Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सलमान खानची कोरोना लसीकरणाच्या प्रचारासाठी मदत का घेतली जातीये?

सलमान खानची कोरोना लसीकरणाच्या प्रचारासाठी मदत का घेतली जातीये?
, गुरूवार, 18 नोव्हेंबर 2021 (19:20 IST)
प्राजक्ता पोळ
"राज्यातील मुस्लिम समाजाची संख्या जास्त असलेल्या ठिकाणी कोरोना लसीकरण कमी झालं असल्याचं समोर आलं आहे. त्यासाठी मुस्लिम धर्मगुरू आणि अभिनेता सलमान खानची मदत घेत असल्याचं" आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.
 
ते पुढे म्हणतात, "मुस्लिम समाजात लसीकरणाबाबत काही गैरसमज असतील तर ते दूर करण्यासाठी घरोघरी जाऊन जनजागृती केली जात आहे. पण सलमान खानचा मोठा चाहता वर्ग आहे. सलमानने केलेल्या आवाहनामुळे निश्चितच सरकारला लसीकरण वाढवण्यासाठी मदत होईल असा विश्वास आहे. "
 
आरोग्य विभागाच्या या निर्णयामुळे राजकारण का सुरू झालंय? मुस्लीम समाजात लसीकरणाचे प्रमाण खरंच कमी आहे का? त्याची काय कारणं आहेत याबाबतचा हा आढावा...
 
मुस्लिमबहुल भागातली परिस्थिती कशी आहे?
राज्याचा आतापर्यंत एकूण 6,80,959 लोकांचं लसीकरण करण्यात आलं आहे. राज्याने घेतलेल्या स्थानिक पातळीवरच्या आढाव्यामधून मुस्लिमबहुल भागात लसीकरणाचं प्रमाण कमी आहे. त्याची विविध कारणं आहेत.
नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे सांगतात, "नाशिक जिल्ह्याचं लसीकरणाचं प्रमाण 70% आहे. तर मालेगावमध्ये 30-35% लसीकरण झालं आहे. जिल्ह्याच्या तुलनेत लसीकरणाचा हा आकडा खूप कमी आहे. मालेगावमध्ये कोरोनाचे रूग्णही खूपच कमी आहेत.
 
नाशिक जिल्ह्यात कोरोनाचे 400 रूग्ण असले, तर मालेगावमध्ये 15-20 रूग्ण असतील. त्यामुळे आपल्याकडे नसणाऱ्या आजाराची लस कशाला घ्यायची? असा समज त्यांच्यामध्ये आहे. त्यासाठी आम्ही नमाजच्या आधी मशीदीमध्ये माईकवर लसीकरणाची सूचना करतो. बुरखा घातलेल्या महिलांना 'स्लॉट्समध्ये' लस देण्यासाठी घरोघरी पाठवतो. सलमान खानचा व्हीडिओही आम्ही सगळीकडे व्हायरल केला आहे. आम्हाला अपेक्षा आहे की त्याचा फरक पडेल. "
भिवंडीचे आरोग्य अधिकारी नाव न घेण्याच्या अटीवर सांगतात, "लसीकरणासाठी मोहल्ल्यात गेलं तर कोणाला लस घ्यायची नसते. त्याची कारणं ते सांगत नाहीत. पण लस नको इतकच सांगतात. भिवंडीत 53% लसीकरण पूर्ण झालं आहे. ते वाढवण्यासाठी आम्ही विविध उपाययोजना करत आहोत. आम्ही मौलाना किंवा मुस्लिम समाजाचे धर्मगुरू वगैरे अशा बैठका घेतल्या. आम्ही प्रबोधन करून लसीकरण वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत. "
 
मुंबईबाहेरच्या मुस्लिमबहुल भागात जरी ही परिस्थिती असली तरी, शहरातील परिस्थिती वेगळी आहे. कुर्ल्याच्या वॉर्ड ऑफीसर अलका ससाणे सांगतात, "आमच्या भागात लसीकरण वेगाने सुरू आहे. आम्हाला काही दिवसांपूर्वी लसीच्या मात्रा कमी पडत होत्या. इतकी जास्त मागणी आहे.
 
शहराबाहेर लसीकरण कमी असलेल्या परिस्थितीबद्दल बोललं जात असलं तरी आम्हाला कुर्ल्यामध्ये लसीकरण वाढवण्यासाठी वेगळ्या काही उपाययोजना करण्याची गरज भासली नाही. "
 
सलमान खानच्या व्हीडिओचा फायदा?
मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी सलमान खानचा आवाहन करणारा व्हीडिओ ट्वीट केला. या व्हीडिओमध्ये सलमान खान आवाहन करतो, " गेल्या 2 वर्षांत कोरोनाच्या अनेक लाटा आल्या. लसीकरण हाच आतापर्यंतचा उत्तम उपाय ठरला आहे. सरकार कोरोनावर मात करण्याचा अतोनात प्रयत्न करते आहे.
सरकारला आपण साथ दिली पाहीजे. लसीकरण करून घेतलं पाहिजे. अनेक लोक लसीबाबत अफवा पसरवतात. पण हे थांबवलं पाहीजे आणि सर्वांनी लसीकरण करून घेतलं पाहीजे असं मी आवाहन करतो. "
 
सलमान खानचे 'फॅन्स' सगळीकडेच आहेत. मुस्लिम समाजात तर सलमानचं 'क्रेझ' खूप जास्त आहे त्यामुळे मुस्लिम बहुल भागात त्याचा अधिक फायदा होईल, असं सरकारी अधिकारी सांगतात.
 
सलमानवरून राजकारण?
सलमान खानने आवाहन केल्यामुळे लसीकरणाला गती येईल. त्याचबरोबर मुस्लिमबहुल भागात लसीकरण वाढेल असा विश्वास सरकारला वाटतोय. पण यावरून राजकारण सुरू झालंय. सलमान खानला आमचा विरोध नाही पण यातून महाविकास आघाडी छुप्या पद्धतीने धर्माचं तुष्टीकरण करत नाही ना? असा सवाल भाजपकडून उपस्थित करण्यात आला आहे.
भाजपचे प्रवक्ते राम कदम याबाबत बोलताना म्हणतात, "सरकारने सलमान खानला व्हीडिओत घेण्याबाबत आमचा कोणताही आक्षेप नाही. पण महाविकास आघाडी सरकार आल्यापासून साधू संत आणि हिंदूंवर अन्याय होत आहे. त्यामुळे सलमानला घेऊन महाविकास आघाडी छुप्या पद्धतीने कोणत्या धर्माचं तुष्टीकरण करत नाही ना हा खरा सवाल आहे."
 
काय आहेत गैरसमज?
काही मुस्लिमबहुल भागातील लोकांशी चर्चा केल्यानंतर लोकांमध्ये अनेक गैरसमज असल्याचं लक्षात आलं. लस घेतल्यामुळे नपुंसकता येते. लस घेतल्यामुळे माणूस मरतो असे अनेक गैरसमज लोकांमध्ये आहेत. यामुळे लसीकरण कमी असण्याची शक्यता आहे. पण याबाबत अधिकृतपणे कोणीही बोलण्यास तयार नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

CBSE आणि ICSE बोर्डाच्या शाळा सक्तीचा मराठी विषय शिकवत नाहीत, कारण...