Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

‘माझं लग्न होत नसल्यामुळे आई नेहमीच टेन्शनमध्ये असते’

‘माझं लग्न होत नसल्यामुळे आई नेहमीच टेन्शनमध्ये असते’
, रविवार, 4 एप्रिल 2021 (10:26 IST)
श्रीकांत बंगाळे
दिवसेंदिवस लग्नास होत चाललेला उशीर ही ग्रामीण भागात एक समस्या होत चालली आहे. या समस्येविषयी सगळ्यांनाच माहिती आहे, पण बोलायचं म्हटलं की भीती वाटते.
परभणी जिल्ह्यातल्या उमरी गावात मी बातमी करण्यासाठी गेलो असताना सहज म्हणून तिथल्या एका तरुणाला प्रश्न विचारला.
लग्न तर करायचं आहे पण मुली भेटत नाहीये, असे तुमच्या गावात किती जणं आहेत, असा तो प्रश्न होता.
त्यावर त्याचं उत्तर होतं- 150 ते 200.
औरंगाबाद जिल्ह्यातल्या उपळी गावातही मला असाच अनुभव आला. या गावातले 100 हून अधिक तरुण लग्नासाठी तयार आहेत, पण त्यांना वाट पाहावी लागत आहे.
महाराष्ट्रातल्या कोणत्याही गावात जा, तिथं तुम्हाला अशीच परिस्थिती पाहायला मिळेल. यामुळे लग्नास होणार विलंब ही एक सामाजिक समस्या असल्याचं तरुणांचं मत आहे.
"मला असं वाटतं की लग्नाला उशीर होणं ही सामाजिक समस्या आहे आणि याचं वेळीच निराकरण करण्यात आपण समाज म्हणून अपयशी ठरलो तर यामुळे निश्चितच उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही," मराठवाड्यातला रमेश (नाव बदललेलं) सांगत होता.
रमेशनं वयाची तिशी पार केली आहे आणि तो गेल्या 3 वर्षांपासून लग्नासाठी मुली पाहत आहे. पण, त्याला सतत नकार येत आहे.
"मी आतापर्यंत जवळपास 25 ते 30 मुली बघितल्या, पण मला सतत नकार येत आहे. नकार यायचं कारण हेच की तुम्हाला नोकरी नाहीये. मला नोकरी नाही पण व्यवसाय आहे. पण मुलीच्या गरजा पूर्ण करू शकेल, अशी त्यात शाश्वती नाही. आमची मुलगी खेड्यात राहणार नाही, तुम्ही तिचा खर्च पेलवू शकणार नाही, हीच उत्तरं 90 टक्के लोकांकडून येतात."
रमेश शेती करतो. सोबतच त्याचं कापड दुकानही आहे. यातून तो महिन्याला 10 हजार रुपये कमावतो. आता सततच्या येणाऱ्या नकारामुळे आपण या समाजाचे घटक नाही आहोत, अशी भावना रमेशच्या मनात तयार झाली आहे.
"चारचौघात बसलेला असताना आणि चर्चा करत असताना आपण काही सोल्यूशन सांगितलं की लोक म्हणतात, तुला काय कळतं, तुला थोडी संसार आहे? त्यावेळेस असं वाटतं की आपण काहीतरी चुकलोय, आपण या समाजाचे घटक नाहीत किंवा यांच्यात बसण्या-उठण्याइतपत आपली लायकी नाहीये."
 
पालकही डिस्टर्ब
लग्नास होत असलेल्या विलंबामुळे तरुणच नाही, तर त्यांचे कुटुंबीय डिस्टर्ब झाल्याचं दिसून येतं.
याविषयी रमेश सांगतो, "आई-वडिलांचं खूप मानसिक खच्चीकरण झालेलं आहे. आई नेहमीच टेंशनमध्ये दिसते. स्वत:शीच बोलते. रात्री-बेरात्री उठते आणि स्वत:शीच बडबड करते. विचारलं तर काय झालं ते सांगत नाही, पण मग कधीकधी सांगून टाकतात की कधी होतं तुझं लग्न? लग्नाच्या टेंशनमध्ये ते सातत्यानं असतात."
आता गावागावात बिनालग्नाच्या पोरांची एक आणि लग्न झालेल्या पोरांची एक वेगळी अशा दोन स्वतंत्र टोळ्या निर्माण झाल्याचं रमेश सांगतो.
या बिनालग्नाच्या पोरांचा चर्चेचा विषय आपलं लग्न कधी आणि कसं होणार, नाही झालं तर आपण काय करायचं, असाच असतो.
मित्राच्या लग्नाला गेल्यास मनात काय विचार येतो, असा प्रश्न विचारल्यावर रमेश सांगतो, "मित्राच्या लग्नाला गेलो की तिथं लग्नाचं वातावरण असतं. आपण पाच-सहा जण 100 लोकांत बसलेलो असतो, पाहुणे-रावळे असतात. आणि मध्येच कुणीतरी म्हणतो तुझं कधी होणार आता लग्न? तू कधी आम्हाला वरणपोळी खाऊ घालतो? त्यावेळी न्यूनगंडाची भावना तयार होते आणि मित्राला पाहून वाटतं आपणही त्या जागी असायला पाहिजे."
25 ते 30 वेळा आलेल्या सततच्या नकारामुळे आता मुलगी बघायला जाऊच नये, आपल्याला कुणी मुलगी देणार नाही, अशा मानसिक स्थितीत रमेश सध्या आहे.
खरं तर रमेश हे प्रातिनिधिक उदाहरण आहे. गावागावात तुम्हाला असं चित्र दिसेल, तरुणांना लग्न तर करायचंय पण काही कारणास्तव त्याला उशीर होत आहे. यामागची नेमकी कारणं काय आहेत, ते समजून घेण्यासाठी आम्ही जालना जिल्ह्यातल्या काशीनाथ अवघड यांच्याकडे आलो. त्यांनी आतापर्यंत दीडशेहून अधिक सोयरिकी जुळवण्याचं, लग्न जुळवण्याचं काम केलंय.
 
