डेव्हिड रॉबसन
रॉबर्ट प्रोव्हाईन यांच्याशी गप्पा मारत असताना मला एक तीव्र इच्छा होत आहे. जणू काही माझ्या संपूर्ण शरीराला त्या एकाच इच्छेने काबीज केलेलं आहे. त्या इच्छेला मी जितकं दाबायचा प्रयत्न करेन तितकी ती उफाळून वर येत आहे. शेवटी एक क्षण असा आला की, माझ्या मनाला त्या एकाच इच्छेने वेढून टाकलं. पण.. पण मी त्यांच्यासमोर जांभई कशी देऊ?
प्रोव्हाईन मला सांगतात की त्यांच्याशी बोलताना लोकांचं असं अनेकदा होतं. व्याख्यानांच्या दरम्यान त्यांना काही वेळा बरेचसे लोक मोठ्याने जांभया देताना दिसतात. सुदैवाने प्रोव्हाईन हे मॅरीलँड, बॉल्टीमोर काउंटी विद्यापीठात मानसशास्त्रज्ञ म्हणून कार्यरत असल्याने आणि 'क्युरीयस बिहेव्हिअर' नावाच्या पुस्तकाचे लेखक असल्याने त्यांना लोकांनी जांभई देणं, हसणं, उचकी लागणंसारख्या इतर गोष्टी अपमानास्पद वाटत नाहीत.
ते म्हणतात की "यामुळे व्याख्यानाचा प्रभाव आणखी वाढतो. तुम्ही बोलत असताना लोक जांभया द्यायला लागतात. मग तुम्ही त्यांना त्यांच्या जांभईवर काही प्रयोग करायला सांगू शकता. ओठ बंद ठेऊन जांभई देणं, दात आवळून श्वास घेणं किंवा नाक दाबून जांभई देणं, या सारखे अनेक प्रयोग करता येऊ शकतात."
हजारो वर्षं आपल्याला बुचकळ्यात टाकत आलेल्या या जांभईचं रहस्य उलगडण्याचा प्रयत्न प्रोव्हाईन यांनी अशाच प्रयोगांमधून केला. आपण जांभई का देतो?
आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे की थकव्यामुळे, कंटाळ्यामुळे किंवा अगदी एखाद्याला नुसतं पाहूनसुद्धा जांभई द्यावी, अशी तीव्र आणि अदम्य इच्छा होऊ शकते. पण या जांभईचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो?
80च्या दशकात जेव्हा त्यांनी 'चॅस्मोलॉजी', म्हणजेच जांभईबद्दलच्या शास्त्रीय अभ्यास पद्धतीवर काम करायला सुरुवात केली. तेव्हा प्रोव्हाईन यांनी लिहिलं होतं, "मानवी वर्तनातला अत्यंत नैसर्गिक पण ज्याबद्दल अनेकदा गैरसमज होतात, असा भाग म्हणजे जांभई."
तब्बल तीन दशकांनंतर आपल्याला याचं उत्तर सापडलं आहे असं वाटू शकतं, पण या चमत्कारिक उत्तराने अभ्यासविश्वात अनेक मतभेद निर्माण झाले आहेत.
तब्बल 2,500 वर्षांपूर्वी होऊन गेलेले हिप्पोक्रॅटीस नावाचे ग्रीक फिजिशिअन जांभईचा अभ्यास करणारे पहिले व्यक्ती होते, असं म्हणतात. त्यांच्या मते जांभई दिल्याने शरीरातील अपायकारक, विषारी वायू बाहेर टाकण्यास मदत होते. याचा उपयोग विशेषतः ताप आलेला असताना होतो.
त्यांनी असं लिहून ठेवलं आहे की, "ज्याप्रमाणे एखाद्या मोठ्या घंगाळ्यात पाणी उकळत ठेवल्यास त्यातली वाफ मोठ्या प्रमाणात त्यातून बाहेर पडते, त्याचप्रमाणे, आपल्या शरीराचं तापमान वाढल्यास, शरीरात जमा झालेली हवा आपल्या तोंडावाटे अतिशय वेगानं बाहेर फेकली जाते." हीच संकल्पना १९व्या शतकापर्यंत वेगवेगळ्या स्वरूपात समोर येत राहिली.
त्या वेळी शास्त्रज्ञांनी असंही प्रतिपादन केलं की जांभई दिल्यानं श्वासोच्छ्वासाला मदत होते. यामुळे रक्तात प्राणवायूचा मोठ्या प्रमाणावर शिरकाव होतो आणि उच्छ्वासावाटे कार्बन डाय ऑक्साइड बाहेर फेकला जातो.
