवर्णांची बाजू घेऊन दलितांवर हल्ले केल्याचे आरोप झाले.
 
बाळासाहेबांनी प्रबोधनकारांकडून आलेली मराठी अस्मिता आणि हिंदुत्ववादाची चलनी नाणी सहज उचलली. पण प्रबोधनकारांच्या जहाल बहुजनवादाचा वारसा बाळासाहेबांनी पुढे चालवला नाही. तो त्यांनी चालवण्याचा थोडाफार प्रयत्नही केल्याचे संदर्भ सापडतात. पण तो बहुधा त्यांना पेलवला नसावा. प्रबोधनकारांनी बहुजनवादापायी स्वतःला पणाला लावून आयुष्याची ससेहोलपट करून घेतलेली त्यांनी पाहिली होती. त्याचा तो परिणाम असावा."
 
ऑक्टोबर 2020मध्ये मुंबईत भाजप कार्यकारिणीची बैठक झाली. तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेवर 'भाजपचा भगवा' फडकवणार, असं वक्तव्य केलं होतं. त्याला शिवसेनेकडूनही प्रत्युत्तर देण्यात आलं होतं. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'तल्या अग्रलेखात भाजपच्या भगव्याची तुलना ईस्ट इंडिया कंपनीच्या युनियन जॅकशी करण्यात आली.
 
'सामना'मधल्या अग्रलेखात लिहिलं आहे, "शुद्ध भगवा म्हणजे नक्की काय प्रकार आहे. बेशुद्ध अवस्थेत केलेले हे विधान आहे. बिहारच्या विजयाने भाजपचा नक्की कोणता झेंडा पाटण्यावर फडकला आहे? बिहारमध्ये भगवा फडकवू किंवा फडकवला असं विधान भाजप नेत्याने केल्याचं स्मरत नाही. कारण त्यांचा तसा भगव्याशी संबंध नाही. शिवसेनेशी युती झाल्यापासून त्यांचा भगव्याशी संबंध आला."
 
"भाजपचा शिवसेनेशी संबंध नव्हता तेव्हापासून मुंबईवर भगवा फडकलेलाच आहे. हा भगवा शुद्ध, तेजस्वी आणि प्रभावी आहे. यापेक्षा वेगळा भगवा अस्तित्वात आहे, असे महाराष्ट्राला वाटत नाही. हा भगवा छत्रपती शिवरायांचाच आहे."
 
"भगवा शुद्धच आहे. भगव्याला हात लावाल तर जळून खाक व्हाल. इतिहासाच्या पानोपानी याचे दाखले आहेत. मुंबई महापालिकेवर ईस्ट इंडिया कंपनीचा 'युनियन जॅक' फडकवण्याची भाषा करणाऱ्यांनी हे विसरू नये."
 
त्यावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाल्या होत्या, "छत्रपती शिवरायांचा भगवा, रामदास स्वामींचा भगवा तोच भगवा शिवसेनेने पहिल्या दिवसापासून हाती घेतला आहे. शिवसेनेने कुठल्याही धर्माचा याआधीही अनादर केला नव्हता आणि आजही करत नाही. दुसरं म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेला गृहित धरून 'मी परत येईन', 'मी परत येईन', असं जे करत होते त्यांचं स्वप्न पूर्ण झालं नाही म्हणून भगवा अशुद्ध झाला का? आमचा भगवा हा हिंदुत्चाचा भगवा आहे आणि तो कायम राहणार."

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोरोना लसीकरण न केलेल्या कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात, गुगल अशा लोकांना काढून टाकेल