अपेक्षा आणि व्यसनाधीनता
तरुण आणि तरुणींच्या वाढलेल्या अपेक्षांमुळे लग्नास उशीर होत असल्याचं काशीनाथ अवघड सांगतात.
त्यांच्या मते, "सुरुवातीला मुलाच्या अपेक्षा असतात की सुंदरच मुलगी पाहिजे आणि हुंडा पाहिजे. याच्यात त्यांची चार-दोन वर्षं चालली जातात. नंतर त्यांचं वय होतं आणि मग कुणी पाहुणे येत नाही.
"मुलीच्या बाबतीतही तेच होतं. मुलगी आधी नोकरीवाला नवरा करायचा म्हणते. काही पालकांचे नोकरीवाला पाहण्यासाठी हात पुरत नाही. सगळ्याजवळ सारखी संपत्ती राहत नाही आणि मुलीच्या अपेक्षा नोकरीवाला-नोकरीवाला अशा राहतात. यामुळे त्यांच्या लग्नाला उशीर होतो."
 
लग्नास होणाऱ्या विलंबामुळे बरेचसे तरुण व्यसनाधीन झाल्याचंही अवघड सांगतात.
"एक तर शेतीचं टेन्शन आणि लग्न होत नसल्यामुळे लोकांचे ऐकावे लागणारे टोमणे यामुळे अनेक जण व्यसनाच्या आहारी जातात. दारू प्यायला लागतात. मित्राचं लग्न होतं मग आपलं का नाही होतं, असा प्रश्न त्यांना खात राहतो. त्यामुळे मग ते टेंशन विसरण्यासाठी अनेक जण व्यसन करतात."
'व्यवहार्य अपेक्षा ठेवा'
त्यामुळे मग लग्न होत नसल्यामुळे नैराश्यात असलेल्या तरुणांनी या परिस्थितीला कसं सामोरं जावं, असा प्रश्न आम्ही मॅरेज काऊन्सिलर डॉ. डी. एस. कोरे यांना विचारला.
ते सांगतात, "जोडीदारासंबंधी आपल्या अपेक्षा व्यवहार्य ठेवायला पाहिजे. आपलं उत्पन्न, आपली परिस्थिती, आपला परिसर आणि शिक्षणाला योग्य असा जोडीदार निवडणं केव्हाही योग्य. तरुणींनीसुद्धा हाच विचार करावा. आपण साधारण परिस्थितीत वाढलेलो असेल आणि आपल्या अपेक्षा भरपूर असेल आणि जोडीदार मिळत नसेल तर त्यामुळे निराशा येण्याची शक्यता असते. म्हणून व्यवहार्य पद्धतीनं निर्णय घ्या."
मुलाचं लग्न होत नसल्यामुळे पालकही डिस्टर्ब दिसतात, असं विचारल्यावर कोरे सांगतात, "मुलं आणि पालकांमध्ये बऱ्याचदा लग्नाविषयी संवाद नसतो, अशावेळी पालक एकतर्फी निर्णय घेतात आणि तो मुलांवर लादतात. खरं तर पालकांनी पहिल्यापासून मुलाशी बोलायला हवं, त्यांची लग्नाविषयीची कन्सेप्ट समजून घ्यायला हवी. मुलांच्या अपेक्षा व्यवहार्य नसेल तर त्यांना तसं समजून सांगायला हवं. नवीन जोडीदाराविषयी निर्णय घेताना सारासार विवेकानं तो कसा घ्यावा, हे मुलांना नीट सांगायला हवं."

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पुण्यात कोरोना स्फोट !रुग्णांची संख्या एकाच दिवसात 10,000 पार !