पण जर हे खरं असतं तर, वातावरणातल्या प्राणवायू आणि उत्सर्गवायूच्या प्रमाणानुसार आपल्याला सगळेच लोक कमी किंवा खूप जास्त जांभया देताना दिसले असते. हे तपासण्यासाठी जेव्हा प्रोव्हाईन यांनी त्यांच्या प्रयोगात सहभागी झालेल्यांना वेगवेगळ्या वायूंच्या मिश्रणात श्वास घ्यायला सांगितलं तेव्हा असा कोणताच बदल त्यांना जाणवला नाही.
याउलट जांभईशी संबंधित अनेक सिद्धांत तिच्या अगम्य आणि संसर्गजन्य गुणधर्मांवर अधिक भर देतात. प्रोव्हाईन यांच्याशी बोलल्यामुळे याबद्दल मला आता चांगलीच माहिती मिळालेली आहे.
प्रोव्हाईन म्हणतात, "जे लोक दुसऱ्याला जांभई देताना पाहतात त्यातले 50% लोक प्रतिसाद म्हणून स्वतः जांभई देतात. हे इतकं संसर्गजन्य आहे की जांभईशी संबंधित काहीही - ती पाहणं, ऐकणं किंवा अगदी त्याबद्दल वाचणंसुद्धा आपल्याला त्वरित जांभई आणणारं असतं."
यामुळेच काही अभ्यासकांना असं वाटतं की जांभई देणं हे मानवी आयुष्यातलं संवादाचं प्राचीन असं साधन तर नाही? तसं असेल तर आपण जांभई देताना नेमकं काय बोलत असतो? जांभई दिल्यावर आपल्याला थकल्यासारखं वाटतं.
यामुळे अशीही एक कल्पना आहे की जांभई दिल्याने प्रत्येकाचा जैविक समतोल राखण्यास मदत होते आणि शरीर ताळ्यावर राहतं.
बर्न विद्यापीठाचे ख्रिश्चन हेस म्हणतात, "माझ्या मते जांभईचं प्रमुख काम हे संकेत देणं आहे. या संकेतांनी एका सामाजिक गटातील लोकांचं वर्तन सिंक्रोनाइज करता येतं. उदाहरणार्थ, अशा गटातील प्रत्येकाला साधारण एकाच वेळी झोपण्याची सवय असणं."
अशा साचेबद्धतेमुळे तो गट आपोआपच अधिक कार्यक्षमपणे दिवसभर एकत्र काम करू शकतो.
आपण तणावाच्या परिस्थितीतसुद्धा जांभई देतो. ऑलिम्पिकमध्ये सहभागी असणारे काही खेळाडू त्यांच्या स्पर्धेच्या आधी जांभई देताना दिसतात तर अनेकदा कलाकार त्यांच्या कार्यक्रमाच्या आधी या जांभईच्या अधीन झालेले दिसतात.
यामुळेच प्रोव्हाईनसारख्या अनेक अभ्यासकांची अशी धारणा आहे की तणावपूर्ण क्षण आपला मेंदू रिबूट करण्यात आपली मदत करतात- तुम्ही जेव्हा झोपाळलेले असता तेव्हा ते तुम्हाला सावध करतात, किंवा तुम्ही विचलित असताना ते तुम्हाला पुन्हा एकाग्र व्हायला लावतात.
संपूर्ण गटातून वाट काढत काढत ही संसर्गजन्य जांभई प्रत्येकाला जागरूकतेच्या समान पातळीवर आणून पोहचवते, जेणेकरून त्या गटातील सगळेच एखाद्या गोष्टीबाबत सारखेच सतर्क होतात.
हे सगळं घडण्याची क्रिया थोडी अस्पष्ट असली तरी फ्रेंच अभ्यासक ऑलिव्हर वालुसिंस्की असं म्हणतात की, जांभई दिल्याने मेंदू आणि मज्जारज्जू यांच्या सभोवताली फिरणारा द्रवपदार्थ (cerebrospinal fluid) उसळतो, ज्यामुळे मेंदूच्या कार्यात एक बदल घडवून आणला जातो.
इतक्या सगळ्या परस्परविरोधी आणि एकमेकींबरोबर चढाओढ करू पाहणाऱ्या कल्पनांमुळे, जांभई देण्याबद्दलचा एकच सर्वसमावेशक सिद्धांत मांडणं फार अवघड वाटत आहे. पण गेल्या काही वर्षांत या सगळ्या संकल्पनांना एका धाग्यात बांधू शकेल, अशी एक यंत्रणा तयार होत आहे.
आता ऑनेओंता इथल्या न्यूयॉर्क स्टेट युनिव्हर्सिटीत असणाऱ्या अॅण्ड्र्यू गॅलप यांना ते पदवीचे शिक्षण घेत असताना असं पहिल्यांदा लक्षात आलं की जांभई दिल्याने मेंदू थंड होण्यास आणि कमी तापमान टिकून राहण्यास मदत होते.
त्यांचं असं म्हणणं होतं की जांभई देताना आपल्या जबड्याच्या होणाऱ्या वेगवान हालचालींमुळे आपल्या कवटीभोवती रक्ताभिसरण होतं. यामुळे शरीरातील अतिरिक्त उष्णता बाहेर नेण्यास मदत होते. तसंच दीर्घ श्वास घेतल्याने सायनस कॅव्हिटीजमध्ये आणि कॅरोटीड आर्टरीच्या आजूबाजूला गार हवा पोहोचते. हा गारवा इथून पुन्हा मेंदूपर्यंत पोहोचतो.
त्याचप्रमाणे या तणावपूर्ण हालचालीमुळे सायनसच्या बाहेरील त्वचेवर म्हणजेच मेम्ब्रेनवर ताण येऊ शकतो. यामुळे गार वाऱ्याची हलकीशी लहर या कॅव्हिटीमधून वाहते आणि म्युकस म्हणजे श्लेष्मा नाहीसा होऊन मेंदू वातानुकुलीत व्हावा तसा थंड होतो.
वेगवेगळ्या तापमानात लोकांची जांभया देण्याची शक्यता किती, हे पाहणं हीच हे तपासण्याची सर्वांत सामान्य चाचणी आहे. गॅलप यांच्या असं लक्षात आलं की, सामान्य परिस्थितीत 48 टक्के लोकांना जांभई देण्याची इच्छा होते.
याउलट जेव्हा त्यांना त्यांच्या कपाळाजवळ कापडाची एक थंड घडी धरायला लावली तेव्हा फक्त 9% लोकांनाच जांभई देण्याची इच्छा झाली. नाकाद्वारे श्वास घेऊन मेंदू थंड करणं अधिक परिणामकारक दिसलं.
तुम्ही एखाद्या क्लिष्ट संभाषणात अडकला असाल आणि तुम्हाला जांभया यायला लागल्या असतील तर काय करायचं याची युक्ती तुम्हाला यातून सापडली असेलच!
गॅलप यांनी त्यांच्या अभ्यासाचे निष्कर्ष पहिल्यांदा प्रकाशित केल्यानंतर त्यांना हा अभ्यास पुढे नेण्यासाठी एक उत्तम पुरावा सापडला तो पॅथॉलॉजिकल यॉनिंगच्या झटक्यांनी त्रस्त झालेल्या दोन स्त्रियांच्या रूपात. या दोघींचे हे अटॅक्स कधीकधी तासभर चालायचे.
गॅलप म्हणतात, "हे अतिशय थकवणारं, कमजोर करणारं आणि अगदी साध्या कामातसुद्धा व्यत्यय आणणारं होतं. त्यांना बाजूला निघून जावं लागायचं. यामुळे त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यावर खूपच परिणाम झाला."
त्यातील एका बाईने एक चमत्कारिक गोष्ट सांगितली. तिने सांगितलं की, हे अटॅक्स थांबवण्याचा एकच उपाय तिच्याजवळ होता, तो म्हणजे थंड पाण्यात उडी मारणं.
गॅलप यांना तिथे नेमकं काय होत असावं, याची कल्पना आली आणि त्यांनी त्या दोघींना आपापल्या तोंडात थर्मामीटर ठेवायला सांगितलं. त्यांचा अंदाज बरोबर ठरला. हे अटॅक्स सुरू होण्याआधी शरीराचं तापमान वाढलेलं असायचं आणि ते पुन्हा 37 डिग्री सेल्सियस होईपर्यंत जांभया येतंच राहायच्या.
मेंदू थंड होणं हे जांभई येण्याच्या प्रक्रियेचा पाया आहे, असं म्हणायला हरकत नाही. उदाहरणार्थ, आपण झोपायच्या आणि उठायच्या आधी आपलं शारीरिक तापमान वाढतं.
मेंदू थंड केल्याने आपण अधिक सजग होऊ शकतो - आपण कंटाळलेले असताना आपल्याला जागं करणं, सचेतन करणं हे यातून साध्य होऊ शकतं. जांभया संसर्गजन्य असल्याने त्या एका माणसाकडून दुसऱ्याकडे पोहोचतात, आणि अशाप्रकारे संपूर्ण गट एकाग्र होऊ शकतो.
गॅलप यांचा हा सिद्धांत जांभईवर अभ्यास करणाऱ्या काही अभ्यासकांना पटलेला नाही. हेस म्हणतात, "गॅलप यांच्या गटाने त्यांच्या सिद्धांताला पूरक असा कोणताही खात्रीलायक पुरावा दिलेला नाही."
गॅलप यांना उंदरांच्या शरीराच्या तापमानात अपेक्षित चढउतार दिसले असा त्यांचा दावा असला तरी समीक्षकांचं असं म्हणणं आहे की गॅलप यांनी मानवी मेंदूतील तापमानाच्या चढउताराचे नेमकं आणि थेट मोजमाप केलं नाही.
प्रोव्हाईन हे अधिक सकारात्मक आहेत. पण त्यांचं असं म्हणणं आहे की, मेंदूची स्थिती आणि स्थैर्य यावर जांभया कशाप्रकारे काम आणि परिणाम करतात याचं हे फक्त एक उदाहरण आहे.
गॅलप यांना हा एक सर्वसमावेशक सिद्धांत सापडला असला तरीही या संदर्भातल्या अनेक गोष्टींची गुपितं अजून उलगडलेली नाहीत. उदाहरणार्थ, आईच्या गर्भात असलेलं बाळ जांभई का देतं?
प्रोव्हाईन म्हणतात, " ते बाळ कदाचित बाहेर जगण्याचा सराव करत असावं किंवा जांभया त्या बाळाच्या शारीरिक वाढीमध्ये, उदाहरणार्थ जबड्याला किंवा सांध्यांना बळकटी देण्यात किंवा फुफ्फुसांच्या वाढीमध्ये, मोठी भूमिका पार पडत असाव्यात. असं असल्यास प्रोव्हाईन यांचं असं मत आहे की, आपल्याला प्रौढ असताना येण्याऱ्या अॅटॅक्सपेक्षा गर्भात त्या बाळाला येणाऱ्या जांभयांचं महत्त्व जास्त आहे.
प्रोव्हाईन यांचा असाही दावा आहे की, जांभया येणं, शिंका येणं यांचा संबंध शरीरसंबंधांशी म्हणजेच सेक्सशी सुद्धा आहे. तुम्हाला हे चमत्कारीक वाटेल, पण या सगळ्या प्रक्रियांमध्ये माणसाच्या चेहऱ्यावरचे भाव सारखेच असतात असंही प्रोव्हाईन म्हणतात.
शरीरसंबंधांप्रमाणेच, जांभया आणि शिंका यांच्यात एक 'बिल्ड-अप' म्हणजेच साठून राहिलेली उर्जा असते. ज्याचा शेवट एका परमोच्च आनंदाच्या भावनेने होतो. ज्याला क्लायमॅक्स असंही म्हणतात.
प्रोव्हाईन म्हणतात, "एकदा सुरुवात झाली की ते पूर्णत्वास जाऊनच संपतं. यात कुणालाच बाधा आलेली चालत नाही." या सगळ्यामागे एकच न्यूरल सिस्टिम म्हणजेच मज्जासंस्था काम करत असते का, असं प्रश्न प्रोव्हाईन यांना पडतो...
"निसर्ग या संपूर्ण चक्राची पुनर्रचना करत नाही," असंही ते म्हणतात. पुरावा म्हणून त्यांनी काही अँटी-डिप्रेसंट औषधांचं उदाहरण दिलं आहे. "काही लोकांमध्ये असं दिसून आलं आहे की, काही अँटी-डिप्रेसंट घेतल्याने त्यांना जांभई देताना परम उत्कटतेची भावना म्हणजेच 'ऑरगॅझम' अनुभवायला मिळतो. हा एक तात्पुरता पण दुर्मिळ दुष्परिणाम आहे."
शेवटी प्रोव्हाईन यांच्याशी बोलताना जांभई देण्याची इच्छा मला अनावर झाली. उन्हाळ्याचे दिवस होते, त्यामुळेच कदाचित या उत्साहवर्धक संभाषणात माझा मेंदू थंड राहावा, यासाठी मला जांभया येत असाव्यात. ती जांभई कोणत्याही कारणासाठी आलेली असली तरी ती एकदाची देऊन वाट पाहण्याचा त्रासदायक प्रवास संपला होता आणि मला प्रचंड समाधान वाटलं होतं.
आता तुमच्याही काही जांभया देऊन झाल्या असतील, याची मला खात्री आहे. प्रोव्हाईनच सांगतात की याबद्दल वाचून किंवा फक्त विचार करूनसुद्धा जांभयांचा रतीब लागू शकतो. तर मग आता वेळ घालवू नका, जांभया देत राहा - तुम्ही जीवनातल्या एका न उलगडता येणाऱ्या रहस्याचा आनंद लुटत आहात!